सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ किमया – भाग-4 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(त्यांनी आपल्या अश्रूंना, हुंदक्यांना रोखून ठेवायचा प्रयत्नही केला नाही. बऱ्याच वेळानं त्यांना हलकं हलकं वाटू लागलं.) आता पुढे…

सकाळी उठल्यावर पुन्हा मनाची तीच विचित्र अवस्था!

माझ्या मुलांना मी नकोशी झालेय, आता मी कुणासाठी, कशासाठी आणि कशाच्या जोरावर जगायचं? देवानं आपल्याला लवकर मरण द्यावं. हे आणि असले सगळे निराशावादी विचार त्यांना थकवून टाकू लागले. मनाची शक्ती खेचून घेऊ लागले. मन विचारातून बाहेर पडायला तयारच होईना.दुःखाच्या भावनेला ते गोंजारतच राहिलं.

तशा त्या बुद्धिवादी, मानसशास्त्राचा अभ्यास असलेल्या, वाचनवेड्या… इतरांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी त्या समुपदेशन  करायच्या. त्यांच्या त्याच बुद्धीने उचल खाल्ली. जे  उपाय त्या दुसऱ्यांना सांगायच्या, ते स्वतः अंमलात आणायला त्यांनी सुरुवात केली.’ यातून तुला बाहेर पडावच लागेल’ असं स्वतःला बजावून त्यांनी प्रयत्न सुरू केले. प्राणायाम, ध्यानधारणा ,त्या जोडीला रिकाम्या वेळी स्तोत्रपठण, जप जाप, देवपूजा हे सगळं सुरू झालं. वेळ चांगला जाऊ लागला. मन त्यात  थोडसं रमलंही, पण मनाची उलाघाल  कमी होत नव्हती. डिप्रेशन जात नव्हतं.आला दिवस- गेला दिवस करत आयुष्य ढकललं जात होतं.

असंच एकदा कपाटातून कपडे काढत असताना ऊतू आलेल्या कप्प्यातले सगळे कपडे त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात श्रीधरपंतांचा फोटो पण होता. एकदम चपापून त्यांनी फोटो व्यवस्थित ठेवला…पतीच्या फोटोतल्या हसऱ्या चेहऱ्याकडे त्या टक लावून पहात राहिल्या. हार्ट फेलनंअर्ध्या संसारातून उठून गेलेले श्रीधरपंत…. त्यांच्या माघारी आठ जणांच्या मोठा संसार लिलया पेलेल्या त्या…. सगळे वैवाहिक जीवनातले सुखदुःखाचे प्रसंग त्यांना आठवले…. आणि नंतर त्यांचे मन पतीला कैफियतच सांगू लागले.

‘बघा ना, अठरा वर्षाची मी, जेव्हा उंबरठ्यावरचे माप ओलांडून या घरात आले तेव्हा घरात तुमच्या मावशी ,आत्या आणि आई तीन-तीन वडीलधारी मंडळी होती. मावशी, आत्या म्हाताऱ्या.. तर आई कायमच्या आजारी!… ते लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस असूनही, मला कधीही त्यांची अडचण वाटली नाही. आणि असेही कधी वाटले नाही कीआई वडिलांनी मला वृद्धाश्रमात किंवा नर्सिंग होम मध्ये ढकलून दिलंय. प्रेम मिळालं ,प्रेम दिलं ,सगळ्यांची तंत्रं सांभाळत संसार आनंदोत्सवा सारखा साजरा केला…. पण आता जग बदललंय. एकत्र कुटुंबाच्या संस्कारात वाढलेली आपली मुलंही सगळे संस्कार विसरलीत. ती निर्मम, व्यवहारी आणि स्वार्थी झालीत. त्यांना पंखाबरोबरच शिंगही फुटलीत. आणि ते धाकटं रत्न कामिनी… ती तर पहिल्यापासूनच बेछूट बोलणारी आणि उद्धटपणे वागणारी…. नकळत पोटात वाढणारा चौथा जीव …तो आपल्याला नको होता. पण वडीलधाऱ्यांचा मान राखून आपण तो निर्णय नाही घेतला. ही गोष्ट लहानपणीच कधीतरी मावशींकडून कळल्यापासून.   “मी अनवॉन्टेड बेबी …. निगलेक्टेड चाईल्ड आहे…. ही शस्त्र पाजरत आपल्या सगळ्या मागण्या, हट्ट तिने पुरे करून घेतलेते… हे तर तुम्ही जाणताच. पण आता ती तिने तर फार पुढची पायरी गाठलीय.’लिव्ह इन रिलेशन ‘मधे राहू लागलीय. अन् आता तिच्या वागण्या- बोलण्याला ताळतंत्रच नाही राहिलाय…..

इतर कोणालाही न सांगितलेली, मनात साठलेली खंत पतीसमोर उघडी करून त्यांना खूप हलकं वाटलं. पण त्यांच्या हेही लक्षात आलं की  मन फारच हटवादी झालंय. सारखं आपलं… एकाकी पडल्याचं, निराधार झाल्याचं दुःख गोंजारत राहिलंय. सगळं कळतंय पण वळत नाही ही त्याची अवस्था… दुसऱ्यांना समुपदेशन करणं सोपं असतं पण आपल्यावर तशी वेळ आल्यावर त्यातून बाहेर पडणं किती अवघड असतं हेही त्यांच्या लक्षात आलं होतं.

संध्याकाळची वेळ…. गच्चीतून रस्त्यावरची रहदारी त्या पाहत होत्या खऱ्या पण मन नाही नाही त्या विचारात भरकट होतं. अचानक आपल्या सुकलेल्या टेरेस गार्डनकडे त्यांचे लक्ष गेले. आपले जीवन पण या बागेसारखेच वाळून कोळ झालेय. मनात विचार चक्र चालूच होतं ….’किती अभिमान होता मला आपल्या बागेचा आणि समृद्ध आयुष्याचा. पण हाती काय लागलं ?’विचार.. विचार… नुसतेच विचार!

सहजच त्या पुढे झाल्या आणि कुंड्यातल्या वाळलेल्या रोपट्यांच्या काड्या मोडू लागल्या. वाळकी रोपं उपटू लागल्या….आणि जशा त्या वृंदावनातल्या तुळशीच्या काड्या उपटू लागल्या तशी एक किमयाच घडली…… डोळ्यावर विश्वास ठेवणंच शक्य नव्हतं… अद्भुत… अतर्क्य…..तुळशीच्या वाळलेल्या रोपट्यांच्या मुळात त्यांना दोन हिरवे तजेलदार छोटेसे टिपके दिसले. जिवंतपणानं चमकत दमकत असलेले… चष्म्याची काच पुसून निरखून त्यांनी खात्री करून घेतली. होय ,ती तुळशीची इवली इवली, पोपटी पानंच होती. हा सुखद आश्चर्याचा मोठा धक्काच होता.खरंतर या दुष्काळी प्रांतात महिनोंन् महिने पाणी न मिळाल्यानं इतर झाडं, रोपं ,वेली वाळून कोळपून गेल्या होत्या.पण तिथंच हे तुळशीचं रोप पुन्हा मुळातनं जिवंत होऊन उठलं होतं. इतक्या विपरीत, खडतर परिस्थितीत आपलं अस्तित्व टिकवून ठेवून होतं…. आपल्या जिवंतपणाची साक्ष देत होतं. त्या भारावून गेल्या.अत्यानंदानं त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंबरोबर जणू त्यांच्या मनातील मळभ आणि अवसाद ही वाहून जात होता. मन ज्या दु:खाला कवटाळून बसलं होतं ते आपलं दुःख किती क्षूद्र आहे. आलेल्या कठीण परिस्थितीचा आपण धैर्याने सामना केला पाहिजे त्या इवल्याशा रोपट्यासारखा.असे विचार मनात येताच एक अपूर्व शांतीनं त्यांचं मन भरून गेलं. असा अनुभव त्यांना पूर्वी कधीच आला नव्हता. तुळशीच्या रोपातली जगण्याची तीव्र इच्छा त्यांच्यातला आशावाद जागृत करून गेली. नव्या चैतन्यानं त्यांचं मन भरून गेलं.जे काहीतरी आपल्यातून निघून गेलेय हरवलंयअसं त्यांना वाटत होतं…. ते.. हे चैतन्यच!… त्यांच्या मनाला उभारी आली.  त्या इवल्याशा दोन पोपटी पानांनी केलेल्या किमयेमुळं त्यांच्या मनाची सगळी कवाडं उघडून गेली. तिथे आता किंतू-परंतूला जागाच उरली नव्हती. आता जीवन यात्रेतील पुढची वाट त्यांना स्वच्छ प्रकाशानं उजळून गेल्या सारखी वाटत होती.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments