जीवनरंग
☆ उंबराचे फुल- संस्कारमूर्ती श्री. एस.बी. पाटील सर भाग – 1 – लेखक – श्री सुभाष मंडले ☆ प्रस्तुती – श्री मेघशाम सोनवणे ☆
सुख हे एखाद्या वार्यासारखे फुंकर मारून मनाला सुखाचा ओलावा देते, तर दु:खाचे वारे हे उन्हाळ्यातल्या गरम वार्यासारखे चटके देऊन जाते. आयुष्यात आलेली सुख दु:खं ही झोपाळ्यासारखी कधी मागे, तर कधी त्याच वेगाने पुढेही निघून जातात. मात्र अशा दोन्ही वेळेस मनाला कसे सावरावे, हे सांगणारे क्षण कधीच विसरता येत नाहीत. त्यापैकीच एक २००५ सालीची ही गोष्ट…
सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर सुरवातीला केमिस्ट्री विषयातील रासायनिक संयुगे, त्यांची रेणूसूत्रे पाहिली की वाटायचं लॅबमधील अनेक रसायनांची डोक्यात नुसती घुसळणच सुरू होईल की काय… पण शरीराने उंच, धडधाकट, ऐन पस्तीशीत अभिनेत्यासारखे दिसणारे पाटील सर यांनी वर्गात पाऊल टाकले, की एक खांदा किंचितसा उडवून हसतमुख चेहऱ्याने सर्वांवर नजर फिरवायचे आणि नंतर शिकवायला सुरुवात करायचे. केमिस्ट्रीतील प्रत्येक मुद्दा, जसं विनोदी किस्सा सांगितला जातो तसं ते सांगायचे. यामुळे केमिस्ट्री विषयासह सरांची आणि विद्यार्थ्यांची चांगलीच केमिस्ट्री जुळलेली. त्यामुळे शिकत असताना कधी कोणाच्या डोक्यात रंगीत, गुलाबी दुनियेचा ‘केमिकल लोच्या’ होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
बारावीत असताना एके दिवशी वर्गात त्यांनी ‘तुला शिक्षण घेऊन पुढे काय व्हायचे आहे?’, हे प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले होते. काहींनी ठरवून, तर काहींनी पुढचा काय सांगतोय ते ऐकून, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर अशी वेगवेगळी उत्तरे दिली. अनेकांच्या निरनिराळ्या उत्तरांवर सर्व जण हसायचे. (मी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जसे नाव कमावले, तसं ‘ मी सुभाषचंद्र होईन ‘,असे सांगितले होते. हे असं वेगळंच उत्तर ऐकून अजूनच सगळे हसायला लागले.)
सायन्सच्या वर्गात आम्ही जवळपास साठ एक विद्यार्थी असू. त्या सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, गाव यांची सर्व माहिती पाटीलसर यांना माहीत होती. इतकंच नव्हे, तर आम्हाला सायन्सला केमिस्ट्री विषय शिकवणारे पाटीलसर अकरावी-बारावी आर्टस् , कॉमर्सच्या वर्गातील सुद्धा तीन साडेतीनशे मुला-मुलींना त्यांच्या नाव, आडनावावरून ओळखत होते. यावरून त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्याप्रती असणारा ऋणानुबंध लक्षात येईल…
पाटीलसर कधी कुणाला रागाने बोललेत किंवा ओरडलेत, असं सहसा कधी मी बघितलं नाही. पण योग्य वेळी समोरच्याला बरोबर लागतील अशा ‘शब्दांच्या कोपरखळ्या’ मात्र ते हसत हसत देत असत. वर्गात प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांच्या हातात अंगठ्याच्या जाडीची, हातभर लांबीची छडी असायची. उत्तर चुकले तरी चालेल, पण प्रत्येकाला बोलतं करायचे आणि उत्तरच न देणाऱ्याला मात्र प्रसाद घ्यावा लागायचा.
त्यांच्या तासाला खेळीमेळीच्या वातावरणामुळे त्यांनी छडी मारलेल्याचे विद्यार्थ्यांना एवढे विशेष काही वाटत नसायचे. त्यांच्या हातातली नुसती छडी जरी बघितली, तरी आमच्या डोक्यातली कॉलेजची सारी हवा निघून जायची. वाटायचं ‘आम्ही कॉलेजमध्ये नसून, अजून हायस्कूलमध्येच आहोत !’
दुपारी बारा वाजता कॉलेज सुटायचे. त्यानंतर पाच वाजेपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीन विषयांची प्रॅक्टिकल्स असायची .
बारावीच्या परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले पाहिजेत, यासाठी लॅबमध्ये प्रॅक्टिकल नसेल त्या दिवशी सुद्धा सगळ्यांना दुपारी बारानंतर संध्याकाळी किमान पाच वाजेपर्यंत सक्तीने अभ्यास करत बसायला सांगितले गेले होते.
सर्व जण एकाच ठिकाणी बसल्यामुळे अभ्यास कमी, गप्पाच जास्त रंगत होत्या, त्यामुळे कॉलेजच्या तीन मजली इमारतीत सर्वांना सुट्टे सुट्टे बसून अभ्यास करायला लावले होते.
आमचं बारावीचे महत्वाचे वर्ष चालू असूनही, आम्ही दुपारनंतर कॉलेजबाहेरच्या शेताजवळ एका मैदानावर क्रिकेट खेळत असायचो. शिक्षकांच्या सक्तीमुळे आमच्या क्रिकेट खेळण्यावर मर्यादा आलेल्या. यामुळे अनेकांची बांधून ठेवल्यासारखी अवस्था झाली होती.
क्रिकेट खेळण्याच्या वेडामुळे दोघा तिघांनी यावरही शक्कल लढवली. कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक सभागृह आहे. तिथे काही कार्यक्रम असेल तरच बसण्याची व्यवस्था करून तो खूला केला जात असे. बाकी वेळी तो हॉल पूर्ण मोकळा व बंद असायचा.
एकाने जुन्या मोडलेल्या बेंचचे बॅटच्या आकाराचे फाळकूट व बॉल घेतला व पाच सहा जणांसोबत त्या हॉलमध्ये पोहचलो. बॉलने बाजूच्या स्लायडींग खिडक्यांच्या काचा फुटतील, हे लक्षात आल्यावर रबरी बॉल ऐवजी खोडरबरचा बॉल म्हणून उपयोग केला.
एक टप्पा आऊट नियमानुसार खेळात रंगत येत होती. किरण कांबळे, निलेश सावंत, उद्धव महाडिक, संदिप शिंदे, अभिजित बाबर, मिलिंद आंबवडे, महेश सावंत, गणेश महाडिक…इ. आणि मी. असे सात आठ जण सलग दोन तीन दिवस क्रिकेट खेळत होतो. रोज दुपारी बारा नंतर आम्ही कुठे गायब होतोय हे कुणालाच माहीत नसायचे.
एके दिवशी, नेहमीप्रमाणे हॉलमध्ये दरवाजा, खिडक्या बंद करून आम्ही क्रिकेट खेळू लागलेलो, तितक्यात बाहेरून कुणीतरी दरवाजावर थाप मारत आवाज देऊ लागलं. आवाजावरून अभिजित शिंदे आहे असे जाणवत होते. ‘मी पण तुमच्यासोबत खेळायला आलोय. मला आत घ्या’ म्हणून तो बाहेरून विनंत्या करत होता, पण आदल्या दिवशी आम्ही त्याला ‘खेळायला चल’ म्हणून आग्रह केला होता, तरीही तो आला नाही. त्यामुळे त्याला आत घ्यायचंच नाही, असे म्हणत त्याला तरसवण्यासाठी आम्ही दरवाजा उघडलाच नाही.
खेळताना दंगामस्ती, आवाजाने हॉल नुसता दणाणून गेला होता. दरवाजा, खिडक्या बंद असल्याने आमचा आवाज बाहेर, खालच्या मजल्यावर जात नाही, याची दोन दिवसांपूर्वी आम्ही खात्री करून घेतली होती. सगळे बिनधास्त, मजामस्ती करत क्रिकेट खेळण्यात दंग होतो.
काही वेळाने अजून जोरजोरात दरवाजा थपथपाटत ,”अरे खेळायचं बंद करून लवकर बाहेर या. दरवाजा उघडा. सर इकडेच यायला लागले आहेत.” असा अभिजितने आवाज दिला. आपली क्रिकेट खेळायची हौस अजूनही पूर्ण होऊ शकते, या आशेने तो सरांचा धाक दाखवून, दरवाजा उघडण्यासाठी खोटं बोलत असेल व दरवाजा वाजवत असेल म्हणून आम्ही कुणीही तिकडे लक्ष न देता आम्ही आमच्या क्रिकेटच्या खेळात गुंग झालो.
काही वेळानंतर दाराच्या फटीतून मोठ्याने वेगळ्याच आवाजात दोघा तिघांची नावे घेतलेल्याचा कानावर हलकासा आवाज आला, तसं सगळे जागच्या जागी स्तब्ध, शांत झाले. आवाज खूपच ओळखीचा होता. कुणीतरी हातातली लाकडी फळी घाई गडबडीत कुठेतरी लपवली आणि सर्वजण बंद दरवाजाजवळ गेलो.
दरवाजा उघडायला पुढे कोणीही धजावेना. प्रत्येक जण एकमेकांच्या आडोश्याला दडत होता. पुढे कोणी व्हायचं
हा गहन प्रश्न निर्माण झालेला. तितक्यात पुन्हा, ‘किरण दरवाजा उघड’, असा बाहेरून आवाज आला.
क्रमशः...
लेखक : श्री सुभाष मंडले.
(९९२३१२४२५१)
संग्राहक : श्री मेघशाम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈