सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली. आता इथून पुढे )

विनायक हा असाच भरकटलेला गुन्हेगारी वृत्तीचा युवक होता. दिशाहीन. कलंदर. पण नाग्याने त्यालाही सामावून घेतले.  त्याचे विनायक हे नामकरणही नाग्यानेच केले.

तिच्यावर बलात्कार झाला होता. ती उध्वस्त झाली होती. भयाण अंधार तिच्या आयुष्यात पसरला होता.  समुद्राच्या पाण्यात ती आत आत  चालत होती.  जीवनाकडे  तिने पाठ फिरवली होती.  नाग्याने तिला हात दिला. पाण्यातून बाहेर काढले.  ती रडली. नाग्याच्या छातीवर उद्रेकाने तिने बुक्के मारले.  तिला जगायचंच नव्हतं.

तिला पाहून नाग्याला इंदू ची आठवण झाली. तो मुकाट तिला घेऊन मठात आला. सर्वांना त्याने  तिची काळजी घ्यायला सांगितली.

तीच झाली नाग्याची प्रमुख शिष्या.  प्रभावती.  त्यानंतर तिचे नाव, गाव, ओळख सारेच बदलून गेले.

इंदूने ज्याला नालायक, भडवा म्हणून संबोधले होते तो नाग्या आता लोकांचा देव बनला होता.  आता पाऊले पूर्ण रुतली होती.  मागे वळण्याचा रस्ता नव्हता. लटकी का असेना पण त्याची एक प्रतिमा तयार झाली होती. आणि मुखवट्याच्या आत नागू कोंडला गेला. नागूही या स्थितीत समाधानी होता. 

असं त्याच्याजवळ काय होतं? तसं रूप होतं. त्याच्या आईचं रूप. तो गौरवर्णी, उंचापुरा भारदस्त होताच. त्याच्याजवळ वाणी आणि वक्तृत्व होतं.  ज्ञान नव्हतं पण शब्द भांडार होतं. आणि अभिनय ,नाट्य त्याच्या वृत्तीतच असावं. 

“हेचि दान देगा देवा । तुझा विसर न पडो।।”   तो अशा काही चालीत म्हणायचा की, लोक तल्लीन होऊन नाचायचे. कधी जयघोष ,कधी नाचणं, कधी हसणं तर कधी मोकळेपणानं रडणंही ….मनात येईल ते बोला…असे सगळे प्रयोग त्यांनी लोकांवर केले.  आणि काय आश्चर्य लोक त्यात गुंतून गेले. लोकांना हाच भक्तीमार्ग वाटला.

गू पाहत राहिला. अनुभवत राहिला.

महाराजांच्या वेशात गाडल्या गेलेल्या नागूच्या अस्तित्वाचे कण विरघळत गेले.  देश-विदेशात त्याची कीर्ती पसरली.  पैसा प्रसिद्धी आणि प्रसार झपाट्याने होत गेला.  त्याच्या नावाची पुस्तके ही प्रकाशित झाली. त्याचा प्रचंड खप होऊ लागला.

तसे विरोधी वारेही वाहत होते.  अनेक वेळा आयकर वाल्यांनी धाड टाकली.  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लोकांनी तर सळो की पळो केले होते.  महाराजांची बुवाबाजी,  स्त्रियांबरोबर असलेली लफडी, मठात चाललेले अनैतिक  व्यवहार,  खोटेपणा यावरही मीडियाचे रकाने भरत होते.

एका महिलेची मुलाखत टींव्ही. चॅनलवर दाखवली गेली होती. तिचा चेहरा अस्पष्ट धूसर केला होता.

ती सांगत होती…सांगताना रडत होती. “मला महाराजाने फसवले. मीही त्यांच्या कहाण्या ऐकून पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या मठात जात असे. एक दिवस त्यांनी मंत्र देण्याच्या निमीत्ताने मला एका अंधार्‍या खोलीत नेले आणि… माझा पैसा, अब्रु ,स्रीत्व सगळं लुटलं…” चॅनलवर ती खूप करवादत होती.  पण लोकांच्या मनातला विश्वास, श्रद्धा भक्ती यावर याचा अंशत:च  परिणाम होत होता.  लोक ऐकत होते. साशंकही होत होते पण तरीही पुन्हा पुन्हा जातच राहिले.

पण  कधीतरी एकांती महाराजाचा मुखवटा त्यांच्याच मनात गळायचा . 

आपण लोकांच्या हळुवार धार्मिक भावनांशी खेळ मांडलाय याचं अपराधीपण जाणवायचं. आपण संत नाही. संतत्वाच्या जवळपासही नाही. आपल्याला पैसा प्रसिद्धी याचा लोभ आहे! लोक भाबडेपणाने आपल्या नादी लागत असल्याचं आत कुठेतरी समाधान वाटायचं. श्रेष्ठत्वाची भावना आपल्याला चिकटलेली आहे . पण हा पत्त्याचा बंगला कधीतरी कोसळेल  आणि मग आपली काय दशा होईल याचं भयही मनात वाटायचं.  पण कुठेतरी असंही वाटायचं की याच लोकांनी आपल्याला हे रूप दिले ना?  त्यांनीच आपल्या अस्तित्वाचं हे बुजगावणं बनवलं ना? आणि तसे म्हटले तर या आभासी, खोट्या, लटक्या दुनियेत अनेक प्रकारची  लोकांची  दुःख समस्या विरघळत चालल्याचा भास तर त्यांनाही होतोच आहे ना? नव्हे त्यांच्यासाठी तो भास नसून सत्यच आहे…

लोक वेडे आहेत.  ते नादी लागतात. ताब्यात जातात. कच्च्या मनाची मडकी आपण फक्त फुंकतो. मग त्यात वाईट काय? चुकीचं काय! त्यांनाही लाभ. आपलाही फायदा. भावनांचा हाही एक व्यवहार. धंदा.

कधीकधी नागूला मनोमन हसूही यायचं. लोकांची कीवही वाटायची.  इतके उच्च शिक्षित,पदवीधारक, काही तर सुवर्णपदक विजेते, यशस्वी उद्योजक .इथे येतात. प्रचंड नैराश्य घेऊन येतात. का भरकटतात ही माणसं… 

करमरकर मास्तरांनी एकदा सहज म्हटलं होतं ते चांगलंच लक्षात आहे .

“सुखाचा शोध न घेणं म्हणजेच दुःखाचा शेवट होणं..”

आपण सारेच भरकटलेले आहोत. मार्ग हरवलेले  आहोत. खोटे आहोत. फसवतो. फसवले जातो.

महाराज विचारात पार डुबून गेले होते.  एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. मरगळ आली होती. बुरखा काढून टाकावासा वाटत होता. मुखवटा फेकून द्यावासा वाटत होता…बस् झालं…!!

इंदुचे शब्द कानांत घुमत होते. “नालायक..भडव्या..विश्वासघातकी..”ः

प्रभावती महाराजांना विचारत होती,

” काय झालं गुरुवर्य? आज इतके चिंतेत का?”

महाराज गप्प होते.  शांत होते. 

” उद्या मठात कृष्ण जन्माचा सोहळा आहे. मोठा भक्तगण जमणार आहे. भरपूर पावत्या फाडल्यात. देणग्याही खूप आल्यात.  या उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रात, टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध होत आहेत . उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मठात सारे या उत्सवाची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. जवळजवळ सारी तयारी झालेली आहे. एकदा आपण नजर फिरवावी. काही कमी जास्त असल्यास मार्गदर्शन करावे.”

महाराज नुसतेच “हो” म्हणाले.

पुन्हा प्रभावतीने विचारलं, 

“काय झालं?”

” हे बघ प्रभावती! उद्या सर्व भक्तगणांसमोर मी एक सत्य मांडणार आहे.”

” कोणते सत्य गुरुवर्य ?”

“एक कबुली.”

” कबुली?”

” होय प्रभावती…”

” काय सांगणार तुम्ही त्यांना?”

” उद्या त्या युगंधराची शपथ घेऊन मी खरे बोलणार आहे.  मी नागूची  कहाणी सांगणार आहे..”

प्रभावती गोंधळली  होती. आश्चर्याचा पूर तिच्या चेहऱ्यावर उसळला होता.  पण महाराज शांत होते.

‘ गोपाल कृष्ण! राधे कृष्ण! गोपाल कृष्ण! राधे कृष्ण!…’

एक मुखवटा गळून पडण्याच्या कल्पनेत महाराज मुक्त होत होते.  परिणामाची त्यांना कल्पना होती. पण पर्वा नव्हती. पत्त्याचा बंगला अखेर कोसळणार होता…

नव्हे! ते स्वत:च तो मोडणार होते…

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments