श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ प्रारंभ – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆
आत्याबाई रंजनाला घेऊन बायका शेवया वळत होत्या तिथं गेल्या. तिथं प्रवेश करताच सगळ्या बायका कधी न पाहिल्यासारखे रंजनाकडे पाहतच राहिल्या.
‘एवढे सारे घडूनसुद्धा, नवऱ्याने टाकूनसुद्धा रंजी काहीच न घडल्यासारखी कशी काय? ‘ असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात आला होता पण आत्याबाई असल्याने कुणाच्याच ओठावर मात्र आला नाही.
प्रत्येकीच्या डोळ्यातील प्रश्न रंजनाला जाणवला तसा तिचा चेहरा पडला. आत्याबाईंना ते जाणवले.
“कवा बगीतलं नसल्यावानी काय बगतायसा रंजीकडं ? ए तू उठ गं.. आन च्या ठ्येव जा समद्यास्नी. आन रंजे, तू बस शेवया चाळाय.. “
आत्याबाईंनी शेवयाच्या मालकिणीला चहा करायला सांगून स्वयंपाकघरात पिटाळले आणि तिथं रंजनाला बसवले. कुणी रंजनाचा विषय काढू नये म्हणून दुसराच विषय काढून बोलत बसल्या.
संध्याकाळी रंजनाला सोडायला म्हणून आत्याबाई घरी गेल्या. आत्याबाईंमुळेच इतक्या दिवसानंतर रंजना घराबाहेर पडली होती. तिथंसुद्धा कुणीही तिला काहीच विचारले नव्हते. प्रत्येकजण जणू काही घडलेच नाही असेच वागत होती आणि हे सारे घडले होते ते फक्त आत्याबाईंमुळे. रंजनाच्या मनातला आत्याबाईंविषयीचा आदर जास्तच वाढलेला होता. या साऱ्यांमुळे आणि वेगळ्या वातावरणामुळे ती काहीशी सावरली होती. तेवढ्या वेळात मनात काहीच विचार आले नव्हते. शेवया करण्याचे काम हसत-खेळत चालल्यामुळे कितीतरी दिवसांनी ती हसली होती. तिला खूप बरे वाटत होते.
” दादा, उद्याच्याला येळ काडा.. येरवाळीच पावण्याकडं जाऊन येऊया..”
घरात शिरताच आत्याबाई रंजनाच्या वडिलांना म्हणाल्या.
” काय म्हंत्यात त्ये बगू.. त्या पोरासंगतीबी बोलायचं हाय मला.. “
” अहो, आत्त्याबाई, पण…”
“दादा, आता पन-बिन काय नगो. अवो, इनाकारण जर कुणी तरास देत आसंल.. आन सवंनं सांगूनबी त्येला समजत नसंल तर वाकड्यात शिराय लागतंच.. अवो, तुकोबानं सांगून ठ्येवल्यालं हाईच की, ‘ नाठाळाचे माथी हाणू काठी ।’ उद्या येरवाळीच येत्ये मी.”
आत्याबाईसमोर कुणाचंच काही चालत नव्हते. दादांचेही चालले नाही आणि रंजनाच्या सासरच्या मंडळींचेही चालले नाही. आत्याबाई अन् दादा रंजनाच्या सासरी जाऊन आले. तिथं गेल्यावर तितक्याच चारपाच मातब्बर लोकांना पंच म्हणून बोलावून त्यांच्यासमोर रंजनाच्या नवऱ्याची, सासरच्या लोकांची चूक त्यांच्या पदरात घालून आणि लग्नात दिलेले सारे काही घेऊन परत आले. येताना पंचांच्या साक्षीने सासरच्या मंडळींकडून ‘रंजनाचा काही दोष नसल्याचे, चूक नसल्याचे आणि तिचा नवराच चुकीचा असून तोच लग्नानंतर रंजनाशी संसार करायला तयार नसल्याचे लिहून घ्यायला आत्याबाई विसरल्या नव्हत्या.
दादा परतले तरी मनात अस्वस्थ होते. काहीही असले तरी आज ना उद्या सारे काही सुरळीत होईल, रंजना परत सासरी जाईल. तिचा संसार सुरळीत सुरू होईल अशी क्षीण का होईना पण एक आशा त्यांच्या मनात होती.. आत्याबाईंबरोबर जाऊन आल्यावर ती पूर्णतः संपली होती. आत्याबाईंनी केले ते योग्य की अयोग्य हे त्यांना स्वतःला ठरवता येत नव्हते. पण तरीही त्यांच्या मनात आत्याबाईबद्दल राग नव्हता.
घरी आल्यावर दादांनी सारे सांगितले तेंव्हा रंजनाच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एकीकडे रंजनाबद्दल वाईट वाटत होते त्याचवेळी आत्याबाई मदतीला धावून आल्या आणि रंजनाच्या आयुष्यातील त्रासदायक प्रकरणाचा शेवट झाला. आता पुन्हा नव्याने आयुष्याचा विचार करता येईल, नव्याने आयुष्य जगता येईल असा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांनी सुटकेचा सुस्काराही सोडला होता. झाले ते चांगले झाले की वाईट ? कुणाला काहीच ठरवता येत नव्हते.. अगदी रंजनालाही.
‘उगा घोगडं भिजत ठेवायचं कशापाय? जलम एकडावच आस्तुय दादा.. त्यो बी असाच जाऊ द्याचा ? अवो, पोरीच्या मनाचा, तिच्या जलमाचा तरी इचार करा.. आपली पोरगी सुकानं नांदावी आसं वाटतं… पर योक बैल दुसरीकडं वड खात आसंल तर गाडी सळ्ळी कशी चालायची ? दुसऱ्या बैलाला त्येचा किस्ता तरास हुतो ती दुसऱ्याला न्हाय उमगत. नुसती जीवाची वडाताण हुती.. सुख म्हणून कायच ऱ्हात न्हाय… उगा गाडीला जुंपलंय म्हणून जलमभर वडीत ऱ्हायाचं … दुसरा बैल वडील तिकडे जाऊन उगा कुठंतरी खड्यात जाण्यापरिस जू सोडून बाजूला झाल्यालं लय ब्येस… लोकं काय म्हंतीली ह्येचा इचार करत बसून पोरीला जलमभर आगीत ढकलायची का पोरीला चटकं बसायला लागल्यात ही बगून तिला भायेर काडायचं ह्येचा इचार करायचा ?’
रंजनाच्या सासरी सारं काही ऐकल्यावर बाजूला घेऊन आत्याबाई दादांना म्हणाल्या होत्या. त्ये दादांना आठवत होते. आत्याबाई अडाणी, शाळा न शिकलेल्या.. पण जीवनाच्या शाळेतील अगाध ज्ञान मिळवलेल्या. त्या बोलत होत्या त्यावेळी दादांना सगळे म्हणणे पटत होते.. तरीही.. तरीही ‘ रंजनाचे पुढे कसे व्हायचे ? सारे आयुष्य जायचं आहे तिचं.. आपण चार दिवसाचे सोबती.. सारे आयुष्य एकटेपणाने काढणे सोपे का असतं ? ‘हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता.
क्रमशः …
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈