? जीवनरंग ?

☆ “पुन्हा एकदा अश्रुंची फुले झालीत…” – लेखक – डाॅ. संजय ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

“अजय, इकडे ये, माझ्या समोर येऊन सरळ उभा रहा, ही वेळ आहे का शाळेत यायची..? तूच सांग आता कुठली शिक्षा करु मी तुला, ह्या पूर्वीही छड्या मारुन झाल्या, कान पिळून झालेत, बाकावर उभं करुन झालं, वर्गाच्या बाहेर काढून झालं, काही फरकच कसा नाही तुझ्यात, सगळ्या शिक्षा आपल्या हू की चू न करता रोज चुपचाप सहन करतो, दिसतोस तर हडकुळा पण कुठल्या हाडा मासाचा बनला आहेस मला तर काही कळत नाही, काहीच फरक कसा नाही पडत रे तुझ्यात..?

लक्षात ठेव तु अजय, आता एकदाच शेवटचं सांगते, पुन्हा जर तू वर्गात वेळेवर नाही आलास ना तर एकदिवस मीच शाळा सुरू होण्यापूर्वी तुझ्या घरी येऊन तुझ्या पालकांचा समाचार घेईन, विचारीन त्यांना, कुठे लक्ष असतं तुमचं, तुमचा मुलगा केव्हा येतो शाळेत, बाहेर काय उद्योग करतो, शाळेच्या नावाखाली कुठे जातो, मुलाची काही फिकीर आहे की नाही तुम्हाला ..? अन्  घेऊन येईन त्यांच्यासमोर तुला ओढत वेळेवर शाळेत, कळू दे एकदा तुझ्या पालकांना तूझे खरे गुण ..! “

अजय वर्गातला खरतर एक गोड, निर्मळ, सोज्वळ, शांत चेहऱ्याचा, नीटनेटका मुलगा होता, वर्गात कधी दंगा न करणारा,  अतिशय हुशार, नियमित होमवर्क करुन येणारा, आणि शाळेत आल्यावर वर्गात नीट लक्ष देऊन शिकणारा, नेहमी पहिल्या पाचात येणारा गुणी मुलगा पण इतक्यांदा सांगूनही कधीच तो वर्गात वेळेवर येत नसे, कधी अर्धा तर कधी चांगला तासभर उशीर करायचा यायला, एवढा हुशार असून का हा असं वागतो ह्याचं त्याच्या ह्या मॅडम ला कोडं होतं, घरच्यांना ठाऊक नसतांना हा बाहेर काही वाईट कामं तर करुन येत नसेल अशी भीती त्यांच्या मनात होती..!

आईवडिलांना त्यांनी कितीदा निरोप पाठवले, डायरीत शेरे मारुन दिले पण हा दाखवतच नाही डायरी त्यांना ..!

काल एवढं बजावून देखील आज उलट  हा अजून तासभर उशिराच आला आणि  शांतपणे मॅडम समोर आपला उजवा हात पुढे करून छड्या खाऊन घेतल्या ..!

कालच्या सांगण्याचा जराही उपयोग न झाल्याने व आज उलट जास्तीच उशिरा आल्याने मॅडम रागातच होत्या, त्यांनी त्याच्याकडे न बघता रागानेच त्याच्या कोमल हातांवर रोजच्या पेक्षा तीन छड्या जास्ती मारल्या, हात लाल होऊन गेला होता, डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू न देता निमूटपणे सहन करुन तो आपल्या जागेवर जाऊन बसला ..!

मॅडमचं आज शिकवण्यात लक्ष नव्हतं, त्याचेच विचार त्यांच्या डोक्यात येत होते, का हा असं करतो..? एवढा हुशार मुलगा असून रोज का आपला मार खातो ह्याचं त्यांना वाईटही वाटत होतं, तो लिहीत असतांना अधून मधून चोरून त्या त्याच्याकडे बघत होत्या, शांत, निर्वीकार तो नेहमी असतो तसाच होता, आज त्यांनी मनात पक्क ठरवलं उद्या कुठल्याही परिस्थितीत शाळा सुरू व्हायच्या आधी अजयच्या घरी जाऊन यायचं, दुसऱ्या दिवशी ठरवल्या प्रमाणे शाळेच्या अर्धातास आधी घरातून निघून त्यांनी  स्कूटी अजयच्या घराकडे वळवली, अजयच्या घरासमोर थोड दूरच त्या थांबल्या अजय शाळेच्या वेळेस कुठे जातो ते बघायला म्हणून.!

शाळेची वेळ झाली होती, अजय लगबगीने घरातून बाहेर पडला पण स्कूल bag न घेताच, शाळेच्या वेळेत हा बाहेर राहून नक्कीच काहीतरी वाईट कामं करतो हा मॅडम चा समज दृढ होत नाही तेवढ्यात  चालतच तो साधारण एक फर्लांग भर दूर असलेल्या सरकारी हॉस्पिटल मधे गेला, मॅडम त्याच्या मागे गेल्या, स्कूटी स्टँडवर लावून जाणारच होत्या त्या आत तोवर त्यांना अजयच व्हील चेअर वर बहुतेक त्याचे वडील असावेत,  त्यांना बसवून लगबगीने बाहेर येत असलेला दिसला, आजूबाजूला त्याचं लक्ष नव्हत, काळजीपूर्वक वडीलांना त्याने घरात नेऊन सोडलं, मॅडम पुन्हा दूरच थांबल्या होत्या, थोड्याच वेळात पुन्हा अजय गडबडीत व्हील चेअर वर बहुतेक आता आई असावी, तिला घेऊन बाहेर पडला, पुन्हा हॉस्पिटल, पुन्हा थोड्या वेळात तिला घेऊन घरी आला व मोकळी व्हील चेअर हॉस्पिटल मधे परत देऊन आला, घरी येऊन लगेच पुन्हा बाहेर पडला, आता मात्र स्कुलबॅग खांद्यावर होती, साधारण पाऊण एक तास मॅडम हे सगळं बघत होत्या ..!

अजय शाळेत गेल्यावर त्या अजय च्या घरी गेल्या त्याच्या आईवडिलांना भेटायला पण माहित नाही का आपण अजय च्या मॅडम आहोत हे त्यांनी सांगितलं नाही त्यांना, अर्धा पाऊण तास काय बोलणं झालं असेल त्यांचं तेवढंच, बाहेर पडल्या तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते..!

अजय च्या आईवडिलांना त्यांच्या मधुमेहा साठी दिवसातून दोनदा इन्सुलिन injection घ्यावं लागतं, औषधं महाग असल्याने विकत आणून घरात घेणं त्यांच्या परिस्थिती मुळे त्यांना परवडत नाही, सरकारी हॉस्पिटल मधे free होत असल्याने दोघांना ते दिवसातून दोनदा तिथे नेऊन देऊन आणायची जबाबदारी अजय च्या खांद्यांवर ह्या लहान वयात येऊन पडली आहे जी तो त्याची शाळा आणि अभ्यास सांभाळून आज तीन वर्ष झाले एकही दिवस न चुकता पार पाडतो आहे ..!

शाळेत जायचा आता मॅडमचा मूड नव्हता म्हणून त्या पुन्हा घरी गेल्या, बोलून आल्यापासून थोड्या अस्वस्थ होत्या बहुतेक त्या ..!

दुसऱ्या दिवशीपण शाळेत त्या गुमसुम होत्या, शिकवण्यात लक्ष लागत नव्हतं त्यांचं म्हणून मुलांना त्यांनी एक विषय देऊन निबंध लिहिण्यात गुंतवले नीटनेटका अजय नेहमी प्रमाणे आजही लेट आला, स्कूल bag जागेवर ठेऊन खाली बसणार इतक्यात मॅडम ने बोलावले …

“अजय इकडे ये “

अजय खाली मान घालून मॅडम समोर येऊन उभा राहिला, त्यांनी न सांगताच त्याने उजवा हात पुढे केला त्यांना आज खरतर त्याच्याकडे बघायची पण हिम्मत होत नव्हती तरी बसल्या बसल्या त्यांनी छडी उचलली अन् अचानक अजय च्या हातात छडी देऊन स्वतः चा उजवा हात त्याच्या समोर केला ..

” मार अजय मार, आज तू मला शिक्षा करणार आहेस, मी नाही, मार आज तुला किती छड्या मारायच्या आहेत मला त्या मार “

हे काय चाललंय अजय ला काही कळेना, कावरा बावरा झाला तो ..

” नाही मॅडम मी चुकलो, मीच नेहमी चुकतो “

रोज मार खाऊन देखील मॅडम विषयी प्रचंड आदर होता त्याच्या मनात रोज आपण चुकतोय म्हणून मॅडम नाराज होऊन असं म्हणताएत असं वाटलं त्याला, त्याने छडी टेबल वर ठेवली मॅडम उठल्या, त्याला जवळ घेतलं अन् घट्ट उराशी धरलं आणि मिटलेल्या डोळ्यातून अश्रूंना वाट करुन दिली ..!

त्यालाही रडू कोसळले गुरुशिष्यांचे अश्रू टपाटप पायावर पडून पुन्हा एकदा त्यांची फुले झालीत..!

🏵️🌹🏵️

लेखक – डॉ संजय 

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments