सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिले – तिचं बोलणं ऐकून मनात अनेक रंगांचे पक्षी फडफडले. मग मनात आलं, कशात काय अन् फटक्यात पाय…. आता इथून पुढे )

अमरावतीला परतलो आणि मल्लिकाचं पत्र मिळालं. त्यात प्रामुख्याने आईला साडी पसंत पडली का, असं लिहिलं होतं. तिला जे मी जे उत्तर पाठवलं, त्यात प्रामुख्याने आईला साडी आणि विथीला फ्रॉक पसंत पडल्याचं लिहिलं, पण एवढंच लिहिण्याने, पत्र काही पत्र होत नाही. त्यामुळे आमच्या दोघांच्या पत्रात आणखीही किती तरी गोष्टी होत्या. पत्रातील मोकळ्या जागाही खूप काही सांगत होत्या. स्त्री-पुरुषांमधील अनपेक्षित परस्पर स्पर्श, त्यांच्या श्वासाचा गंध, संवादामधून उमलणारं मौन, किंवा मग नजरेचा लपंडाव, मनात उपजलेल्या भावनांना कधी कधी शब्दांमध्ये सोडलेल्या मोकळ्या जागाच अधीक चांगल्या रीतीने अभिव्यक्त करतात. मग आणखी काही पत्रांची देवाण-घेवाण, मग टेलिफोनवरून बोलणं, एसएमएस. असं सगळं सुरू झालं.

मल्लिकाकडून कळलं, तिच्या आईचं निधन झालय आणि निधीला होस्टेलमध्ये ठेवलय. मल्लिकाची बडोद्याला बदली झालीय. तिची बहीण रहाते, त्याच अपार्टमेंटमधे तिने एक फ्लॅट खरेदी केलाय. घटस्फोटाच्या अर्जाची सुनावणी चालू आहे. एक दिवस असंही कळलं, मार्केटिंग साईड सोडून तिने अॅाडमिनिस्ट्रेशन साईडला बदली करून घेतलीय. तिचं पोस्टिंग बडोद्याच्या विभागीय कार्यालयात प्रशासन अधिकार्याशच्या पदावर झालय. आणखी एक अद्ययावत माहिती कळली होती, जी मनाच्या सुखद स्मृतींवर धुळीचे थर पसरवत होती.

– – – – – – – – – 

मी बडोद्याला पोचलो, तेव्हा रात्र झाली होती. उतरण्यासाठी मी हॉटेल ग्रीन-व्हॅलीचीच निवड केली होती. खोलीदेखील तीच. ३०४ नंबर. मॅनेजरने दुसरी कुठली तरी खोली दिली होती, पण मी ३०४ नंबरचीच खोली मागितली. योगायोगाने मिळाली. मी खोलीत सामान ठेवलं. दरवाजा बंद केला आणि सगळ्या खोलीत चक्कर मारली. खोली होती, तशीच होती, पण मला का कुणास ठाऊक, वाटत राहिलं, ती खोली नाही, शवागार आहे. खोलीतील सार्याऊ वस्तू निर्जीव वाटत होत्या. त्यातून काही सुगंध येत नव्हता.

सारी रात्रभर मी एका बागेतून चाललो होतो. नि:संशय. एकटाच नव्हे, तर मल्लिका बरोबर. आम्ही दोघे तर्हे्तर्हेेची वाद्य वाजवत होतो. हवी ती गाणी गात होतो. मोर बनून नाचत होतो. हरणं बनून उड्या मारीत होतो. सागर लहरींबरोबर खेळत होतो. पावसात भिजत होतो. आभाळात रंग भरत होतो. आपापला देहगंध आपापसात वाटत होतो.

दुसर्या  दिवशी काम आटपून दुपारी मी मल्लिकाच्या विभागात गेलो. तिथे, थोड्या वेळासाठी ती बाहेर गेल्याचं कळलं. मी तिच्या टेबलासमोरची खुर्ची ओढून त्यावर तिची वाट पहात बसलो. टेबलावर नेम-प्लेट होती. त्यावर लिहिलं होतं, ‘श्रीमती मल्लिका.’ मल्लिकाच्या पुढे काही लिहिलं होतं, पण त्यावर कागद चिटकावला होता. मी कुणाला काही विचारणार, त्यापूर्वीच तिच्या शेजारच्या टेबलाजवळ बसलेली तिची सहकारी गुजराथीत म्हणाली, ‘मॅडम पैला मल्लिका ठक्कर हती. बीजी नेम-प्लेट बनीने आव्यासुधी एमणे जूनी नेज सुधारिने राखी लिजी छे.’ खुर्चीवर बसल्या बसल्या मी रात्री पाहिलेल्या स्वप्नाच्या अल्बमची एक-दोन पाने उलटतो, न उलटतो, तोच मल्लिका येऊन ठेपली. ‘ ओह व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज… मी स्वप्न तर बघत नाही ना?’

‘नाही. मी साक्षात बलदेवच आहे.’

‘वेलकम- वेलकम’ आणि तिने आपला उजवा हात पुढे केला. माझ्या स्मृतीपटलावर तिची पहिली भेट ताजी झाली. तिच्या अभिवादनाचा स्वीकार करून मी समोरच्या खुर्चीवर बसलो. पण मन एकदम बेचैन झालं. मल्लिकाने पूर्ण बाहयांचा कुडता घातला होता. हातात हँड ग्लोव्हज होते. मी काळजीपूर्वक पाहयलं. आपल्या चेहर्या भोवती चुंबंकीय क्षेत्र निर्माण करणारं ते तेज, जे तिच्या पहिल्या भेटीत मी अनुभवलं होतं, ते आता तिच्या चेहर्याावर नव्हतं. याच वेळी माझं लक्ष तिच्या ओठांकडे आणि मानेकडे गेलं आणि मला समजायला वेळ लागला नाही. मला जसा काही विंचू डसला. अधिकाधिक वेळ मल्लिकाबरोबर घालवता यावा, या दृष्टीने मी कार्यालयीन कामकाज लवकर संपवलं होतं. आजची सध्याकाळ मल्लिकाबरोबर घालवायची असाच विचार केला होता. बोलता बोलता मल्लिका घरी चालण्याविषयी म्हणाली, पण मी सफाईने ती गोष्ट टाळली. या दरम्यान तिने चहा मागवला होता. मी कसा-बसा चहा संपवला आणि ऑफिसची कामे बाकी असल्याचा बहाणा करत तिचा निरोप घेतला. ग्रीन-व्हॅली हॉटेलमधली ती रात्र सरता सरेना. रात्रभर मी माझ्या स्वनांचे तुकडे गोळा करत राहिलो.

क्रमश:…

मूळ हिंदी  कथा – ‘रिसायकल-बिन में मल्लिका’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments