श्री राजीव गजानन पुजारी

? जीवनरंग ?

☆ आर्यनची नौका – एक विज्ञान कथा…भाग 2 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आठवडाभर राहून दोघे कामावर रुजू झाले.) इथून पुढे —- 

एके दिवशी इस्रोचे चेअरमन बी. सिवाप्पा यांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली व सांगितले, “आपणा सर्वांना माहित आहेच की, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पृथ्वीच्या ऋतूचक्रावर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे

सजीवांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. पॅरिस परिषदेसारख्या अनेक परिषदा घेऊन वा करार करूनही या परिस्थितीत फारसा बदल होत नाही आहे. तज्ञांच्या अनुमानानुसार येत्या सुमारे ७० ते ७५ वर्षांत मानवाला विश्वात दुसरीकडे कोठेतरी वसाहत करावीच लागेल. आपल्या माननीय पंतप्रधानांनी आमच्याशी विचारविमर्श करून मंगळग्रहावर वसाहत करण्याच्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलण्यास सांगितले आहे. मी या प्रकल्पासाठी श्री आर्यन जोशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व सौ. मधुरा जोशी यांची मुख्य वैज्ञानिक तसेच समन्वयक म्हणून निवड करत आहे. आपण सर्वांनी मिळून हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडूया. जय हिंद! “

आर्यन व मधुरा यांचे सर्वांनी अभिनंदन केले. यानंतर श्री.आर्यन जोशी यांनी सर्वांची बैठक बोलावली. यावेळी आर्यन जोशी म्हणाले, ” पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. आपल्या हातात वेळ अत्यंत कमी आहे. आपण सर्वजण आतापासूनच कामाला लागूया. आपल्या पुराणातील मनूच्या नौकेची गोष्ट सर्वांना माहित असेलच. तर आपण आपल्या यानातून पृथ्वीवरील सर्व सजीवांचे नमुने घेऊन जाऊ व मंगळावर प्रतिपृथ्वी उभारू. आपणास माहित आहेच की, गेली कित्येक दशके आपण संपूर्ण विश्वात ‘ कोणी आहे का तिथे? ‘ अशी हाक देत आहोत. पण या हाकेला उत्तर येत नाही आहे. तेव्हा पूर्ण विश्वात तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले आपणच आहोत. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, कणाद, वराहमिहीर, न्यूटन, आइन्स्टाइन यांनी रचलेल्या पायावर आपण अतुलनीय अशी वैज्ञानिक प्रगती केली आहे. आपल्याला सौरमालेतील सर्व ग्रह व उपग्रह याविषयी माहिती आहेच. त्याशिवाय सौरमालेबाहेरील तारे, ग्रह यांचेविषयीची माहितीसुद्धा व्हॉयेजरसारखी अवकाशयाने, तसेच हबलसारख्या दुर्बिणी यांचेद्वारा आपण मिळवली आहे. आपण अणूगर्भाचा शोध घेतला आहे, पुंजयांत्रिकी (क्वांटम मेकॅनिक्स ), नॅनो तंत्रज्ञान यांमध्ये आपण विलक्षण प्रगती केली आहे. हे सर्व ज्ञानभांडार आपण एका सुपरकॉम्प्युटरवर घेणार आहोत. तो सुपरकॉम्प्युटर आपण मंगळावर घेऊन जाऊ, जेणेकरून आपणास मंगळावर आदिमानव बनून चाकाचा शोध लावण्यापासून सुरुवात करायला नको. पृथ्वीवर आपण ज्या चुका केल्या आहेत की ज्यामुळे पृथ्वीचा विनाश जवळ येऊन ठेपला आहे, त्या चुका आपण मंगळावर नक्कीच करणार नाही. चला तर मग कामाला लागूया.”

त्यानंतर श्री.आर्यन जोशी यांनी सर्व वैज्ञानिक व तंत्रज्ञांचे वेगवेगळे गट करून त्यांना तीन महिन्यांत प्राथमिक अहवाल सादर करायला सांगितला. वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी जुन्या काळात मंगळाविषयी मिळालेली माहिती व मंगळाचे पुनरुज्जीवन (टेराफॉर्मिंग) करण्याच्या दृष्टीने जगभर चालू असलेले संशोधन यांची माहिती घेतली, संगणकावर विविध सिम्युलेशन्स केली, अनेक चर्चासत्रे पार पडली, विचारमंथन (ब्रेन स्टॉर्मिंग) झाले. त्यातून खालील माहिती पुढे आली :

एकेकाळी मंगळ पृथ्वीप्रमाणेच सुजलाम् सुफलाम् होता. त्याला देखील चुंबकीय क्षेत्र होते. त्यामुळे मंगळाच्या वातावरणाचे सौरवादळे व अंतरिक्ष प्रारणे यांपासून संरक्षण होत असे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या फक्त ५३% असल्याने त्याचा गाभा लवकर घनरूप झाला, त्यामुळे त्याचे चुंबकीय क्षेत्र नाहीसे झाले. हे घडले साधारण ४.२ अब्ज वर्षांपूर्वी. हळूहळू पुढील ५० कोटी वर्षांत सौरवादळांमुळे मंगळाचे वातावरण नष्ट झाले. जरी वैज्ञानिक संशोधनाद्वारे आपण मंगळावरील वातावरणाची घनता वाढवली, तरी थोड्याच काळात सौर वादळे व अंतरिक्ष प्रारणे यांमुळे हे वातावरण नष्ट होईल. जर आपणास मंगळावरील वातावरणाची घनता वाढवून ती टिकवून ठेवायची असेल, तर प्रथम मंगळाचे चुंबकीय क्षेत्र पुनरुज्जीवीत करणे आवश्यक आहे. आता जर आपणास चुंबकीय क्षेत्र पुनःस्थापित करायचे असेल तर पूर्ण मंगळ ग्रह तप्त करून त्याचा गाभा द्रवरूप अवस्थेत आणावा लागणार. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. यावर दुसरा उपाय म्हणजे पूर्ण मंगळाभोवती विद्युतचुंबकीय आवरण बसविणे. हे देखील व्यवहार्य नाही. त्यामुळे आपणास शास्त्रीयदृष्ट्या व्यावहारीक उपाययोजना करावी लागेल.

मंगळावरील चुंबकीयक्षेत्र पुनःस्थापित केल्यावर पुढचे काम येते ते म्हणजे मंगळावरील तापमान वाढविणे. सद्यःस्थितीत मंगळाचे सरासरी तापमान -६३°सेंटीग्रेड आहे. उन्हाळ्यात दुपारच्यावेळी विषुववृत्ताजवळ हे तापमान २०° सेंटीग्रेड एव्हढे असते, तर ध्रुव प्रदेशात हेच तापमान -१५३°सेंटीग्रेड असते. मंगळाचे तापमान वाढविण्याचा एक पर्याय असा असू शकतो की, मंगळापासून योग्य अंतरावर अणूस्फोट घडवून आणणे. यामुळे तापमान वाढेल, ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून नद्या, नाले दुथडी भरून वाहतील, ध्रुव प्रदेशातील शुष्क स्वरूपात असलेला कार्बन डाय ऑक्साईड वायूस्वरूपात रूपांतरित होऊन हरितगृह परिणामामुळे संपूर्ण मंगळाचे तापमान वाढेल. पण यात एक धोका संभवतो, तो म्हणजे जर योग्य अंतरावर स्फोट घडवून आणता आला नाही, तर अणुस्फोटामुळे निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे मंगळाचे वातावरण कायमचे बाधित होईल. असे गृहीत धरले की , अणूस्फोट मंगळापासून अशा अंतरावर घडविला की  जेणेकरून किरणोत्सर्ग मंगळापर्यंत पोहोचणार नाही, तरीसुद्धा हे पाऊल सर्व देशांनी मिळून केलेल्या बाह्य अंतराळ कराराविरोधात होईल. दुसरा एक उपाय म्हणजे मंगळ भूपृष्ठापासून काही अंतरावर दोन ते तीन सेंटीमीटर जाडीचे ‘ऐरोजेल’ या पदार्थाचे आवरण कायमस्वरूपी बसविणे. ऐरोजेल हा ९९.८% हवा व ०.२% सिलिका यांपासून बनलेला उष्णतारोधक पदार्थ आहे. यामुळेदेखील सूर्यापासून येणारी उष्णता वातावरणाबाहेर जाणार नाही व वातावरण उबदार होईल. नदी, नाले पुनरुज्जीवित होतील. तसेच सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासूनही मंगळाचे रक्षण होईल. पण ऐरोजेल हा नाजूक व ठिसूळ पदार्थ आहे, त्यामुळे अन्य धातूंबरोबर त्याचे मिश्रण करावे लागेल. त्यामुळे त्याच्या मूळ गुणधर्मांत बदल होणार. तसेही पूर्ण ग्रहाभोवती एखाद्या पदार्थाचे आवरण घालणे व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळे आपणास दुसरा उपाय शोधावा लागेल.

– क्रमशः भाग दुसरा… 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments