जीवनरंग
☆ शिशिर सरला… भाग – 2 – लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
(तुम्ही असं फ्लॅट भाड्याने घेऊन राहिलात तर माझ्या मनाला यातना होतील. सध्या पुण्यातच आपल्या घरी राहा.” ) – इथून पुढे —-
त्यावर वसंता काही बोलला नाही. सकाळी उठून निघण्यासाठी तयार झाला आणि चहा घेऊन बाहेर पडला. हळूहळू पावलं टाकत तो बस स्टॅंडकडे निघाला. अचानक पावसाची भुरभुर सुरू झाली. कुठंतरी आडोसा शोधत होता. शेजारीच एका प्रोजेक्टचं काम सुरू होतं. काही फ्लॅटमधून लोकांची उपस्थिती जाणवत होती.
वसंता सरळ तिथल्या ऑफिसमधे जाऊन पोहोचला. चौकशी केल्यावर सिनियर सिटीजन्ससाठी वन रूम कीचनचे फ्लॅट्स विक्रीस असल्याचं कळलं. तसंच काही फ्लॅट्स जुजबी भाड्याने उपलब्ध होते. “काका दोन मिनिट थांबा. मी फोन करून बघतो. मालकांना यायला किती वेळ लागेल ते विचारून घेतो.” असं नम्रपणे सांगून तिथल्या तरूणाने फोन लावला. त्याचा फोन होईपर्यंत वसंता बाहेरच थांबून राहिला.
मालक दहा पंधरा मिनिटात येत असल्याचं सांगून त्यानं केबिनमध्ये बसायला सांगितलं. केबिनचं दार लोटताच भिंतीवर प्रोजेक्टचा एक भला मोठा फोटो होता. शेजारीच एका दांपत्याचा फोटो होता.
वसंताची नजर धूसर झाल्यानं, फोटो स्पष्ट दिसत नव्हता. त्यानं जवळ जाऊन पाहिलं आणि चपापलाच. तिथल्या स्वीपरला त्यानं त्या फोटोबाबत विचारलं. “काका हेच आमचे मालक आणि मालकीण आहेत!” त्या स्वीपरनं मोठ्या कौतुकानं सांगितलं.
वसंता तिथून पटकन बाहेर पडला. सिक्युरीटीवाल्यानं थांबवलं. “काका, फक्त थोडा वेळ थांबा. ते निघालेच आहेत. इथे तुमच्यासारखे कित्येक वृद्ध लोक राहतात. ज्यांना आवश्यक असेल त्यांना जेवणाचे डबे आणि वैद्यकीय सेवाही पुरवली जाते. अर्थात त्याचा वेगळा चार्ज पडतो. पण वृद्धांची इतकी कोण देखभाल करतो हो? आमचे मालक आणि मालकीण खूपच कनवाळू आहेत.”
“आता आलोच” असं म्हणून वसंता थेट बसस्टँडवर येऊन पोहोचला. स्वत:च्या जावयाने आणि लेकीने आपल्या डोळ्यांत अशी धूळ झोकावी ह्याचा त्याच्या मनाला चटका लागला. आणखी एक मार्ग बंद झाला.
आता अमेयला फोन करावा आणि सरळ युएसला जाऊन किमान सहा महिने तरी राहून यावं, असा विचार करतच वसंता घरी आला. लगोलग अमेयला फोन लावून नातवांना येऊन भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर “बाबा, सध्या इथं क्लायमेट बरं नाहीये. तुम्हाला त्रास होईल. पुढच्या वर्षी बघू कधीतरी.” मुलानं गंभीरपणे सांगितलं आणि फोन ठेवला.
वसंता विमनस्क मनस्थितीत जवळच्या बागेत जाऊन नेहमीच्याच बेंचवर विसावला आणि आपल्याच विचारात गढून गेला. थोड्याच वेळात, एक तरूण येऊन शेजारीच बसला आणि त्यानं आवाज दिला, “काका कसे आहात? मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून इकडे आलोय.”
वसंता भानावर येत कसंबसं बोलला, “ शेखर, तू इकडे कसा? आणि हो, तू काय बोलणार आहेस ते मला ठाऊक आहे. बॅंकेतल्या लोनबद्दलच ना? मी पैसे भरून टाकेन. तू त्या कर्जाला जामीनदार आहेस. मी तुला कसलीही तोशीस लागू देणार नाही. कळलं?”
“ काका, मला तुमच्या ऋणातून काही अंशी का होईना मुक्त व्हायचं होतं, म्हणून मी त्या कर्जाची संपूर्ण रक्कम भरली आहे. मी आता तुमच्याकडे एक विनंती करायला आलोय. मी काही वावगं बोललो असेन तर मला माफ करा. कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यावर, तुम्ही फक्त ऑफिसात येऊन बसा. क्लाएंट्स हॅन्डल करा. ज्युनियर्सना मार्गदर्शन करा आणि….”
“ नको, शेखर. हा तुझा मोठेपणा आहे. मुळात माझा हातगुणच वाईट आहे. किती कष्टाने मी अमेयला शिकवून एवढं कर्तृत्ववान केलं, तो निष्ठुर झालाय. ठेवी मोडून, कर्ज काढून ज्या लेक जावयाला मायेने मदत केली त्यांनी माझ्याशी खोटं बोलून मला दगा दिला. मी तुझं काय भलं करू शकणार आहे सांग?”
“ काका, अहो ज्या कोणाला तुमच्या शुभंकर हातांचा स्पर्श होतो त्यांचं सोनं होऊन जातं. इतरांचं माहीत नाही पण माझ्या व्यवसायाची भरभराट तर तुमच्याच सानिध्यात, तुमच्या सावलीतच झालेली आहे.”
काही वेळ स्तब्धता पसरली. अचानक थंड वार्याचा एक मुजोर झोत आला. शिशिर ऋतुच्या आगमनानं, पिवळी वाळलेली कितीतरी पानं भिरभिरत उडाली. वसंता खिन्नपणाने म्हणाला, “ पाहिलंस, शेखर? अशीच पानगळ माझ्या जीवनातदेखील सुरू झालेली आहे. नात्यांची पानं अलगद गळून पडताहेत. मायेची फुलंही कोमेजून जात आहेत. मी लवकरच या झाडांच्यासारखाच पूर्णपणे निष्पर्ण होऊन जाईन.”
“ काका, आयुष्याच्या शेवटी एक रम्य संध्याकाळ असावी, असं प्रत्येकाला वाटतं. याच कातरवेळी सगळे हिशेब मनाच्या पटलावर आपोआप उमटायला लागतात. तुम्ही केवळ नात्यातल्या पानगळीने निराश झालात. पानगळीनंतर झाडांना पुन्हा पालवी फुटते हा निसर्गक्रम आहे. मला सावली देणारी दोन्ही झाडेच उन्मळून पडली. तुम्हाला माहीत आहे, गेल्या वर्षभरात मी आईबाबांच्याविना पोरका झालोय. मी काय म्हणावं?” —- वसंताकडे त्याचं उत्तर नव्हतं.
“ आता शिशिर सरला आहे. पानगळ होऊन गेलीय. हा मधला काळ म्हणजे आपल्या आयुष्याच्या वळणावर थबकलेलं एक पाऊल होतं, असं समजू या. काका, मी एकटा पडलोय. माझ्यावर आणखी एक उपकार करा. माझ्या मुलांचे आजोबा म्हणून माझ्या घरीच राहायला या… तुमच्या आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकवार हिरव्याकंच पानांनी बहरत जाणारा वसंत ऋतू नक्की येईल. काका नाही म्हणून नका..” असं म्हणत शेखरने पाणावल्या डोळ्यांने दोन्ही हात जोडले.
शेखरचे दोन्ही हात हातात घेऊन त्याला पाठीवर थोपटत, वसंताने होकारार्थी मान डोलावली. शेखर आनंदाने भारावून गेला. “ काका, उद्या सकाळी बॅग भरून तयार राहा. मी तुम्हाला न्यायला येतोय. पुढच्या आठवड्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी अपाइंटमेंट घेतोय.”
वसंताला आता आयुष्यातल्या खऱ्या वसंत ऋतूची स्पष्ट चाहूल लागली होती….. !
– समाप्त –
लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली.
बेंगलुरू ९५३५०२२११२
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈