☆ जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले ☆
बघता बघता लिली दिड वर्षाची झाली. ती सहा महिन्यांची झाली आणि आईचे ऑफिस सुरु झाले. त्यामुळे लिलीचा ताबा आजी कडेच. आताही आजीनं तिला छानसा फ्रॉक घातला, पावडर तीट लावली आणि दोघी देवा समोर आल्या. “हं’ म्हण, देवा, मला चांगली बुद्धी दे. “लिलीन आपले इवलेसे हात जोडले आणि म्हणाली, “देवा, आजीला च्यांग्ली बुदी दे.” आजीला हसू आवरल नाही. “सोनुली ग माझी म्हणत आजीनं तिच्या गालावरून हात फिरवला. हा रोजचाच कार्यक्रम झाला होता .
आज आजीनी एका ताटलीत पंधरा पणत्या लावल्या. लिलीला तो चमचमता प्रकाश दाखवत म्हणाल्या, “लिली, ही बघ गंमत ” लुटूलुटू चालत लिली आली. ताटलीतले ते दिवे बघून डोळे मोठ्ठाले करून पहायला लागली. आपले इटुकले हात गालावर धरून आजीकडे आणि त्या पणत्यांकडे पहायला लागली.
भिंतीवरील आजोबांच्या हार घातलेल्या फोटोकडे पहात आज देवाकडे बुद्धी मागायची विसरून गेल्या. त्या ज्योतींच्या प्रकाशात त्यांना आजोबां बरोबरच्या सहवासाच्या आठवणी आठवायला लागल्या . आजचा हा दिवस खास त्या आठवणींसाठीच होता. लिलीला मांडीवर घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत त्या तिथेच बसल्या. आजोबांना छकुल्या नातीची ओळख करून दिली. आजोबा फोटोमधून समाधानानं हसले.
©️ सौ अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडि