श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

काल स्टीव्हचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आज तो गेला. काही न बोलता त्याचं असं निघून जाणं मन स्वीकारत नव्हतं. वाटत होतं आता एवढ्यातच त्या कापडाच्या भिंतीपालीकडूनावाज येईल, ‘ हे रोझ, सगळं ठीक आहे नं? चल, फिरायला जाऊ.’

‘पाच मिनिटानंतर जाऊ या.’

त्या पाच मिनिटात ती आपले केस सारखे करेल. कोरड्या ओठांवरून चॉपस्टिक फिरवेल आणि चप्पल घालून त्याच्याबरोबर बाहेर पडेल. मग ते दोघे खाली व्हरांड्यापर्यंत जातील. हवा चांगली असेल, तर आणखी थोडे पुढे जातील. त्यानंतर त्याच्या गमतीदार गोष्टींना हसत ती पत्ते खेळत बेसल. नंतर ते पेपर वाचतील आणि मग पुन्हा आपआपल्या खोलीत बंदिवान होतील.

अशा तर्‍हेने का कुणी जग सोडून निघून जातं? रोझासाठी हे केवळ एकाकीपण नव्हतं. खूप काही कष्टदायक होतं. त्या बरोबरच पडद्याच्या त्या हलत्या भिंतींकडे पाहता पाहता वाटू लागलं होतं, उद्या कुणाचा नंबर असेल, कुणास ठाऊक? आणखी किती लोक हॉस्पिटलसाठी नाही, तर आपल्या अंतीम यात्रेसाठी इथून प्रस्थान करताहेत. तसंच झालं. दुसर्‍या दिवशी सकाळी जवळ जवळ सगळे लोक गेले तरी होते किंवा मग आपापले उरलेले श्वास मोजत होते.

कदाचित जीवनातला तो सगळ्या दु:खद दिवस असेल, त्या दिवशी आस-पासचे सगळे ओळखीचे चेहरे निघून गेले होते. रोझा ना खाऊ शकली होती, ना झोपू शकली होती. रात्र सरता सरत नव्हती. ती अंधारी होती, इतकी अंधारी की वाटत होतं आज सूर्य उगवणारच नाही. तिलाही जाणवायला लागलं होतं की शरीरात काही तरी गडबड आहे. श्वास घ्यायला त्रास होत आहे. अजब अशी बेचैनी वाटतेय.  सगळ्या प्रकारचं सामाजिक दूरत्व असतानाही सूर्य उगवता उगवता कोरोनाची सगळी लक्षणं रोझामध्ये दिसू लागली होती. तिलाही हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं. अनेक मित्रांच्या हास्याने भरलेलं ते नर्सिंग होम आता मृत्यूचा अड्डा बनलं होतं. ते पलंग, जे दिवस –रात्र मदतीसाठी याचना करत होते, ते आता मूक होते. एकावेळी पस्तीस जणांचा झालेला मृत्यू आता छ्तीत्तीस आकडा पूर्ण करण्याच्या प्रतिक्षेत होता.

या महामारीत हॉस्पिटलमध्ये जाणं आजार्‍याला अधीक आजारी बनवण्यासारखं होतं. ती जे बघू इच्छित नव्हती, तेच तिचे डोळे बघत होते. बाहेरच्या लॉबीत कुठे उलटी करण्याचा, कुठे थुंकण्याचा आवाज येत होता. चार-पाच तासांचा वेळ साईन-इन करण्यासाठी लागणार होता. कुणी भिंतींचा आधार घेऊन उभे होते. कुणी फरशीवरच झोपले होते. पलंगासाठी कॅरिडॉरमध्ये ही प्रतीक्षा होती. रूम रिकामी नव्हती. सगळ्या जागा, मग त्या डॉक्टरांच्या बसण्याच्या असोत, वा नर्सेसच्या, रूग्णांच्या वॉर्डमध्ये बदलल्या होत्या.

संपत जाणार्‍या संसाधंनाबरोबरच हॉस्पिटलच्या प्रशासकांना एकाच वेळी अनेक मोर्चांवर लढताना, रूग्णांच्या क्रोधालाही निपटावं लागत होतं. रागाने एका रुग्णाने जवळून जाणार्‍या एका डॉक्टरचा मास्क हिसकावून घेत म्हंटलं , ‘आम्ही आजारी आहोत, तर तुम्हीही आजारी पडा. एकदमच मरू सगळे!’

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

हृदयस्पर्शी कथा!