श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ ‘आनंदाचे ठसे…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆
अनुभूति म्हणजे अनुभवच पण अलौकिक वाटावा असा अनुभव. सुखद आश्चर्याचा स्पर्श जाणवणारा आणि असह्य दु:खावर अनपेक्षितपणे फुंकर घालावी तशी वेदना शमवणारा ! अनुभूतीचे असे स्पर्श त्या अनुभवात लपलेल्या अनुभूतीच्या चैतन्यदायी प्रकाशाचेच स्पर्श असतात. असा अनपेक्षित स्पर्श जाणवताच मनोमन होणारे विश्लेषण अनुभूतीची साक्ष पटवणारे असते.
क्वचितच कधीतरी अकल्पितपणे एखादा क्षण जणू आपली परीक्षा पहायला आल्यासारखा समोर येऊन जेव्हा उभा रहातो तेव्हा त्या नेमक्या क्षणी आपल्या नैसर्गिक प्रतिक्रियेला आणि कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असते. हे असे प्रसंग मोजकेच असले तरी ते आपला कस पहाणारे असतात. त्या कसोटीला उतरणारे अर्थातच अनुभूतीत लपलेल्या अलौकिक आनंदाचे धनी होतात!
मी स्वतःला असा भाग्यवान समजतो कारण अशा अलौकिक आनंदाचे दान अनेक प्रसंगात माझ्या वाट्यास आलेले आहे. त्या अनुभूतीच्या आनंदाचे ठसे मी मनोमन जपून ठेवलेले आहेत!
मी युनियन बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रॅंचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता तो १९८८ मधला हा प्रसंग. मला अतिशय गूढ, अकल्पित,अतर्क्य अशी अनुभूती देणारा !
त्याचीच ही अनुभव कथा!
‘आनंदाचे ठसे…’ – भाग – १
रहिवासी क्षेत्रातली ती ब्रॅंच. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी कामांची सकाळी ८.३० ते १२ आणि दुपारी २ ते ६ अशी डबलशिफ्ट होती. ब्रॅंचमधे चालत पाच मिनिटात पोचता येईल इतक्या जवळच्या कृषीनगर कॉलनीत माझ्या क्वाॅर्टर्स. त्यामुळे जाण्यायेण्याचा त्रास काहीच नव्हता.या एका अनुकूल गोष्टीच्या तुलनेत तिथली आव्हाने मात्र दडपण वाढवणारीच होती. ते रहिवासी क्षेत्र असल्यामुळे कर्ज वितरण आणि ठेवी संकलन या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणे ब्रॅंच मॅनेजर म्हणून माझ्यासाठी खूप अवघड आणि आव्हानात्मक होते.मी चार्ज घेऊन चार-सहा दिवसच झाले असतील आणि एक वेगळंच नाट्य आकार घेऊ लागलं !
त्या नाट्यातला मीही एक महत्त्वाचा भाग असणार होतो आणि माझी कसोटी पहायला निमित्त होणार होते ते माझेच स्टाफ-मेंबर्स आणि ग्राहक याची मला त्यावेळी कल्पनाही नव्हती.
नेमकं सांगायचं तर एका अलिखित नाटकाचं आमच्याकरवी ते जणूकांही नकळत घडणारं उत्स्फुर्त सादरीकरण असणार होतं जसंकाही!
ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. खरं तर कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमीच तपासून पहात असे.गप्पांच्या ओघात मला मिळालेली माहिती सुदैवाने माझे तिच्याबद्दलचे पूर्वग्रह बदलणारी ठरली होती. रिझर्व्हड् कॅटेगरीतून निवड होऊन एक वर्षापूर्वी ती ब्रॅंचला जॉईन झाली होती.लगेचच नात्यातल्या एका मुलाशी तिचं लग्नही ठरलं होतं. तो एमबीबीएस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर थांबायला हिच्या घरचे. यातून मध्यममार्ग निघतच नाहीय असं पाहून त्या दोघांनीही एक धाडस केलं. घरच्या विरोधाला न जुमानता लग्न करायचं ठरवलं. त्याच्या घरच्यांना हे अर्थातच मान्य नव्हतं. खूप विचार करून त्यांनी मग परस्पर रजिस्टर लग्न केलं. त्याच्या शिक्षणाची आणि घर खर्चाची सगळी जबाबदारी सुजाताने स्वीकारली आणि वेगळं बि-हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि तिची तारेवरची कसरत सुरू झाली.नवऱ्याचं एमबीबीएसचं शेवटचं वर्ष होतं. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी-लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर आला होता! मी ज्या नाट्यपूर्ण प्रसंगाची आठवण सांगणार आहे त्यामध्ये हीच सुजाता बोबडे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार होती हे मात्र तेव्हा मला माहिती नव्हतं!
ब्रॅंचचा चार्ज घेऊन झाल्यावर मी महत्त्वपूर्ण ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. माझ्या घरापासून ब्रॅंचपर्यंतच्या रस्त्यावरच असणाऱ्या ‘लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ चा नंबर मी मनोमन तयार केलेल्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या यादीत सर्वात वरचा होता. या संस्थेच्या बचत खात्यात बरीच मोठी रक्कम शिल्लक असे. शिवाय आठवड्यातून दोनतीनदा तरी थोड्याफार रकमांचा भरणा त्यात नियमितपणे होत असायचा.
आमच्या लहान ब्रॅंचसाठी तर अशा ग्राहकांना सांभाळणे गरजेचेच होते. त्या दिवशी सकाळी थोडं लवकर निघून मी मिस् डिसोझांना भेटण्यासाठी प्रथमच त्या संस्थेत गेलो. मिस् डिसोझा या तेथील प्रिन्सिपल कम् व्यवस्थापक. अतिशय शांत आणि हसतमुख. प्रसन्न चेहरा आणि आदबशीर वागणं. कॉन्व्हेट मधील स्टाफ नन्सची कार्यतत्पर लगबग आणि लक्षात यावी, रहावी अशी काटेकोर शिस्त मी प्रथमच अनुभवत होतो. प्रकर्षाने जाणवणारी प्रसन्न शांतता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच तेजोमय भासणारी येशूची मूर्ती माझ्या मनावर गारुड करतेय असं मला वाटू लागलं!
मी स्वतःची ओळख करून दिली. मिस् डिसोझांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं. गप्पांच्या ओघात मी चांगल्या सहकार्य आणि सेवेबद्दल त्यांना आश्वस्त करून त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा मात्र त्या थोड्या गंभीर झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा लोपला. नजरेतलं हास्यही अलगद विरून गेलं. पण हे सगळं क्षणभरच. लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं आणि….
“सी.. मिस्टर लिमये…” त्या बोलू लागल्या.
आमच्या ब्रॅंचमधील सेवेबद्दल त्या फारशा समाधानी नव्हत्या.कोणताही आक्रस्ताळेपणा किंवा आदळआपट न करता त्यांच्या मनातली नाराजी त्यांनी अतिशय सौम्य पण स्पष्ट शब्दात आणि तेवढ्याच डिसेंटली व्यक्त केली.
हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आमच्या ब्रॅंचमधे आठवड्यातून दोन दिवस, हातातली कामं बाजूला ठेवून त्यांची स्टाफ-नन् पैसे भरायला बँकेत येई.साधारण २५-३० हजार रुपयांचा भरणा करून परत जायला तिला पंधरा-वीस मिनिटांऐवजी किमान दोन तास तरी लागत. घाईगडबडीच्या कामांमधला एवढा अनावश्यक दीर्घकाळ एका स्टाफला स्पेअर करणं मिस् डिसोझाना शक्यच नव्हतं. तत्पर सेवेची, सरळ-साधी अपेक्षा होती त्यांची आणि त्यात मी लक्ष घालावं अशी त्यांनी विनंती केली. बँकेतला एखादा कॅशियर पाठवून आठवड्यातले दोन दिवस इथून कॅश कलेक्ट करणं शक्य होईल कां असंही त्यांनी विचारलं. यातून मार्ग काढायचं आश्वासन देऊन मी त्यांच्या निरोप घेतला.
हा प्रसंग मॅनेजर म्हणून माझ्या दृष्टीने तसा साधा,नेहमीच घडणारा..पण यावेळी मात्र अचानक मिळालेल्या वेगळ्याच कलाटणीमुळे माझी कसोटी पहाणारं नाट्य निर्माण होणार होतं आणि त्यात सुजाता बोबडे इतकाच या मिस् डिसोझांचाही सहभाग असणार होता याची मला कल्पनाच नव्हती.
दोन कॅश काउंटर्सपैकी एक थोडा वेळ बंद ठेवून तो कॅशिअर स्पेअर करणं मला प्रॅक्टिकल वाटत नव्हतं.कारण तसं करायचं म्हटलं तरी इथे पाठवणार कुणाला तर त्या सुजाता बोबडेला.तेही तिच्या अशा अवस्थेत.मला ते रास्त वाटेना.त्यांची कॅश घ्यायला दोन दोन तास कां लागतात हे जाणून घ्यावे या उद्देशाने मी सुजाताला केबिनमधे बोलावलं.’लिटिल् फ्लॉवर’ चा विषय काढताच ती बावरली.
“त्यांची कॅश मी नाही सर सुहास गर्दे घेतात”
“कां?”
ती गप्प बसली. तिचे डोळे भरून आले.
“ठीक आहे.तू जा.सुहासला पाठव.मी त्याच्याशी बोलेन”
ती उठली. खाल मानेनं केबिनबाहेर गेली. त्या क्षणी मला तिचा भयंकर राग आला आणि तिची कींवही वाटली.
सुहास गर्देंकडून जे समजलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं. प्रश्न मी समजत होतो तेवढा गंभीर नव्हताच. एरवी स्ट्रिक्ट डिसिप्लिन असणाऱ्या मिशनरी सिस्टीममधल्या ‘लिटिल फ्लॉवर’ मधील स्टाफ नन्स आणि मिस् डिसोझांनाही बँकिंग व्यवहारातल्या मूलभूत नियमांची प्राथमिक जाणही फारशी नव्हती. रोख भरणा करण्यासाठी आणलेल्या नोटा उलट सुलट कशाही लावलेल्या असायच्या. शिवाय पैसे भरायच्या स्लिपमधे नोटांचे विवरणही बिनचूकपणे भरलेले नसायचे. त्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या स्वतः करून त्या स्टाफ ननसमोर पैसे मोजून घेताना तिला थांबायला तर लागायचंच शिवाय त्या कामात गुंतून पडल्यामुळे सुजाताच्या काऊंटरसमोर ग्राहकांची हीs गर्दी व्हायची आणि सुजाता भांबावून जायची. म्हणून मग ते काम सुहास गर्देने स्वतःकडे घेऊन सुजाताचा प्रश्न सोडवला आणि त्या स्टाफ ननला हे प्रोसेस वेळोवेळी समजावून सांगूनही काही उपयोग न झाल्यामुळे ‘लिटिल फ्लावर’ चा प्रश्न मात्र लटकूनच राहिला होता. तो आता मलाच पुढाकार घेऊन सोडवणं भाग होतं.
पूर्व नियोजित वेळ ठरवून मी पुन्हा मिस् डिसोझांची भेट घेतली. त्यांना या सर्व नियम व त्रुटी समजावून सांगितल्या. त्याचं महत्त्व विशद केलं. त्या दिवशीची भरणा करायची रोख रक्कम व स्लिप मागवून घेतली. त्यांनी स्टाफ ननलाही समोर बसवून सगळं समजून घ्यायला सांगितलं. नोटा कशा अरेंज करायच्या,कशा मोजायच्या व त्यांचं विवरण स्लिपमधे कसं भरायचं हे मी स्वतः करून दाखवलं.
“ही कॅश आणि स्लिप मी आता घेऊन जातो. वेळ मिळेल तेव्हा स्टाफ ननला पावती घेण्यासाठी पाठवून द्या” असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. कॅश व स्लिप बॅंकेत जाताच सुजाताच्या ताब्यात दिली. थोड्या वेळाने स्टाफ नन येऊन काऊंटर स्लिप घेऊन दोन मिनिटात परतही गेली. एका गंभीर बनू पहाणाऱ्या प्रश्नाचं सहजसोपं उत्तर सर्वांसाठीच सोईचं होतं हे लक्षात आलं आणि मग आठवड्यातून दोन दिवस बँकेत येताना त्यांच्याकडे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मीच ती बँकेत आणू लागलो.
क्रमश:..
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈