सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ भूकंप – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
अखेर मोठ्या मेहनतीने मी एमबीबीएस झाले . आई बाबांची सीमा डॉक्टर झाली .यावेळी मात्र मी दादाकडे जायचं ठरवलं. त्या एका घटनेनं आमचं सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त झालं होतं. तो निघून गेला होता. पण आयुष्यात भली मोठी पोकळी निर्माण करून गेला होता .
दादाकडे आल्यावर मला माहेरी आल्यासारखं वाटलं, पण क्षणभरच! सासरी कुठे गेले होते मी? कधी जाणार पण नव्हते. त्यामुळे तो विचारच झटकून टाकला. दादा चे घर, आई-बाबांनी नेटकेपणाने मांडले होते. आईचे स्वयंपाक घर म्हणजे चकाचक. पण यावेळी मात्र आई सगळे काम नाईलाजाने करते असं मला जाणवलं. सगळी कामं करणं तिला झोपत नव्हतं. खरंच तिला मदतीची गरज आहे हे मला जाणवलं .
खरं तर एव्हानाना दादाचं लग्न व्हायला हवं होतं. आम्ही आमच्या दुःखात इतके बुडालो होतो, की त्याचा विचारच केला नाही. त्याची काय चूक आहे या सगळ्यात? त्यानं का शिक्षा भोगायची ? या विषयावर त्याच्याशी बोलायचं मी ठरवलं, आणि क्षणात मला माझ्या त्या मैत्रिणीची अर्थात त्याच्या बहिणीची, माझ्या न झालेल्या नवऱ्याच्या बहिणीची आठवण झाली. ती लोकं कशी असतील ? त्यांनी हा आघात कसा सहन केला असेल ? त्या सगळ्यांचा तर एकुलता एक आधार मंगल क्षणी अमंगल करून गळून पडला. त्याच्या बहिणीचे लग्न झाले असेल का ? दादालाच काही माहिती आहे का विचारावं. त्याच्यापुढे हा प्रस्ताव आपणच मांडूया .
“अगं, काय बोलते आहेस सीमा? तू इतकी दुःखामध्ये पिचत असताना मी लग्नाचा विचार तरी करू शकेन का ? आणि तिची चौकशी का करतेस तू ? तुझं तुला कमी का दुःख आहे ?” दादा माझ्यावर जरा रागावला.
“अरे दादा, रागावू नको . थोडं शांतपणे घे . मी आता कुठे दुःखात आहे सांग बरं? अरे, आता मी डॉक्टर झालीय . पोस्ट ग्रॅज्युएशनही करणार आहे . माझी ही नवी वाट मला मिळाली की नाही ? तशीच आता तुमच्या आयुष्यातही नवीन वाट शोधूया . तुझ्या मित्रांकडून तिची माहिती काढ बर ! की आता तेही मीच करू? मी पण थोडं दरडावूनच विचारलं .
“सॉरी सॉरी . रागावू नको आपण तिची नक्की चौकशी करू . मी मित्रांना सांगतो . मला तुझं हे म्हणणं पटतय हं थोडं थोडं!”
कधी नाही तो माझा नेम बरोबर लागला होता . त्याच्या बहिणीचे लग्न अजून झालं नव्हतं . कारण त्यांचं घर या दुःखाच्या डोंगरामध्ये पार चेपलं गेलं होतं . ती एम. कॉम. झाली होती, पण दुःखी आई-वडिलांची सेवा करतच दिवस ढकलत होती.
मी आणि दादांनी आई-बाबांना आमच्या विचार पटवून दिला. सुरुवातीला ते अजिबात तयार होत नव्हते . पण अखेर त्यांना पटवण्यात आम्हाला यश आलं .
आता त्याच्या आई-वडिलांना आणि तिला समजावायचं मोठं काम आम्ही करणार आहोत . त्याच्यासाठी सगळ्यांना मुंबईला आणणार आहे . अर्थात हे काम दादाचा दुसराच एक मित्र करणार आहे . मी त्या सगळ्यांची खूप खूप वाट पाहतीय .
मला माहिती आहे की पुन्हा एकदा फार मोठा भूकंप होणार आहे . वादळ उठणार आहे . धुव्वाधार पाऊस कोसळणार आहे . पण … पण कालांतराने ते वादळ शमणार आहे. तो पाऊस कोसळल्यानंतर भूमी शांत होणार आहे . आशेचं बी रुजणार आहे . आनंदाचे कोंब पुन्हा फुटणार आहेत . त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे आणि दादाच्या घरी नंदनवन फुलणार आहे . माझेही कासावीस मन तृप्त होणार आहे . शांत शांत होणार आहे .
– समाप्त –
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 9272496385/8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈