सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ किमया – भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(मुलांचा जोरजोरात चाललेला वादविवाद ,अन् भांडण विभा ताईंच्या कानावर पडलं होतं….) आता पुढे-

मुलांनी शब्दांच्या फटाक्यांची मोठीच्या -मोठी लड पेटवून आपल्या अंगावर फेकलीय, असं त्यांना वाटलं. वृद्धाश्रम ,….लाईफस्टाईल….. हक्काची नोकर….ओल्ड स्टफ..

व्हाय ओन्ली मी ?….हे काय चाललं होतं सगळ्यांचं? कानात शिशाचा गरम रस ओतणारे शब्द!…. त्यांना दरदरून घाम फुटला. झोपेतून जाग्या त्या केव्हाच झाल्या होत्या. पण आता त्यांना खरी जाग आली. तोंडावर गोड गोड बोलणारी, फोनवरून त्यांची खूप काळजीनं विचारपूस करणारी, ती हीच का आपली अपत्यं? त्यांना प्रश्न पडला. त्यांचं खरं रूप समोर आलं होतं. मुखवटा बदलणारी माणसं!… खरंतर केतकी स्वभावानं अशी नाही, पण भावंडांच्या नादानं ती पण त्यांच्यासारखंच बोलू लागलीय. सगळ्यांना दूर राहणारी आई हवी आहे.पण त्यांच्या घरात नकोय. तिचा सहवास त्यांना नकोय.

हॉलमध्ये जाण्यापूर्वी तोंडावर पाण्याचे हबके मारून त्या फ्रेश झाल्या. खरंतर मगाशी जे सगळं कानावर पडत होतं, तेव्हा डोळ्यातून अश्रू यायला हवे होते. अपमानाचं दुःख अनावर व्हायला हवं होतं… पण त्यांना जाणवलं की आपल्या डोळ्यातलं पाणीच आटून गेलय. हसरा इमोजी चेहऱ्यावर चढवून त्या बाहेर आल्या.

“अगं सांभाळून,.   हातात काठी का नाही घेतलीस?.. अजून नीट बॅलन्सिंग होत नाहीये.” म्हणत केदार आधार द्यायला पुढे झाला.

‘आयुष्याचं बॅलन्सिंगच चुकलंय बेटा, आता मनाचा तोल सांभाळतच जगायचय’ त्यांच्या मनात आलं…. पण उघडपणे त्या म्हणाल्या,” किती भाग्यवान आहे मी. तुमच्यासारखी प्रेमळ, गुणी, मातृभक्त मुलं मला लाभलीत. छान गेले इथले दिवस. आजचा दिवस तर मी कधीच विसरणार नाही. खरंच आज मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय.”

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून  परतताना त्यांनी निश्चयच केला, आता लवकरात लवकर खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभं रहायचं.   कितीही जड वाटत असलं तरी नातीत गुंतलेलं आपलं मन… आणि आपलं सामान दोन्ही आवरायला त्यांनी सुरुवात केली.

“आई, फिजिओला कोणती वेळ देऊ?” केतकी प्रेमळपणे(?) विचारत होती. “नाही- नको, मी आता गावी परतावं म्हणतेय. आता औषधाचा मारा पण थांबलाय आणि हॉस्पिटलच्या चकरा पण”… त्यांनी दृढनिश्चयानं सांगून टाकलं.

“अगं एवढ्यात ? रहा नं अजून थोडे दिवस. तू गेलीस की आम्हा तिघांनाही अजिबात करमणार नाही. केतकीच्या नाटकी आग्रहाकडं त्यांनी लक्ष दिलं नाही.

गावी येऊन पोहोचल्या. त्यांना आठवलं ते जातानाचं एवढं मोठं सामान…. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन केलेले तर तऱ्हेचे खाद्यपदार्थ… मसाले, लोणची, पापड..आणखी कायबाय… खूप काही… आणि त्याच्या दुप्पट आकाराचं उत्साह आणि  प्रेमानं भरलेलं मन…. पण आता मन पण रितं आणि हात पण!

ठरवल्याप्रमाणे स्टेशनवर सीमा घ्यायला आली होती. तसं पाहिलं तर ती समोरच्या केळकर वहिनींची सून  पण दोघीत अगदी सख्ख्या बहिणींगत घट्ट नातं! ड्राईव्ह करता करता सीमाची बडबड पण चालू होती,” बरं झालं ताई तू आलीस. आता दोन-तीन महिन्यात तुला आपली तब्येत घट्ट मुट्ट करायची आहे. अबोलीच्या लग्नाची सगळी महत्त्वाची जबाबदारी मी तिच्या लाडक्या विभा मावशीवर टाकणार आहे… बरं ,घर शेवंता कडून चकाचक करून घेतलंय. दोन महिन्यांसाठी डबेवाला पण ठरवून ठेवलाय. फिजिओची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलीय.  आणखी काही लागलं तर मॅडम, सेवेला मी हजर आहेच.”

विभाताईंना खूप हसू आलं, “अगं, हो- हो, जरा दमानं घे.. आता इथेच राहणार आहे मी. आणि तू जवळ असताना मला गं कसली काळजी?”अगदी निश्चिंतपणे त्या म्हणाल्या. स्वतःच्या हक्काच्या घरात येऊन त्यांनी मोकळा श्वास घेतला. पुढचे काही दिवस त्यांच्या घरात खूप वर्दळ होती. मैत्रिणी, फॅमिली फ्रेंड्स.. सगळे आवर्जून आले .फोनवरूनच आपुलकीने विचारून त्यांना कशाची गरज आहे ते ते घेऊन आले. आपल्या फ्रॅक्चर झालेल्या पायाचं वर्णन, मुलांचं, नातवंडांचं तोंड भरून कौतुक करत…. त्या हसत हसत बोलत होत्या पण त्यांचं मन आतून खदखदत होतं.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments