श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘सांज…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆
तिचे असे लटक्या रागाने पाहणे मला खूप सुखावते… तिचा लटका राग आमच्या नात्यातली ओढ तर वाढवतोच पण खरे म्हणजे ती’च व्यापून राहिलेल्या मनात तिच्यासाठी आणखी जागा निर्माण करण्यासाठी माझे मन आणखी मोठे होते.. आणखी व्यापक होते.. मी तिच्याकडे रोखून पाहतोय हे पाहून ती पुन्हा म्हणाली,
” कुठे हरवलास ? मी काही तरी म्हणाले तुला “
तिच्या लटक्या रागात हरवलेल्या स्वतःला सावरत, भानावर आणत मी हसून म्हणालो,
“बायकांच्या मनातील ता म्हणजे ताकभात की ता वरून ताट-वाटी हे ब्रह्मदेवलाही कळणार नाही तिथे ह्या पामराचा काय पाड लागणार ,राणीसाहेब ? आतातरी सांगाल का ?”
ती हसून डोळे मिचकावत म्हणाली,
“सांजवेळचा नभातला प्रणयी गुलाबी रंग हळूहळू अंधारताना आपल्या परसात उतरून राहावा म्हणून तिथं… आत्ता तुला नकोच असेल तर मी आणते मी काळे कापड..”
“कापड तर बदलून आणयलाच हवे तुला.. मला तिन्ही आरामखुर्च्यांसाठी गुलाबीच हवं. “
मी हसत म्हणालो. तेंव्हा ती मस्त लाजली..
” चावट आहेस तू. सारे ध्यानात येऊनही माझ्याकडूनच वदवून घेतोयस हे लक्षातच येत नाही माझ्या. जात्ये बाई आत, अजून स्वयंपाक व्हायचाय.”
ती स्वयंपाकघराकडे जाण्यासाठी वळत म्हणाली.
” ए, राहू दे स्वयंपाक.. आज बाहेरच जाऊ जेवायला.. आणि तसेच एखादा चित्रपटही पाहून येऊ. “
” नाही हं.. आजिबात नाही. जोवर आपले घर होत नाही, तोवर नाही.”
ठामपणाने नकार देऊन ती आत गेली होती.
तिच्या मनाजोगं घर झाले. गावापासून दोन किमी अंतरावर रस्त्यालगतची चांगली दहा गुंठ्यांची तिला हवी तशी जागा मिळाली.. सभोवती फक्त शेती.. समोर दूरवर दिसणारा डोंगर. सभोवतीच्या शेतांच्या बांधावरची आंब्या-लिंबांची भरपूर झाडे.. कडक उन्हांतही डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी हिरवाई ल्यालेले, मनाला उल्हसित करणारे करणारे भवताल. तिने तिच्या मनाप्रमाणे आंतर्बाह्य आखणी केलेले. तिने नानाविध फुलझाडे, तिला हव्याशा झाडांची रोपे आणून लावली. जोपासली. चिमण्या-पाखरांच्या किलबिलीने दिवस उगवू लागला, मावळू लागला. तिची निवडणे-पाखडणे कामे त्यांच्या सोबतीत परसात होत होतीच पण दुपारचा बहुतेक सारा निवांत विसाव्याचा वेळ ही परसातच आंब्याच्या गार सावलीत जात असे.
” अहो, कुठं हरवलात ? चहा निवला असेल. द्या इकडे, गरम करून देते. “
तिच्या आवाजाने भानावर येऊन मी माझ्या हातातील चहाच्या कपाकडे पाहिले.. चहा घेता घेता मी विचारात हरवून गेलो होतो.. कपात बराचसा चहा तसाच होता.. गार ही झाला होता.
” नको, राहू दे. घोटभर तर उरलाय. पिऊन टाकतो. “
” द्या इकडे. तुम्हांला अगदी गरम गरम चहा लागतो.. हा गार चहा घशाखाली तरी उतरेल का तुमच्या. आणा इकडं. गरम करून देते. “
” नको ग राहू दे.. आता गरम काय आणि गार काय ? “
ती हसली. स्वतःशीच हसल्यासारखी.
” का गं ? हसायला काय झालं? खरंच राहू दे. “
” काही नाही.. ‘संगम’ आठवला..”
” आत्ता ? आगं, किती काळ लोटला संगम पाहून..”
आठवतं तुला ? “
” हो तर, जयहिंद ला पाहिला होता. “
” हं ! संगम म्हणजे त्यातले गाणे आठवले…”
” आत्ता ? बोल राधा बोल…? “
” ते नाही रे, ‘ क्या करू माँ मुझको बुढ्ढा मिल गया..’ अलीकडे तू तसाच व्हायला लागलायस ? “
मी हसलो, पंचाहत्तरी ओलांडलेल्या तिला ऐंशीतील मी बुढ्ढा व्हायला लागलोय असे वाटू लागले होते.
” असे का वाटते तुला ? चहा तसाच पितो म्हणले म्हणून ? “
” नाही रे, गंम्मत केली. असेच गाणे आठवले.
त्यावेळी नुकतीच आपण स्कुटर घेतली होती. तिच्यावरून खूप फिरायचो आपण. “
” हो ना.. स्कुटर घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण ‘संगम’ पाहायला गेलो होतो ‘जयहिंद’ ला. “
” दुसऱ्या दिवशी नाही रे. आपण स्कुटर आणली तो गुरुवार होता आणि संगम पाहिला रविवारी. “
” वार ही आठवतो तुला ?”
” काही क्षण, काही गोष्टी विसरु म्हणले तरी विसरल्या जात नाहीत. “
नकळत तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.
मी विषय बदलण्यासाठी विचारले,
” साखरेबरोबर आणखी काय आणायचं आहे ते ही सांग. “
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈