☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-1 ☆ श्री आनंदहरी ☆
गावाच्या खालतीकडे बिरोबाचे माळ.. बिरोबाच्या देवळाभोवतीचे शिवार त्याच्याच नावाने ओळखले जायचं.. माळ म्हणजे तसे माळरान नव्हतं.. बऱ्यापैकी सुपीक जमीन होती पण गाव लवणात वसलेलं होते. गावालगतच्या जमिनी काळ्याभोर , जास्तच सुपीक त्यामानाने बिरोबाच्या शिवाराची सुपीकता कमी इतकंच. ज्याला गावाजवळ जास्त जमीन होती तो गावापासून लांब असणारं बिरोबाच्या देवळाजवळचे रान कसायचाच नाही. त्यामुळे बिरोबाच्या शिवारात असे पडीक रान जास्त होतं म्हणून त्याला माळ म्हणायची सवय गावाला लागली होती. बिरोबाजवळचे तिचं रानही आधी पडीकच होतं म्हणे.. पण ती लग्न होऊन यायच्या आधीच तिच्या सासऱ्याने, घरात त्यांच्या भावाभावात वाटण्या झाल्यावर गावंदरीच्या रानात भागायचं नाही म्हणून बिरोबाच्या माळाचा आपल्या वाटणीचा एकराचा डाग कसायला सुरवात केली होती . आपला एकुलता एक पोरगा चांगला पैलवान व्हावा ही सासऱ्याची इच्छा होती पण सासऱ्यांच्या अचानक जाण्याने पोराची तालीम सुटली, आणि घराची , रानाची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती..सासरे गेल्यानंतर तीन वर्षांनी ती लग्न होऊन घरात आली होती.
तिला सासू तशी मायाळूच भेटली होती. कधी कधी रानात भांगलायला सोबत जाताना , कधी असेच दुपारच्या वेळी सोप्यात काहीतरी काम करत असताना सासू काही बाही जुनं सांगत राहायची.. जुन्या आठवणी काढत राहायची.त्यामुळे तिला तिच्या आज्जेसासुपासूनच्या अनेक गोष्टी माहीत झाल्या होत्या. तिची सासु जितकी बोलकी तितकाच तिचा नवरा अबोल होता.. पण सासुमुळे तिला नवऱ्याचं अबोलपण फारसं डाचत नव्हतं. तरीही एकदा तिने सासुजवळ नवऱ्याच्या अबोलपणाचा विषय काढला तेंव्हा सासू हसली होती . सासू का हसली ? यात हसण्यासारखं काय होतं हे काही तिला कळले नव्हते.. ती त्यामुळे खट्टू झाली होती.. तिचे खट्टू होणे तिच्या चेहऱ्यावरून पावसाच्या थेंबांसारखं निथळत होते.. सासूला ते जाणवलं तसे सासूने तिला लेकीसारखं जवळ घेतलं आणि म्हणाली,
“आगं, तुझ्यासंगं आत्तापातूर त्यो बोलला आसल त्येवडं त्येचा बा समद्या आयुष्यात माझ्यासंगं बोललेला न्हाय.. त्ये बी जाऊंदेल .. आगं, मी माज्या मामांजीस्नी माझ्या सासूसंगं बोलताना येक डाव बी बघितलं न्हवतं.. मी नवरी हून आले तवा मला वाटायचं ह्येचं कायतरी बिनासल्यालं दिसतंय.. एकडाव मी सासूला ईचारल तर ती म्हणाली, ‘ ही ब्येनंच तसलं हाय.. कुनीबी बायकांसंगती बोलत न्हाय… ती घरात असली की निसतं मळभ दाटल्यावानी वाटतं बग ..”
सासूच्या शेवटच्या वाक्याने तिलाही हसू आले होते.
बिरोबाच्या शिवाराकडे जाता जाता तिला हे आठवले तसे तिच्याही चेहऱ्यावर क्षणभर हसू फुललं होतं.. पुढच्याच क्षणी सासूची आठवण झाली आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं..दोन वर्षांपूर्वी गावंदरीच्या रानातनं भांगलून माघारी येताना.. सासूनं तिला गवताचे वजं उचलून दिलं अन् म्हणाली,
“तू हो म्होरं . मी येती द्वारकामावशी संगं.. वाईच दमा दमानं .. ”
शेजारची द्वारकामावशी आधीच म्हातारी त्यात तिचे गुडघे दुखत होते.. तरी ती भांगलायला येत होती.. सासू जाता येता तिच्या गतीने तिला संगती घेऊनच जात येत असे. भांगलताना ही द्वारकामावशीला सांभाळून घेत होती. मावशीची मागं पडलेली पात पुढनं भांगलत येऊन पूरी करत होती.. तिला हे नित्याचच होतं. ती गवताचं वजं घेऊन वळत असतानाच द्वारकामावशींनी मिश्रीची डबी काढली तसे तिच्या मनात आलं , ‘ आता काय दोघीबी लवकर याच्या न्हाईत घरला.. मिश्री लावून झाल्याबिगर उठायच्याच न्हायती..,’ काहीसे स्वतःशीच हसून ती झपाझप घराकडे निघाली. ती निम्म्या वाटेत असतानाच पावसाला सुरवात झाली.. पण निवाऱ्याला कुठेही न थांबता ती तशीच पावसात भिजत घरी आली होती….
पावसाची चळक थांबूनसुद्धा बराच वेळ झाला होता पण सासू घरी आली नाही.. तसे तिला काळजी वाटू लागली होती.. वेळ जात होता तशी तिच्या मनातली सासूची काळजी वाढतच चालली होती .
क्रमशः
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈