श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

रंजना आपल्याच विचारात मग्न होती. स्वप्नांच्या झुल्यावर झुलत सासरच्या घरात पाऊल ठेवले होते.. आनंदांत स्वप्नांच्या झुल्यावर झुलत असताना ध्यानीमनी नसताना झुला तुटावा आणि सारी स्वप्नेच तुकड्या तुकड्यात विखरून पडावीत अशी तिची अवस्था झाली होती.. दुःख आणि रिक्ततेने मन व्यापून गेले होते. कुणाशी बोलावे, काही करावे असे वाटत नव्हते. डोळ्यांतले अश्रूही आटून गेले होते. जीवनात जे घडले होते ते धक्कादायक होते. त्या धक्क्यातून अजूनही तीच नव्हे तर सारे घरच पूर्णपणे सावरले नव्हते. ती स्वतःच्याच विचारात असताना आत्याबाई मागे येऊन कधी उभ्या राहिल्या होत्या हे तिच्याही लक्षात आले नाही. आत्याबाईंनी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती दचकली.

स्वतःला सावरण्याचा, आवरण्याचा प्रयत्न करीत तिने मागे वळून पाहिले. आत्याबाईना पाहताच ती म्हणाली,

“आत्याबाई तुम्ही? “

“व्हय मीच…”

तिच्याजवळ बसत तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत आत्याबाई म्हणाल्या,

“पोरी, लै इचार करून नगं तरास करून घेऊस. आगं, जाळणाऱ्या, पोळणाऱ्या उन्हाचा इचार करीत बसण्यापरीस म्होरं येणाऱ्या मिरगाचा इचार करावा माणसानं.. रातीच्या अंधाराचा इचार करण्यापरीस उजाडणाऱ्या दिसाचा इचार करावा..”

पुढं हसत हसत म्हणल्या,

“मी तरी किती येडी बाय हाय बग, अडाणी असून बी तुज्यासारख्या कालीज शिकलेल्या पोरीला शिकवाय लागलीया..ही म्हंजी रेड्याने द्यानेस्वराला द्यान शिकीवल्यावानी झालं बग..”

“तसे काही नाही हो आत्याबाई ..”

स्वतःला सावरत काहीतरी बोलायचे म्हणून रंजना म्हणाली.

“तसं न्हायतर मग कसं ? आगं, परपंच काय येकल्या बाईचा आस्तुय व्हय ? तिनं म्हायेर सोडायचं, नवऱ्याच्या घरला इवून ऱ्हायाचं.. नमतं घिऊन माजं.. माजं म्हणीत परपंचा करायचा.. समदं खरं पर नवऱ्यालाच नगं वाटत आसंल तर ? त्येलाच बायकुची काय किंमत वाटत नसंल तर.? ..तरीबी बाईनं लोकं काय म्हंतीली ह्येचा इचार करून गप ऱ्हायाचं ? आगं गोठ्यात बांदल्यालं मुकं जनावरबी कवा कवा शिंगं उगारतं ..”

“पण आत्याबाई…”

“आजूनबी तुजा पण हायच म्हण की.. आगं शिकल्याली हाईस, पायावं हुभी ऱ्हा… काळ बदलल्याला हाय ही ध्येनात ठयेव…”

रंजनाला समजवताना आत्याबाईंना त्यांचं पुर्वायुष्य आठवले. लग्न होऊन सासरी आल्यावर त्यांना पहिला धक्का बसला तो नवरा दारुडा असल्याचे समजल्यावर.. सासू सासरे चांगले होते. आपल्या नशिबात हेच होते असे म्हणून त्यांनी ‘ पदरी पडलं पवित्र झालं ‘ म्हणत दिवस ढकलायला सुरवात केली.. पण  त्याचा उलटाच परिणाम झाला.. नवऱ्याने त्यांचं अवसानच घेतलं. आल्या दिवसाला दारू पिऊन त्यांना, त्यांच्या आईबापाला लाखोली वाहत मारझोड होऊ लागली.. एके दिवशी त्याला थांबवायला मध्ये पडलेल्या सासूलाही एक दोन तडाखे बसलेले पाहिल्यावर मात्र ते सहन न होऊन त्यांनी नवऱ्याच्या हातातील टिकारणे हिसकावून घेऊन त्याची दारू उतरेपर्यंत झोडपले आणि पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्याला सांगून माहेर गाठले. नंतर स्वतःच्या चरितार्थासाठी नवऱ्याच्या नावावरची थोडी जमीन लिहून घेतली आणि काडीमोड देऊन माहेरातच राहू लागल्या होत्या. तेंव्हापासून मात्र  ‘ जे आपल्या वाट्याला आलं ते दुसऱ्या कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या झटत राहिल्या होत्या..

स्वतःच्या साऱ्या आयुष्याचा पट क्षणार्धात आत्याबाईंच्या नजरेसमोरून तरळून गेला तसे त्या म्हणाल्या,

“उगं डोळं गाळत बसू नगं .. उठ.. मानसानं रडत न्हाय तर लढत जगायचं आस्तं..  आगं, आमी अडाणी.. तरीबी कवा रडलो न्हाय आन तू येवडी शिकल्याली रडत बसलीयास व्हय ?”

आत्याबाई बराचवेळ तिला समजावत होत्या, तिच्याशी बोलत होत्या. थोडया वेळाने त्या तिला घेऊन खाली आल्या. रंजनाच्या आईने चहा ठेवला. चहा पिता पिता आत्याबाई दादांना आणि रंजनाच्या आईला म्हणाल्या,

“ह्ये बगा, पोरगी येवडी शिकल्याली हाय, उगा पंखाखाली घिऊन तिच्या पंखांस्नी दुबळं करू नगा. माजी भाची हाय नाशकात, येका कंपनीत म्यानेजर हाय. तिज्यासंगं मी बोलल्ये. रंजना तिच्या पायाव हुबी  ऱ्हाऊदेल ..तिला लावून देऊया भाचीकडं.. दोन दिसात जाऊंदेल. “

“अहो पण..”

“उगा मोडता घालू नगासा.. जगण्याची लडाई ज्येची त्येनं लडायची असती… अडीनडीला आपुन हावोतच की.. पर तिला जाऊंदेल.  ह्यो भाचीचा नंबर हाय . तिच्यासंगं तुमीबी बोला आन रंजीलाबी बोलू देत. रंजे, परवा येरवाळी निघायचं बग.. येकली जातीस का संगं याला पायजेल?”

रंजनाच्या पाठीवर हात ठेवत आणि दादांकडे भाचीचा फोन नंबर लिहिलेला कागद देत आत्याबाई म्हणाल्या.

दोन दिवसांनी सकाळच्या बसने रंजना निघाली तेंव्हा बसला बसवून द्यायला आत्याबाईही आल्या होत्या. रंजनाच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते पण त्यातूनही आत्मविश्वास दिसत होता. बसमध्ये बसण्याआधी ती आई-दादांच्या पाया पडली. आत्याबाईंच्या पाया पडायला वाकली तशी आत्याबाईंनी उचलून जवळ कुशीत घेतले आणि पाठीवर हात ठेवला. त्या काहीच बोलल्या नाहीत.

पण बसमध्ये बसल्यावर खिडकीतून रंजनाने हात हलवत बाहेर आत्याबाईकडे पाहिले. त्यांचे डोळे म्हणत होते..

“येणाऱ्या कोणत्याही प्रसंगात न डगमगता लढत रहा, सुखात रहा.आनंदात रहा.!”..

बस निघाली तरी रंजनाला निशब्द आत्याबाईच्या बोलक्या डोळ्यांची निशब्द सोबत जाणवत होती. बस पुढे पुढे जात होती.. खिडकीतून बाहेर बघताना तिच्या मनात आले, ‘ आपले जीवन म्हणजे एखाद्या अनघड दगडासारखंच असतं.. शिल्पकार जसा एखाद्या अवघड दगडातून नकोसा भाग काढून बाजूला टाकून एखादे सुंदर शिल्प घडवतो  तसेच हे जीवन घडवायचं असते. ‘…

तिने तिच्या अनघड जीवनातून नकोसा भाग काढून टाकायला प्रारंभ केला होता.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments