जीवनरंग
☆ अवघा रंग एक झाला – भाग २ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆
(मागील भागात आपण पाह्यलं- झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…आता इथून पुढे )
“माई तुम्ही नेहमी म्हणत असता ना की आम्ही अश्रद्ध आहोत… तसं नाहीये माई… आमची श्रद्धा आहे… देवावर… पण देवाच्या मूर्तीवर नाही… माई तुम्ही आणि ऋत्विकाने वाती केल्या होत्या ना, त्या मी देवळाजवळच्या दुकानात विकायला दिल्या. त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून, देवळाजवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार, फुलं विकायला बसायची, तिला एक स्टूल, टोपली, हार अडकवायला स्टँड असं समान घेऊन दिलं. इतकी खुश झाली, पुन्हा पुन्हा आभार मानत होती. आज तुमच्या रुपात तिला पांडुरंग भेटला. त्या मुलीसाठी तुम्ही ऋत्विका, करुणासाठी मी …आणि माझ्या साठी माझे बाबा ‘पांडुरंग’ होते…. ज्यांनी मला माणसामधला पांडुरंग ओळखण्याची ‘नजर’ दिली.
माई हसल्या. “अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते…. देवमाणसा पुढे आम्ही कायमच लीन असायचो… आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हालाही दिलीय… पदराला खार लावून सुध्दा मदत केली आहे आम्ही… पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते गं…. परंपरा देवासाठी नाही तर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी पाळायची… आता इथे शहरात सगळीकडे उजेडच उजेड असतो, पण खेडेगावात संध्याकाळ झाली की, धड अंधार नाही, धड उजेड नाही अशा वेळी खूप उदास वाटतं, मन कातर होतं… अशा वेळीच देवाशी निरांजन लावायची पद्धत होती, तुळशी जवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणायला लागलं की मन शांत, आश्वस्त होतं… अशा परंपरांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकतं. सणा उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातली माणसं एकत्र येतात, नाती टिकतात, किरकोळ रुसवे-फुगवे विसरले जातात… अनुजा, श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते… पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल? परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते… विस्तारते… सर्वांना सामावून घेते… श्रद्धेला एक लोभस रूप देते…” अनुजा चकित होऊन ऐकतच राहिली… आपण माईंना देवभोळ्या, फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो… जरा विचार करून अनुजा म्हणाली,
“माई तुम्ही दमला असाल, जरा आराम करा, जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला.”
माई त्यांच्या खोलीत जाऊन आडव्या झाल्या, त्यांचा डोळा लागला…
त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला आली तेंव्हा… त्या उठल्या… त्यांनी ठरवलं की आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही… नाही केला उपास तर काय बिघडतं ? नाहीतरी ह्या प्रथा स्वतःसाठीच असतात, असं आपणच नाही का सांगितलं? अनुजावर घरात निरांजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो… पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला…. मग नाराजी कशाची ?
त्या बाहेर आल्या… ऋत्विकाने त्यांना हात धरून किचन मध्ये देव्हाऱ्याजवळ नेलं… माई बघतच राहिल्या…. विठोबाची तसबीर ठेवली होती… हार घातला होता… आणि निरांजन लावलं होतं… माईंनी हात जोडले नि त्या डायनिंग टेबलाजवळ आल्या…
ताटात वरी तांदूळ, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी… सगळा उपासाचा मेनू…
आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता… त्यांनी अनुजाकडे पाहिलं…..
“माई, तुमचं पटलं मला, प्रथा आपल्यासाठी पाळायची… खरं सांगू मला पण बरं वाटलं हे सगळं करून… कारण जे काही मी केलं त्या मागचा हेतू मला आज कळला…”
माई हसून म्हणाल्या “आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं… तुझ्यासारखा माणसातला पांडुरंग शोधायचा असं ठरवलं होतं.
“चला… म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र आले… आणि
‘अवघा रंग एक झाला.”
दोघी एकदम म्हणाल्या…..
– समाप्त –
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈