सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? जीवनरंग ?

☆ निवडुंग… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

परवाचीच गोष्ट…सुट्टीचा दिवस होता. नवऱ्याच्या, मुलाच्या आँफिसची गडबड नव्हती म्हणून बाहेरच्या बाल्कनीत कॉफीचा मग घेऊन कुंडीत लावलेली झाडे बघत निवांत कॉफी पीत होते. एवढ्यात अचानक एका कोपऱ्यातल्या कुंडीतून डोकावणाऱ्या नाजूक लालबुंद फुलांनी माझं लक्ष वेधलं. मी जवळ जाऊन पाहिलं तर त्यात लावलेल्या निवडुंगाला फुलं आली होती. मी जाम खूश झाले.

मला आठवलं, एक-दीड वर्षांपूर्वी माझ्या भाच्यानं तीन, चार कॅक्टसच्या कुंड्या आणल्या होत्या. मला झाडांची आवड आहे. पण त्या कुंड्या आतील बाल्कन्यांमध्ये ठेवायला सासूबाईंनी कडाडून विरोध केला.– ” हे बघ ती काटेरी झाडं बाहेर ठेव हं.” – खरं तर मला रागच आला होता आणि पतिदेव व माझा मुलगा, जे आधीच झाडांवरुन मला डिवचायची संधी सोडत नाहीत, त्यांनी सासूबाईंचीच “री” ओढली. मी मग वाद न घालता बाहेर शोची झाडं आहेत तिथं त्या कुंड्या नेऊन ठेवल्या.

आज त्यातील दोघांना फुलं आली होती. एकाला टोमॅटो रेड, दुसऱ्याला गर्द गुलाबी. ती फुले जणू मला सांगत होती, ‘ अगं, आम्हीही  फुलतो कधी तरी… कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी…’

माझं मन विचारात मग्न झालं. निवडुंग.. अगदी काटेरी. नुसती पाने.. खूप काटे, कधीतरी आली तर फुले. त्याला ना रूप ना रंग असंही काहीजण म्हणतात. पण हाच निवडुंग वाळवंटात तीव्र उन्हाचा दाह सोसत ताठ मानेने उभा असतो.. हसत हसत.. भवताली वाळूचा महासागर… पाण्याचा अभाव, उन्हाचा पेटता वणवा…. .म्हणूनच आपल्या गरजा कमी करण्यासाठी फांद्या, उपफांद्या नाहीत, विस्तार नाही— जशी आर्थिक कमतरता असणारे  लोक आपल्या गरजा कमी करतात ना, अगदी तसंच !

…तेवढ्यात मला आमच्या भांडी घासणाऱ्या सीताताईंची हाक आली. त्यांची म्हैस व्यायली म्हणून त्या आमच्यासाठी दुधाचा चीक घेऊन आल्या होत्या. मी किटलीत म्हशीसाठी गहू घालून दिले तर किती हसल्या. म्हैस व्यायली तर किती आनंदल्या होत्या. त्यांचे आयुष्य कष्टाचं… वयाच्या दहाव्या वर्षी आईबापाने लग्न लावून दिले. नवरा पंचवीस वर्षांचा, बीजवर… तशी सीता काळीसावळी पण ठसठशीत, नाकीडोळी नीटस. जरा थोराड बांध्याची. पण आईबापाकडं अठरा विश्व दारिद्रय. हा जावई जरा बराच..गवंडी काम करायचा. घरचं पाच-सहा एकर रान होतं. सीताला सवतीचा दोन वर्षांचा मुलगा असल्याचं लग्नाच्या दिवशी समजलं. आता काय ..सांभाळावं  तर लागणारच. चार- पाच वर्ष बरी गेली.  सीता तीन महिन्यांची गरोदर होती, आणि तो काळा  दिवस उजाडला. साप चावल्याचं निमित्त होऊन नवरा तडफडून जागीच गेला. पाठोपाठ सासूही गेली आणि तिचा आधार गेला.   

धाकट्या  दीर-जावेनं तिला घराबाहेर काढलं. आधीच गरोदर, पदरी सावत्र मुलगा. नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडली. माहेरी आली. आईबरोबर बाहेर चार घरी धुणी भांडी  करू लागली. तिलाही मुलगा झाला. चार वर्ष आईच्या आसऱ्याला बरी गेली. पण भावांची लग्न झाल्यावर त्या दोन भावजया तिच्याशी पटवून घेईनात. दरम्यान तिचे आईवडिलही गेले आणि शेवटी तिला माहेर  सोडावं लागलं.

ती तशी जिद्दीची. एका बांधकामाच्या कामावर वॉचमनची नोकरी मिळाली.  सामानाची चोवीस तास राखण करण्यासाठी रहाण्याचीही सोय झाली होती. डोक्यावर छप्पर आलं. दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. धुणी-भांडी, केर-फरशीबरोबर कुठं स्वयंपाकाची कामेही मिळाली. आता चार पैसे हातात राहू लागले. दोन्ही मुलगे ग्रँज्युएट  झाले. कारखान्यांमध्ये कामाला लागले.  

यथावकाश दोन्ही मुलांची लग्न झाली.आता सीताचा जीव भांड्यात पडला. आता सुखाचे, विसाव्याचे दिवस आले असे तिला वाटले. पण दोन्ही सुनांना सासू घरात नकोशी झाली होती. तिला मुले म्हणाली, ‘ आमचा नाईलाज आहे. काय करावं समजत नाही.’  सीता काय ते समजली.  पुन्हा एकदा ती आपल्या लोकांच्याकडून नाकारली गेली होती.  

सुदैवाने, ती अजून चार घरी काम करीत होती. ती दोन-तीन साड्या आणि तिच्या विठुरायाचा फोटो घेऊन घराबाहेर पडली. त्यावेळी आमच्याकडेच आली. चार दिवस राहिली. सासूबाई,आम्ही सर्वजण तिला आमच्याकडेच रहायचा आग्रह करत होतो, पण सीता म्हणाली,  “आदुगरच लई उपकार हायती तुमचं. हात पाय  हलत्यात तवर भाईरच रहावं म्हनते.. अन, अडीनडीला तुमी हायसाच की…”

मी  तर अवाक् झाले. तिचा आत्मविश्वास पाहून आश्चर्य वाटले. त्या परिस्थितीतही ती समाधानी होती 

..माझ्या एका मैत्रिणीचं शेत आमच्या घरापासून जवळच होते.  तसे दीड दोन एकरभरच, पण पडीकच जागा. मी मैत्रिणीला शब्द टाकला. तिनं सीताला तिथं रहायची आनंदानं परवानगी दिली. सीताचं नवीन जीवन सुरू झालं. शेतात एक जुनाट झोपडी होती. सीताचा एकटीचा संसार नव्याने  सुरू झाला. मी तिला गरजेपुरती भांडी दिली. स्टोव्ह दिला. ती पुन्हा जोमानं कामं करू लागली. सदा हसतमुख, कामाचा कंटाळा असा नाहीच . मला नवल वाटायचे .     

सीताचा हात फिरला आणि झोपडीचा जणू उबदार महालच झाला. शेणानं सारवलेलं अंगण, अंगणात रेखीव रांगोळी. दारात तुळस फुलली. सीतानं फावल्या वेळात भोवतीचा परिसर स्वच्छ केला. तिथं वाफे करून भाज्या लावल्या. मेथी, कोथिंबीर, मुळा, वांगी, लाल भोपळा, माठ. आम्ही तर थक्क झालो. माझी मैत्रिण तर जागेचा कायापालट बघून जाम खूश झाली. तिने भाजी विकून मिळेणारे  पैसे स्वतः सीतानेच घ्यायचे अशी अट घातली. 

 — ” वैनी, म्या टाइम भेटला म्हून केलं समदं. आवं, आता हीच माजी लेकरं, .पैशे नकोत मला. ते तुमीच घ्या. “

मग मात्र मैत्रीण हट्टाला पेटली. मग सीताचा नाईलाज झाला. आता आमच्या सोसायटीत तिचीच भाजी सर्वांकडे असते. आम्ही दोन, तीन  मैत्रिणींनी मिळून तिला एक म्हैस विकत घेऊन दिली. तीच ‘ चंद्रा ‘ व्यायली. तोच दुधाचा चीक घेऊन सीता आली.

सदा चेहऱ्यावर हास्य.. परिस्थिती कशीही आली तरी  जिद्दीनं  सामना करायचा, हे कुणी शिकवलं या सीताला. आनंदाचं हे दान देवानेच तिला दिलं असावे. म्हणूनच मला तिच्यात आणि निवडुंगात साम्य आढळलं..।—-

– हा काटेरी , काहीसा वेडावाकडा,  सर्वांनी नाकारलेला निवडुंगही  जगतो, वाढतो… परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी पण नेटानं जगायचे त्याने ठरविलेले असते. मग  कधीतरी तो फुलतो. सर्वांना आनंदगाणे सांगतो.

जीवनात अशी काही सीतासारखी माणसं असंतात. त्यांच्या गालावरचे हास्याचे गुलाब सदा फुललेले असतात.. मग हास्याचे,आनंदाचे कारंजे त्यांना का नाही न्हाऊ घालणार ?

***

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments