सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ स्थळ…. भाग – 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(मुख्य विषयाला सुरवात होत नव्हती.वातावरणात अवघडलेपण होते.)
काही गोष्टी माझ्याकडून नकळत टिपल्या जात होत्या. आईच्या अंगावरची ठेवणीतली असेल पण साधीच साडी. संघर्षमय जीवनाच्या चेहऱ्यावरील रेषा. काळपट वर्तुळाच्या मागे डोळ्यात असलेली स्वप्न. आर्जव, अपेक्षाही आणि अनिश्चितताही. लोकेश तसे अजिबात गर्विष्ठ नाही. साधाच आहे. पण परिस्थितीने नकळतच आलेला एक डौल आणि प्रचंड आत्मविश्वास. कधी कधी समोरच्याला खचवतो. आणि मग अंतर पडतं.
मग आई म्हणाली वडिलांना,” शिवांगी ला फोन लावा ना! पाहुणे आलेत म्हणावं.”
तेव्हा मीच म्हटलं, “ती कुठे बाहेर गेली आहे का?”
” हो. आज नेमकं तिचं सेमिनार आहे. आणि त्याची सर्व जबाबदारी तिच्यावरच असल्यामुळे, तिला ते टाळता येणं शक्यच नव्हतं. पण येईल ती “
आता चुळबुळीचा काळ बराच वाढत चालला होता.
“हो. अनुभवचं पण आजच प्रेझेंटेशन होतं. एक मोठं बीझनेस डील क्रॅक होणार होतं. त्यामुळेच तो ही येऊ शकलं नाही.”
माझ्या मनात आलं ही मुलाखत पुढे नसती का ढकलता आली? पण कुणालाच याबाबतीत विलंब नको होता. निदान सुरुवात तरी व्हायला हवी होती.
लोकेश चे विनोद चालू होते.
” काय करणार? ही आयटी मधली मुलं फारच व्यस्त असतात! त्यांच्याकडे वेळच नसतो. पण त्यांच्या भविष्याची चिंता मात्र आपल्यालाच.”
सुयश म्हणाला,” ताई चा मेसेज आला आहे. पंधरा-वीस मिनिटात येतेच आहे ती. “
चोरटेपणाने माझ्या मनात विचार आला कदाचित शिवांगी ला या बैठकीत काही रस नसेल. केवळ आई-वडिलांचे मन दुखावू नये म्हणून ती तयार झाली असेल कदाचित. अनुभव सारखेच तिलाही आशा-निराशेच्या झोक्यावर झूलाव. लागल असेल. स्वतःला एक स्थळ म्हणून लेबल लावणे आणि रिंगणात मिरवणं तिच्याही चौकटीत बसत नसणार. पण घरातल्या एकंदर वातावरणातून झिरपणार्या संस्कृतीचा विचार केला तर. तेवढी आक्रमकता नसेल कदाचित तिच्यात.
मात्र त्यावेळी तिचं घरात नसणं हे खूप बोलकं होतं. कुणी सांगावं? ती म्हणाली असेल, घरातल्या सर्वांना,
” नाही तरी ज्याला लग्न करायचं आहे तो तर नसणारच आहे ना? मग माझ्या उपस्थितीची तरी काय गरज आहे? आणि तुम्हाला माझ्या लग्नाची इतकी घाई काय आहे? आणि माझ्या मनात काही प्रश्न आहेत. इतक्या चांगल्या, मजबूत पार्श्वभूमी असलेल्या मुलाचं, अजून लग्न का जमू नये? शिवाय आपल्यात आणि त्यांच्यात खूपच फरक जाणवतो. विशेषतः आर्थिक परिस्थितीत. का निवडले असेल त्यांनी आपल्यालाच? आणि समजा यातून काही आकारलंच तर पुढच्या जीवनात हे अंतर त्रासदायक ठरू शकते. मला वेळ हवाय. तुम्ही हुरळून गेला असाल,पण मला यात धोका दिसतोय.”
खरंय. अनोळखी नाती जुळताना साशंकता ही संभाव्य आहे.
दारावर बेल वाजली. आणि सुयश धावत दार उघडायला गेला. आई-वडिलांचे तणावलेले चेहरे सैल झाले.
” आली बाबा ही! फार नाही ताटकळत ठेवलं! असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर चमकले.
आल्या आल्या शिवांगी ने भराभर चपला काढल्या .हातातलं काही सामान दरवाजा जवळच्या टेबलवर ठेवलं. आणि ती आतल्या खोलीत गेली. तिच्या पाठोपाठ तिची आई ही आत गेली.
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈