सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ बिन आडनावाची पोर – भाग – 5 … श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(मोहनची बदली एका दुसऱ्या शाळेत झाली…त्यामुळे आता त्याचा पार्वतीशी संपर्क तुटला..) इथून पुढे —-
जूनचा पहिला आठवडा सुरू होता.. पार्वतीची शाळा सुरू व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक होते.. पार्वती नववीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास होऊन आता दहावीत जाणार होती…. आश्रमशाळेत ती रुळली होती.. मे महिन्याच्या सुट्टीत सध्या ती म्हातारीकडे आलेली होती.. आता एका आठवड्यात ती शाळेत परत जाणार होती… आज पार्वतीच्या नकळत शांताने सगळ्या बकऱ्या खाटकाला विकल्या. पार्वतीने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली.. पोरी ! आता मी म्हातारी झाले.. आता कुठे त्यांच्या मागे फिरू ? .. आता तू देखिल दोन चार दिवसांनी शाळेत जाशील.. म्हणून विकल्या..
रात्री झोपताना शांता काहीश्या जड आवाजात म्हणाली.. “ पोरी ! आता मी बरीच म्हातारी झाली आहे…आता मी कधी मरेन काही भरवसा नाही. म्हणून तुला काही सांगायच आहे व दाखवायचे आहे…” शांता उठली.. तिने कपडयात गुंडाळलेली मोठी पत्र्याची पेटी काढली…. त्यात अनेक वस्तूंसोबत कुलप लावलेली एक लहान पेटी होती. शांताने ती उघडली. त्यात नोटांची थप्पी होती.. “ पोरी..हे पैसे म्हणजे माझ्या आयुष्यभराची कमाई मी तुझ्यासाठी राखून ठेवली होती…..यात तुझं शिक्षण पूर्ण होईल.” ते पैसे तिने स्मशानातून जे सोनं मिळवलं होतं त्याचे होते.. याची खबर मात्र पार्वतीला नव्हती. तिला वाटले हे आज बकऱ्या विकल्या त्याचे पैसे असतील. “ पोरी! ही पेटी नीट जपून ठेव…..”
सकाळ झाली.. शांता उठली नाही.. पार्वतीने तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला..पण ती काही उठली नाही.. पार्वती आता मोठी होती.. तिला समजले माय देवाघरी गेली… तशी पार्वती खंबीर मनाची होती.. मायला सगळी लोकं भूताळी समजतात हे ती जाणून होती.. पण माय भुताळी नाही हेदेखिल तिला माहिती होतं … कारण इतक्या वर्षाचा सहवास होता तिचा… कधीतरी तसं जाणवलं असतं तिला….तिने डोळ्यांतील अश्रू पुसले…कारण तिच्या मदतीला कोणी येणार नव्हते….रात्री म्हातारीने दिलेली पेटी तिने बाहेर काढली.. झोपडीतील सर्व लाकडे काढून तिने तिच्या लाडक्या मायवर ठेवली… आणि आपल्या दुःखाचा बांध सावरत तिने ती झोपडीच पेटवून दिली… अशा प्रकारे पार्वतीने आपल्या लाडक्या मायचा अंतिम संस्कार केला…. आणि पेटी घेऊन तिच्या आश्रम शाळेकडे निघाली…
पार्वती शाळेत पोहोचली.. शाळा सुरू व्हायला अजून काही दिवस बाकी होते.. मात्र आश्रमशाळा असल्याने अधीक्षक शाळेत हजर होते.. पार्वतीने शाळेत राहू देण्याची विनंती केली..अधीक्षकांनी ती मान्य केली…. शाळा सुरू होईपर्यंत ती अधीक्षकांच्या घरी भांडी पाणी तसेच कपडे धुवून देत असे, त्यामुळे तिची जेवणाची अडचण दूर झाली… काही दिवसांनी शाळा सुरू झाली.. पार्वती यंदा दहावीच्या वर्षाला होती… दिवस जात राहिले… ..
आज मोहनच्या शाळेत लगबग सुरू होती… कारण त्याच्या शाळेत आज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होते… यजमानशाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्याची जबाबदारी मोठी होती…. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खुद्द जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार होते…. कलेक्टर शाळेत येणार म्हणून मोहन व शाळेतील सर्वच शिक्षक स्वागताची व इतर तयारी करत होते………. इतक्यात जिल्हाधिकारी यांची गाडी त्यांच्या लवाजम्यासह शाळेच्या फाटकात आली सुद्धा … मोहन व इतर शिक्षक लगबगीने त्यांच्या गाडीजवळ गेले..गाडीचा दरवाजा उघडला… जिल्हाधिकारी मोहनजवळ येऊन त्याचे पाय धरून म्हणाल्या, “ आशिर्वाद द्या सर!… आज मी तुमच्यामुळेच कलेक्टर होऊ शकले.”…. “ माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत ..पार्वती मॅडम !” …..” हे काय सर?.. मला नुसतं पार्वती म्हणा!.” ..” नाही मॅडम !आज तुम्ही कलेक्टर पदावर आहात… पदाचा मान आहे तो ! आणि तुम्हाला मॅडम म्हणतांना मला कमीपणा नाही, तर आभिमान वाटतोय… “ मोहन आपले आनंदाश्रू आवरत म्हणाला…
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पार्वतीने आपला संघर्ष वगैरेर याचा काहीच उल्लेख केला नाही..पण ज्या व्यक्तीमुळे आपण संघर्ष करायला शिकलो त्या व्यक्तीचा, म्हणजे मोहनसरांचा उल्लेख मात्र तिने आवर्जून आपल्या भाषणात केला… आणि सगळ्यांना असे शिक्षक मिळोत अशी प्रार्थना केली.” .. पार्वतीचे शब्द ऐकून मोहनचे डोळे पाणावले….
कार्यक्रम आटोपल्यानंतर निरोप घेतांना पार्वती पुन्हा मोहनजवळ येऊन त्याच्या पाया पडली.. व पर्समधून काढलेला लिफ़ाफ़ा मोहनच्या हाती देत म्हणाली, “ सर !..तुम्ही जो माझ्या आडनावाचा रकाना रिकामा ठेवला होता.. तो येत्या पंधरा तारखेला लिहिला जाणार आहे…. आणि तुम्ही सहपरिवार मला आशिर्वाद देण्यासाठी नक्की यायचे आहे !…..”
— समाप्त —
लेखक : चंद्रकांत घाटाळ
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२