? जीवनरंग ❤️

☆ शहीदाची बायको – प्रा. हरी नरके ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं इस्लामपूरच्या जवळचं गाव आहे. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू  लोकांचं गाव. “लढावू” लोकांचं गाव!

श्री.अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1980 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारकं उभारण्याचं ठरवलं.

कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू झालं.

कंत्राटदारानं काही मजूर कामावर लावलेले होते.

एक म्हातारी मजूर आजारी होती. तिच्या अंगात खूप ताप होता. तिच्याच्यानं जड घमेली उचलण्याचं काम होत नव्हतं. कंत्राटदारानं घरी जाऊन आराम करा, दवापाणी घ्या असं तिला सांगितलं.

म्हातारी म्हणाली, “बाबा, दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी माझी चुल पेटंल. मी आज काम केलं नाही तर खाऊ काय? मला काम करू दे बाबा, मी पाया पडते तुझ्या.”

म्हातारीचा तोल जात होता. दोनदा तिनदा ती पडतापडता वाचली.

म्हातारी काम करताना पडली तर अपघात होईल आणि आपल्या डोक्याला विनाकारण ताप व्हायचा म्हणून कंत्राटदार चिडला आणि त्यानं तिला हाताला धरून कामावरून बाहेर काढलं.

म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली ” लेकरा, अरं, सरकार ज्यांचं हे स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!”

कंत्राटदार चरकला. म्हातारीला घेऊन तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी म्हातारीला तपासलं. औषधं दिली. कंत्राटदाराला सांगितलं, आजार खूप गंभीर आहे. म्हातारी चार दिवसांचीच सोबतीन आहे. त्याच आजारात बाई गेल्या. स्मारक पुर्ण झालेलं त्या बघू शकल्या नाहीत.

होय, त्या शहीद विष्णू भाऊ बारप्टे यांच्या वृद्ध पत्नी होत्या. अन्नाला मोताद झालेल्या. मजुरीवर पोट भरणार्‍या.

9 ऑगष्ट 1942 ला महात्मा गांधीजींचा “करेंगे या मरेंगे, चले जाव ” चा नारा आला. कामेरीच्या तरूणांनी हातात तिरंगा घेऊन “वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, ब्रिटीशराज चले जाव” अशा घोषणा देत पोलीस चौकीवर मोर्चा काढला. त्या मोर्च्याचा नेता होते, तरूण विष्णू भाऊ बारप्टे.

ब्रिटीश पोलीस अधिकारी जनरल डायरचा भाऊबंध होता. तो भडकला. तुम्हाला काय पायजे? असं त्यानं विचारलं. निधड्या छातीचे विष्णू भाऊ बारप्टे म्हणाले, ” आझादी पाहिजे.” हे घे, म्हणत त्यानं थेट छातीत गोळी झाडली. विष्णू भाऊ बारप्टे जागेवरच शहीद झाले.

त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्यांची तरूण पत्नी विधवा झाली.

ब्रिटीश पोलीसांनी तिचाही अपार छळ केला. बाई काही काळ गाव सोडून परागंदा झाल्या. पुढं स्वातंत्र्य मिळालं. बाई गावी परत आल्या. मजुरी करून जगू लागल्या.

स्वातंत्र्यसैनिकांना सरकारनं ताम्रपट दिले. मानधन सुरू केलं. “आपलं माणूस राहिलं नाही, आता त्या ताम्रपटाचा काय उपयोग? फुकटचं मानधन मला नको ” म्हणून बाणेदार बाई मजुरी करून पोट भरायच्या. बाईंनी आयुष्यभर विधवापण सोसलं. अंगावर निभावलं. जवानी जाळीत निभावलं. ती शहीदाची बायको होती.

क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिन यांच्या निमित्ताने या लढाऊ, झुंझार शहिदपत्नी, स्मृतीशेष बायजाबाई बारप्टेंना विनम्र अभिवादन. कृतज्ञ वंदन!

लेखक : प्रा. हरी नरके

प्रस्तुती :  सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments