सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तो दिवस उजाडला. घरीच सगळं आवरून आम्ही कार्यालयात जाणार होतो. मामा मामींनी घेतलेली पिवळी जरीची हिरव्या काठाची साडी नेसून मी तयार होते. माझ्याच केसातल्या मोगऱ्याचा सुगंध मला धुंद करत होता. दाग-दागिने घालून नटून थटून बसले होते. दादा, मामा मामी, आत्या काका, त्या घरच्या लोकांना बोलावणं करायला गेले होते. फुलांनी सजवलेल्या गाडीतून ती लोकं कार्यालयात गेली की आम्ही निघणार होतो .

सगळेजण तयारीनिशी सज्ज होते. मी माझ्या मैत्रिणीच्या घोळक्यात बसले होते. दर दोन मिनिटांनी आई-बाबा आत येऊन मला बघून जात होते. माझं रुपडं डोळ्यात साठवून ठेवत होते. न बोलता, न सांगताही मला ते समजत होतं.

अन अचानक बाहेर चार-पाच मोटरसायकली, दोन-तीन गाड्या येऊन थडकल्या. बाहेर काहीतरी गडबड माजली आणि घराचा नूरच पालटून गेला. बाहेरचा गलका वाढायला लागला. हा आत्ताचा आवाज सुखद नव्हता आनंदाचा नव्हता. त्याचे रूपांतर एकदम जोरजोरात रडण्यात झाले. मला काहीच समजेना. मैत्रिणी ही घाबरून गेल्या. काय झालं? कोणालाच काही समजेना.

माझ्या मावशीचा, काकूंचा, आत्याचा जोर जोरात रडण्याचा आवाज यायला लागला. मी सासरी जाणार, त्यासाठी अशा का रडताहेत त्या सगळ्या? मला काहीच समजेना. कुणाला काय झालं? एवढ्यात माझ्या दादाला धरून दोन तीन मित्र आत आले. दादाचा काळवंडलेला रडवेला चेहरा मला पहावे ना …” दादा s काय ?? ..” माझ्या तोंडातून शब्द फुटेना. दादांनी भिंतीवर लटकणाऱ्या फुलांच्या माळा जोरात ओढल्या आणि सि s मे s म्हणून टाहो फोडला. तेवढ्यात आई बाबा, काका सगळे सगळे माझ्या भोवती गोळा झाले. माझ्या मैत्रिणींना काय करावे समजेना, घाबरून सगळ्या दुसऱ्या खोलीत पळाल्या.

अजूनही मला नक्की कोणाला काय झालय, तेच समजत नव्हतं. माझ्या भोवती आई बाबा दादा हमसून हमसून रडत होते. काय झाले? का रडत आहेत  सगळे? माझ्या पोटात गोळा आला, छाती मध्ये जोराची कळ यायला लागली. ” सिमा s s” म्हणून त्यांनी मला मिठीत घेतलं, तेवढ्यात कुणीतरी माझ्या कपाळावरची चमचमती टिकलीच काढून टाकली. कोणीतरी एकीनं माझे हात हातात घेऊन माझा चुडा बुक्यानी फोडायला सुरुवात केली.

कार्यालयात जायचं सोडून असं का करताय त्या? मला समजेना. तेवढ्यात मला पोटाशी घेत आई जोरात रडत म्हणाली, “सीमे s कसलं ग नशीब घेऊन आलीस? अक्षता पडायच्या आधी त्याला हार्ट अटॅक आला. सीमे ग संपले सारे ss काय झालं ग माझ्या पोरीचं ! काय करू गं ?..” म्हणून आईने हंबरडा फोडला.

आईच्या त्या तशा बोलण्याचा, रडण्याचा संदर्भ मला समजला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काही समजेनासे झाले आणि मी धाडदिशी भोवळ येऊन खाली कोसळले.

तब्बल चार दिवस मी बेशुद्ध होते. थोडी शुद्ध आली तर आजूबाजूला फक्त सन्नाटा आणि हुंदके …. हुंदके आणि सन्नाटा. चार दिवसांनी डोळे उघडले तर आत्या आणि तिची डॉक्टर मैत्रीण माझ्याजवळ होत्या. आत्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्या डॉक्टर बाईनी मला तपासले आणि कुणाला तरी माझ्यासाठी कॉफी आणायला सांगितली. मी मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले, समोरचे अंधुक अंधुक दिसत होते. समोर बाबा डोक्याला दोन्ही हात लावून बसले होते. आई गुडघ्यात डोकं खुपसून स्फुंदत होती. तिला धरून मावशी बसली होती. मी माझ्या कोरड्या ठणठणीत पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. तोंड कडू झाड झाले होते. तोंडातून शब्दच फुटत नव्हता. ” दादा s s” कशी बशी मी हाक मारली.

आता आत्याचे डोळेही वहायला लागले. दादाला त्याच्या प्रिय मित्राच्या दिवसांसाठी जावे लागले होते. त्याचा मित्र आणि माझे सर्वस्व ….चार दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवून मला पुन्हा गरगरायला लागले. माझे पांढरे डोळे बघून त्या डॉक्टरीण बाईंनी माझ्या दंडात सुई खूपसली. सलग दोन महिने तसा प्रकार सुरू होता. मी आजारी, दुखणेकरी, आई अखंड रडत आणि बाबा डोकं गच्च धरून. दादाची नोकरी ही नवीन असल्यामुळे त्याला फार दिवस घरी राहता येईना. आत्या, मावशी, काका काकू आलटून पालटून येऊन आमच्या जवळ रहात होत्या.

धो धो पाऊस पडून, पूर यावा, तसं आमचं घर अखंड रडत होतं. कुणाचं रडणं थांबत नव्हतं. सगळ्यांना इतका जबरदस्त शॉक बसला होता की कोणीच कोणाला सावरू शकत नव्हतं. इतर नातेवाईक, मैत्रिणींच्या आया सगळे सारखे येत होते. माझ्याशी कोणी डायरेक्ट बोलत नसले, तरी काही ना काही माझ्या कानावर येत होते.

अक्षता पडून जरी माझे लग्न झाले नसले, तरी लग्नाची हळद लागली होती. त्यामुळे माझे पुन्हा लग्न होणे अशक्य होते. झालंच तर एखाद्या विधुराशी … म्हणजे ज्याची पहिली बायको मेली आहे, ज्याला एखाद दुसरं मूल आहे. ते तसलं बोलणं, ती कुजबुज, सगळ्यांचे निश्वास अन रडणे ऐकून मी फार भेदरून गेले होते. मलाही त्याच्यासारखा हार्ट अटॅक का येत नाही असेच वाटत होते.

अक्षरशः सहा महिने असे दुःखात गेले. सहा महिन्यांनी आत्या, तिचे डॉक्टर मिस्टर आणि माझा दादा ठरवून आमच्याकडे आले. आत्याच्या मिस्टरांनी आई-बाबांना आणि मला खूप समजावलं. या दुर्दैवाच्या फेऱ्यातून  मी बाहेर पडायलाच पाहिजे असं त्यांनी जरा ठणकवलच.

माझं बीएससी झालं होतं. आता घरी नुसतं रडत न बसता, पुढच्या वर्षीच्या एम एस सी च्या परीक्षेसाठी मी तयारी करावी असं त्यांचं मत होतं. त्या अभ्यासासाठी ते मला त्यांच्याकडे घेऊन यायला तयार होते. आई-बाबांनीही गाव सोडून दादा जिथे नोकरी करतोय, तिकडे थोडे महिने तरी जावं असं त्यांनी पटवलं. सगळ्यांनाच मोठा बदल हवा होता.

मला त्यांचं एक म्हणणं पटलं आणि आवडलं. ते म्हणजे मी शिकण्यामध्ये माझं मन गुंतवलं पाहिजे. त्यांनी लग्नाबद्दल काही उच्चार केला नाही. त्यामुळेच खरं तर मला त्यांच्याबरोबर जावसं वाटलं. मलाही थोडा मोकळा श्वास घ्यावा असा वाटायला लागलं होतं. आमच्या या गावामध्ये मी घराच्या बाहेरही पडू शकत नव्हते. लोकांच्या त्या नजरा, ती कुजबुज मला नकोशी झाली होती. आई-बाबांना सोडून राहायचं जीवावर आलं होतं. पण त्यांच्यासाठी सुद्धा तेच आवश्यक होतं.. मी समोर दिसले की त्यांना परत परत ते दारूण दुःख समोर येणार होतं. त्यापेक्षा काही दिवस लांब राहूनच दुःखाची तीव्रता कमी होऊ शकणार होती.

त्या दिवसापासून पुढच्या शिक्षणाबद्दल मी विचार करायला लागले होते. एम एस सी च्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करायचा, म्हणजे परत स्टॅट आले. मॅथ्स आले . . . . पुनः त्याची आठवण .. छे .. छे .. छे . .. ते तर आता मला नको होते. तो कप्पा, तो मार्ग पूर्णपणे मला बंद करायचा होता. आत्याच्या घरी राहायला जायचे म्हणजे सुद्धा सोपे नव्हते. त्यांच्या घराला लागूनच त्यांचे हॉस्पिटल होते. सतत माणसांचा राबता होता. अशा ठिकाणी जुळवून घेणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण आता पक्के ठरवले होते, जुने पाश तोडून टाकायचे होते.

क्रमशः – 2

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments