सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ मुक्त… लेखिका – सुश्री अनघा किल्लेदार ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

रविवार बागलांच्या घरी अंमळ उशिराच उगवला. वहिनी गेल्याच्या धक्क्यातून दोन महिन्यांनीसुद्धा त्यांचा एकुलता एक मुलगा पराग पुरता सावरला नव्हता. 

नऊ वाजल्याचे लक्षात येताच त्याने बेडरूमच्या खिडकीत मोबाईलमधे रममाण झालेल्या प्रितीला पाहिले आणि विचारले, ” कधी उठलीस तू? मला उठवायचस ना..बराच उशीर झाला आज.. आप्पांचा चहा झाला ना? “

“आप्पांचा चहा? मला नाही माहित..मी इथंच आहे, मी पण नुकतीच उठते आहे..”  प्रितीच्या या उत्तराने पटकन् उठून त्याने आवरले आणि बाहेर आला.

मस्त गरमागरम चहाचे तीन कप बाहेर आणत त्याने आप्पांना हाका मारली..पण त्यांनी ओ दिली नाही. 

दोन महिन्यांपूर्वी वहिनी म्हणजे त्याची लाडकी आई झोपेतच निघून गेली कायमची..नको नको त्या विचारांनी पराग धसकला. दोन हाकांनंतरही प्रत्युत्तर न आल्याने कासावीस होऊन त्याने आप्पांच्या खोलीकडे धाव घेतली. खोली रिकामी, स्वच्छ आवरलेली होती. मग आप्पा कुठे गेले? फिरायला? न सांगता कसे जातील? 

गोंधळून त्याने प्रितीला बोलावले, “अग आप्पा दिसत नाहीयेत घरात, तुला काही कल्पना आहे का? “

“छेः !! माझ्याशी धड बोलतात का कधी ते? मला नाही माहित..”

तिचे बोलणे पुरे होईपर्यंत परागला टेबलवर एक चिठ्ठी मिळाली. आप्पांचे अक्षर तर त्याच्या पूर्ण परिचयाचे..चिठ्ठीत लिहिले होते..

“प्रिय पराग आणि सुनबाई,

दोन महिन्यांपूर्वी ही गेली आणि मला विचित्र एकटेपणा येऊ लागला.  तुमच्या सुंदर घरट्यात मी एकटा पडलो…. कारण काय? कोण बरोबर कोण चूक याची शहानिशा मला करायचीच नाही. जिच्यासाठी मी अट्टाहास करायचो तिनेच दगा दिला रे. 

खूप विचारान्ति मी गावाला परत जातोय.  एकटा नाही, तिच्या सर्व आठवणींना सोबत घेऊन. तुमच्यात मी ‘ बसत नाही ‘ हे तुम्हालाही माहिती आहे..आणि मला ही. मला आधीच कळलं होतं, पण तुझी आई भाबडी होती. 

गावातली शेती वाडी , दुभती जनावरे सगळं सगळं वैभव सोडून ती तुमच्या महालात आली…. तुम्ही तिला हाकलले नाहीत, पण तोंडभर स्वागतही झाले नाही. लेकाची मुले -नातवंडे नाहीत, ती मोठी करत राहिली. ‘ माझी मुलं माझ्या पद्धतीने वाढू दे..’  असे सूनबाईने सुनावल्यावर घायाळ झालेल्या तिला मीच आधार दिलाय. घरच्या कामकरणींना, कामक-यांच्या सुनांना ज्या तुझ्या आईने बाळंतपणात पायली पायली तांदूळ स्वतःच्या हातानं काढून दिला, त्याच तिला ‘ सकाळी कशाला हवाय ताजा वरण भात ? उरतो तो गरम करून खा ना ‘ ..असे मुलाच्या भरल्या घरात ऐकावं लागलंय.

मी कमजोर आणि लाचार तेव्हाही नव्हतो आणि आजही नाही.. तेव्हाच बोलणार होतो पण फक्त तिच्याखातर गप्प बसलो. आता मोकळं केलंय तिने मला. 

माझे मोठ्याने देवाचे म्हणणे, पूजा करणे, सगळेच तुम्हाला नापसंत. इतकंच काय, बरे नाही दिसत पंचे वापरणे म्हणून तुम्ही ते जड टाॅवेल आणून दिलेत, सांगू का हळव्या त्वचेबरोबर मनही ओरबाडून टाकले त्यांनी. 

पण, राहू दे ते सगळं आता.. मी गावाकडच्या माझ्या घरी जातोय..मला भेटायला शोधायला येऊ नको. मीही फोन करणार नाही आणि तूही करू नकोस. माझा राग नाही तुमच्यावर, आशिर्वादच आहेत…. पण आपले मार्ग आता भिन्न आहेत. 

माझ्या माघारी शेतीवाडी , घरदार, दागदागिने सगळेच तुझ्या नावावर असेल. तुझा कोणताच हक्क मी डावलणार नाही…. मला मुक्त व्हायचंय आता.”

– आप्पा.

आप्पांची ही चिठ्ठी वाचताच पराग हमसाहमशी रडू लागला. त्याने रडत रडतच गावाला आप्पांच्या शेजारी रहाणा-या मुसळे काकांना फोन केला. 

त्याचा आवाज ऐकून अगदी कोरडेपणाने काका म्हणाले  ” पोचला हो तुझा बाप सुखरूप, कळली तुमची खुशाली.  आता तू फोन करूच नको ,आम्हीच करू तुला शेवटला फोन. तुला ऐकवायचं खूप मनात आहे, पण तुझ्या बापाला फार कळवळा तुझा..असो. आजपासून खूप कामात असेन मी ..  माझा मित्र आलाय परत.. ठेवतो फोन. ” 

मुसळे काकांनी फोन बंद केला. 

मुसळे काका वाड्यात आले तेव्हा आप्पांची नुकतीच आंघोळ झाली होती. खणखणीत आवाजात अथर्वशीर्ष म्हणत होते. आंघोळीनंतर,  हातासरशी पिळलेला पंचा त्यांनी दिमाखात दोरीवर वाळत टाकला होता, आणि वाडवडिलांनी पूजलेल्या देवांची पूजा करायला ते देवघराकडे वळले होते.

लेखिका – सुश्रीअनघा किल्लेदार, पुणे

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments