सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(शिवांगीने मुलाचा  होकार मिळावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले नव्हते..आता पुढे)

तेवढ्यात सुरयशने काही फोटो आणले.

हे ताई चे फोटो. मनापासून तिला याची आवड आहे.”

डोळ्यांवर मोठे गॉगल्स, पायात शूज, दोन्ही हातातला जाडजूड दोरखंड पकडत एक अवघड उंच कडा चढत असलेली शिवांगी, विलक्षण धैर्य, चिकाटी आणि जिद्द जाणवत होती त्या छायाचित्रात! सुयश बोलतच होता

” त्यांचा एक ग्रुप आहे. गिरिप्रेमी. आत्तापर्यंत त्यांनी अनेक अवघड गड किल्ले चढलेत .”

मग न राहवुन शिवांगी चटकन म्हणाली,”  माझं काय प्रमोशन चालले आहे का?”

लोकेश मनापासून हसला. किंबहुना तिच्या बोलण्यामुळे सगळेच मनमोकळेपणाने हसले. शिवांगी च्या आई वडिलांचे चेहरे मात्र उतरले होते, असं निसटत जाणवलं. दरम्यान खाणं-पिणं झालं.

एक नोंद केली.

चहा गरम नव्हता साखर थोडी जास्तच होती. सफरचंदाच्या फोडी ही, खुप आधीपासून कापल्यामुळे लालसर झाल्या होत्या.उपम्यात  गुठळ्या होत्या. फोडणीत मोहरी तडतडली नव्हती. वातावरणात प्रचंड नकारात्मकता होती. दडपण, अवघडलेपण होतं. 

खाली उतरून गाडी पर्यंत शिवानी चे आई वडील निरोप द्यायला आले होते. शिवांगी च्या आईच्या हातांच्या हालचाली वरून जाणवत होता  तो त्यांचा तणाव.

पुन्हा एकदा मागेच. पुन्हा एकदा अपेक्षाभंग. पुन्हा एक शून्य. आणि पुन्हा एकदा थकलेल्या, होरपळलेल्या, हरलेल्या मनाला. धक्का देऊन करावी लागणारी दुसरी नवी सुरुवात. दुसरा नवा शोध. कधी संपणार हे सारे?

लोकेशने गाडी सुरू केली. सर्वांनी निरोपाचा हात हलवला.  गाडी वळवत असताना वडील खिडकीत वाकून म्हणाले,” कळवा मग.”

” हो नक्की.”

लोकेशनं, शक्य तितक्या मोकळेपणानं मनातलं लपवत म्हटलं.

मला मात्र त्या माऊलीला सांगावसं वाटलं,

” नका इतकी काळजी करू. सांभाळून, जाणीवपूर्वक मुलीला वाढवलीत ते केवळ शिकलेली, गृहकृत्यदक्ष, गोरी स्मार्ट, चष्मा नसलेली, या ‘वधु पाहिजे, सदरासाठी नव्हे. तिच्यातही एक ठिणगी आहे. एक आत्मा आहे. याची जाणीव ठेवा. ती केवळ एक स्थळ नव्हे. 

शिवांगीलाही सांगावसं वाटलं ,”अशीच राहा. मुक्त .स्वतंत्र. तुझ्यातला विश्वास, तुझ्यातलं तेज आणि प्रकाश विझू देऊ नकोस.”

परतताना गाडीत दीपा अगदी  नाराज दिसत होती.

“पाहिलतना काकू? हे असच होतं. पुन्हा आम्ही शून्यावर.”

लोकेश म्हणाला,” पण काकू! मुलगी चांगली होती ना?मला तिचा बोल्डनेस आवडला. अनुभव साठी भले योग्य नसेल ती,पण इतक्या चांगल्या मुलीला नाकारताना कारण काय सांगायचं? जस्ट नॅट सूटेबल…”

पण मी म्हणाले,” लोकेश नकार शिवांगी कडूनही असू शकतो. या बैठकीत अनुभव नव्हता. तिला नसेल का खटकलं ?नकार काय किंवा होकारात्मक उचललेले आणखी एक पाउल काय …या कुठल्याच गोष्टीला तिच्या दृष्टीने शून्य महत्त्व असू शकते.  कारण यात प्रत्यक्ष मुलांचा काहीच सहभाग नाही. म्हणजे केवळ आई-वडिलांच्या विचाराने चालणारा जोडीदार मला नको असंही ती म्हणू शकते.”

शेवटी हा विषय न संपणारा होता, प्रश्न अनंत होते. उत्तर मात्र अधांतरी होते. कारण एका अनोळखी वळणावर घेतलेले निर्णय म्हणजे, एका दाट काळोखात घेतलेली उडीच असेल.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments