सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ मी पण लहानच आहे नं?… भाग (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

आणखी एक गोष्ट आहे. मी लहान होतो, तेव्हा पप्पा माझ्यावर खूप प्रेम करायचे. सुट्टीच्या दिवशी तर मी किती तरी वेळ पाप्पांच्या पाठीवर, पोटावर खेळत राह्यचो. पप्पांचं पोट उलटी थाळी ठेवल्याप्रमाणे काहीसं फुगलेलं होतं. ते पलंगावर उताणं झोपून मला पोटावर बसवत आणि जोराजोरात श्वास घेऊन सोडत, तेव्हा मला वाटायचं मी उंटावरून फिरतोय. मम्मी पण सुट्टीच्या दिवशी तेल लावून अंगाला खूप मालीश करून आंघोळ घालायची. पण आज –काल या सगळ्या गोष्टींवर विनयने कब्जा केलाय. परवाच घडलेली गोष्ट सांगितली, तर त्यावरून आपण अंदाज बंधू शकाल. तर परवा काय झालं की मी मम्मीला म्हंटलं, ‘मम्मी माझी नखं काप ना1’ मम्मी म्हणाली, ‘पप्पांच्या शेव्हिंग बॉक्समध्ये नेलकटर आहे. ते काढून तू आपापलीच काढ ना! आता तू मोठा झालायस!’

‘हो, आणखी माहीत आहे का? आज-काल आमच्या घरी कुणी आलं की विनयबद्दलच बोलणं होतं. त्याने केव्हा कोणता खट्याळपणा केला, कुणाला काय सांगितलं, कधी काय खायला मागितलं, कधी काय खाल्लं नाही, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही… इ. इ. आधी कमीत कमी माझ्या अभ्यासाबद्दल तरी बोललं जायचं, मला कुणाच्या पुढे, पोएम म्हणायला किंवा स्टोरी सांगायला सांगितलं जायचं, पण आज-काल माझ्यासाठी कुणाकडे वेळच नसतो. आता कालचीच गोष्ट. अनिकेत अंकल आणि आंटी आले होते. त्यांची बन्नी प्री-केजीमध्ये होती. आत्ता के. जी.त गेलीय. माझ्याच शाळेत आहे. तिच्या डिव्हिजनमध्ये ती सेकंड आली. अनिकेत अंकल आणि आंटीने बन्नीबद्दल किती सांगितलं, तिची टीचर हे म्हणत होती… ते म्हणत होती. मी सेकंड क्लासमध्ये, ए. बी, सी, डी. चारी डिव्हिजनमध्ये फर्स्ट आलो होतो. मी मम्मी-पप्पांकडे बघत होतो की ते माझ्याबद्दल अनिकेत अंकल आणि आंटीशी बोलले की मी माझी रिझल्ट –शीट काढून त्यांना दाखवेन. पण काही नाही. शेवटी मी मम्मीच्या कानात सांगायला तिच्याजवळ गेलो, तर तिने माझं म्हणणं न ऐकताच मला म्हणाली, ‘आम्ही मोठी माणसं  बोलतोय ना! जरा बाहेर जाऊन खेळ बरं!’ अनिकेत अंकल – आंटी खूप चांगले आहेत. के. जी. वनमध्ये माझा रिझल्ट पाहून त्यांनी मला  शंभर रुपये दिले होते.

आज-काल माझी केवळ एकच ड्यूटी असते. आमच्या घरी कुणी आलं की उठून त्यांना नमस्ते करायचं आणि कधी कधी त्यांना पाणी आणून द्यायचं त्यानंतर सारं घर, सारं वातावरण विनयचं होऊन जातं.

आज-काल मम्मी-पप्पा नेहमी विचारतात, मी अलीकडे गप्प गप्प का असतो? काय सांगू मी त्यांना? कितीदा वाटलं, ओरडून ओरडून या सगळ्या गोष्टी, ज्या आपल्याला सांगितल्या, त्या मम्मी-पप्पांना सांगाव्या. पण मला माहीत आहे, ते काय म्हणणार? ते हेच म्हणणार, ‘अनुनय बाळा, तू आता मोठा झालाहेस. तू समजूतदार व्हायला हवंस!’ म्हणून विचार केला की आपल्यालाच सांगावं. मानलं की विनय आल्यानंतर मी मोठा झालो, पण तरीही शेवटी मी पण लहानच आहे नं?

– समाप्त –

मूळ हिंदी  कथा – ‘ मैं भी तो छोटा ही हूँ न  ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments