श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆
” समजेल, तुलाही समजेल ते.. खरे तर तशी वेळ येऊ नये तुझ्यावर.. पण काय नेम, उद्याचा काहीच भरवसा देता येत नाही. बहुतेकांवर ती वेळ येते. स्वतःलाच स्वतःची अडचण वाटू लागते.. आणि मग कबीर आठवतो. मग तो जागा शोधू लागतो. कुणी उठ म्हणणार नाही, उठवणार नाही अशी जागा. आधी स्वतः बांधलेल्या स्वतःच्या घरात तशी जागा शोधू लागतो. स्वतःच्या घरात जागा मिळत नाही, दारात जागा मिळत नाही. कुणाच्या मनात जागा उरत नाही.. सगळीकडूनच उठवतात रे ! मग वावटळीत पाचोळा भरकटावा तसे भरकटत रहावे लागते. हं ! एक जागा असते, तिथे सारेच घेऊन जातात. स्वतःच्या हातांनी. आपले ओझे खांद्यावर वाहवत. आपली प्रतिष्ठापना केल्यासारखे त्या जागेवर बसवतात, झोपवतात. तिथून मात्र ‘उठ’ म्हणत नाहीत कोणी. पण तो भाग्याचा क्षण प्रत्येकाला वेळेवर लाभतोच असे नाही. ज्यांना नाही लाभत ते भरकटत राहतात .., इथे .. तिथे. पण इथे या ठिकाणी तसे नाही, इथे कसे, यावे वाटले तर यावे. बसावे. उठावे वाटले तर उठावे नाहीतर बसून राहावे. कोणाची काहीच हरकत नसते. “
” बाबा, घरी वाट पहात नाहीत का ? “
” पाहतात ना ! सूर्य ढळल्यावर सूर्य केंव्हा बुडतोय याचीच सर्वजण वाट पहात असतात. एकदा का सूर्य बुडाला की त्यांचीही अडचण सरते.. पण क्षितिजावर सूर्य किती काळ रेंगाळेल हे काही सांगता येत नाही कुणाला. आपल्या हातात थोडेच असते ते ? “
गड नदीच्या पाण्यात अंधाराच्या सावल्या न्हाऊ लागल्या तसा मी उठलो आणि त्यांना म्हणालो,
” बाबा, अंधारून आले. चला निघुया आता. उशीर झाला आणखी तर वाट दिसायची नाही. “
तो हसला.
” तू जा. तुला अजून परतीच्या वाटा दिसतायत. “
” आणि तुम्ही ? “
” येणार तर.. यायलाच हवे. “
त्याच्या स्वरांत हतबलता विसावलेली होती. नकळत त्या बोलण्याला कारुण्याची झालर चिकटली होती. त्याचे ते अगम्य बोलणे माझ्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी दडून राहिले होते.
मी कधीमधी फिरायला तिथेच जायचो. गड नदीतील त्याच विशाल कातळावर विसावायचो. मावळतीची शोभा न्याहाळायचो आणि अंधारून यायला लागले की परतायचो. मला पुन्हा कधी ते बाबा दिसले नाहीत पण तिथे गेले की मला त्या बाबांची , त्या कबीरबाबांची आठवण यायचीच. हो. कबीरबाबाच. त्यांचे नावही मला ठाऊक नव्हते पण माझ्या मनाने, माझ्याही नकळत त्यांचे कबीरबाबा असे नामकरण केलेले होते.
दुपारी जरा कुठे डोळा लागतोय न लागतोय तोच नातवाने मोठ्या आवाजात टेप सुरू केला.
” अरे ss अरे, आवाज जरा कमी करा..”
मी जागेवरूनच ओरडलो पण माझा आवाज काही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. पोहोचला नाही म्हणजे तसा त्याच्या कानापर्यंत पोहोचला असणार पण मनापर्यंत पोहोचला नाही. तयार काही टेपचा आवाज कमी केला नाही.
त्या रॉक-पॉपच्या आवाजात दुपारची झोप, वामकुक्षी झालीच नाही. नुसते पडून राहावे असेही वाटेना म्हणून उठायचा प्रयत्न करू लागलो तर गुडघे कुरकुरायला लागले. अलिकडे गुडघ्यांनाही आपला भार पेलवेना झालाय वाटते.. उगाच मनात विचार आला.
पावसाची काहीही चिन्हे नसताना अचानक वळीव बरसावा तशी अचानक ओळ मनात बरसली.
‘ चदरिया झिनी रे झिनी..’
पुन्हा कबीरच.
क्रमशः...
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली
८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈