सौ. प्रभा हर्षे
जीवनरंग
☆ वेगळा… ☆ सौ. प्रभा हर्षे ☆
जानेवारी महिना आला की नीताला छातीत धडधडायला लागतं. मन फार उदास होतं. २६ जानेवारी– तिच्या समीरचा वाढदिवस. समीर वेगळा रहायला लागल्याला आज ५ वर्षे झाली. पण एकही वर्ष त्याने वाढदिवसाला घरी यायचं टाळलं नाही. समीर नीताचा पहिला मुलगा. अत्यंत नाजूक प्रकृती असलेल्या समीरला नीता व सुजय यांनी अक्षरश: हाताचा पाळणा करून वाढवला. पण त्याची कुडी तशी लहानखोरच राहिली. धाकटा सचिन मात्र अगदी उलट. आडदांड असलेला सचिन जरी फक्त २२ वर्षांचा असला तरी दिसे मात्र जणू समीरचा मोठा भाऊच. आणि तो वागेही तसाच ! आपल्या या अशक्त भावाची तो खूप काळजी घेई. ५ वर्षांपूर्वी समीर जेव्हा वेगळा राहू लागला तेव्हा मात्र सचिन खूप रागावला होता. ‘‘ सबर्बनमध्ये नोकरी आहे म्हणून कुणी वेगळं राहतं का? तू रोज आपली गाडी घेऊन जात जा. मी तुला पेट्रोल भरून देतो. आणि आई तू तरी कशी परवानगी देतेस गं त्याला ? काय गरज आहे वेगळे रहाण्याची? ” —
त्याच्या प्रश्नांच्या या सरबत्तीपुढे नीता मात्र अगदी शांत राहिली होती. सुजयनेही यावर बोलायचे टाळले होते. समीरने वेगळे घर घेऊन राहावे ही खरं तर डॉक्टरकाकांचीच आयडिया होती. बऱ्याच विचारांती सुजयला मान्य झालेली, पण नीताला अजिबात न पटलेली. आपल्या या अशा वेगळ्या मुलाला डोळ्यासमोरून दूर जाऊ द्यायला ती तयार होत नव्हती ते त्याच्या अतीव काळजीमुळेच. डॉक्टरकाका मात्र आपल्या मतावर ठाम होते. “ मुलांची काळजी घ्या, पण त्यांना कुबड्यांची सवय लावू नका. लक्षात ठेवा, तुम्ही काही अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात. केव्हातरी त्याला एकटे राहावे लागणारच आहे. त्याची जबाबदारी त्याला घेऊ द्या. तो खूप हुशार आहे. उगाच का कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पहिल्या फटक्यात एवढा चांगला जॉब मिळाला आहे त्याला ? लोकांच्या विचित्र नजरा पाहून त्याच्या मनाची किती उलघाल होत असेल याचा विचार करा. त्याला विश्वासात घ्या. त्यालाही एकटं वेगळं राहावंसं वाटत असेल तर मग त्याला राहू दे स्वतंत्रपणे. त्याला अभ्यासालाही निवांत वेळ मिळेल. ऐका माझं.” —नीताचा नाईलाज झाला. समीरच्या कलाकलाने त्याचं मत जाणून घेतल्यावर दोघेही तयार झाले, आणि समीर एकटाच वेगळा राहू लागला.
या सर्व घटनेला आज ५ वर्षे झाली. हळूहळू समीरने आपले येणे जाणे हेतुपुरस्पर कमी केले. तसा मोबाईलवर संवाद रोज असे. पण प्रत्यक्ष येणे जाणे मात्र कमी झाले. त्या वर्षीची २६ जानेवारी ही तारीख. सार्वत्रिक सुट्टी असल्याने समीर लवकरच घरी आला. आल्याआल्या देवाच्या आणि आई बाबांच्या पाया पडला. सर्वांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. भेट म्हणून त्याच्या आवडीचे आणलेले कपडे दिले. आज बाहेर जेवायला जायचा बेत होता. नीताने केलेला त्याच्या आवडीचा उपमा सर्वांनी खाल्ला. सचिन मात्र नेहेमीपेक्षा जरा गप्पगप्पच होता त्यादिवशी. संध्याकाळी समीर त्याच्या घरी परत गेल्यावर तो परत नव्याने बाबांशी हुज्जत घालू लागला—
‘‘ बाबा, आपलं एवढं मोठं घर आहे. माणसं ४ व खोल्या ९. असं असताना का तुम्ही समीरला तिकडे असं वेगळं राहायची परवानगी दिली आहेत ? तुम्हाला या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाही.”
‘‘ सचिन, बाळा तू आता मोठा झाला आहेस. काही गोष्टी न सांगता तुला कळल्या पाहिजेत रे.” सुजयचा गळाही दाटून आला होता. “ आज तुला खरं काय ते सांगतो. मला सांग तू समीरच्या बोलण्या-चालण्याकडे कधी बारकाईने लक्ष दिलं आहेस का? ”
‘‘ बाबा, असं का विचारता? तो खूप अशक्त आहे. त्यामुळे तो अगदी हळूबाई असल्यासारखा वागतो. अगदी शांत असतो, कमी बोलतो, हे का मला माहीत नाही? ”
‘‘ अरे बाळा हे सगळं वरवरचं आहे. खरी गोष्ट आम्ही मह्तप्रयासाने सर्वांपासून लपवून ठेवली आहे. पण आज तुला सांगतो. नीट ऐक. समीर १३/१४ वर्षांचा झाला तेव्हा त्याचं वागणं फार बदलायला लागलं होतं. विचित्र व्हायला लागलं होतं. त्याच्या बोलण्याचालण्यात थोडी बायकी झाक येऊ लागली होती. आम्हाला फार काळजी वाटायला लागली होती. मनाला वेगळीच शंका भेडसावत होती. म्हणून त्याला आम्ही डॉक्टरकाकांकडे घेऊन गेलो—- तो दिवस आमच्यासाठी फार भयंकर ठरला होता बाळा. डॉक्टरांनी त्याची सर्व तपासणी केली व त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं —- “ समीर ‘गे’ आहे. त्यामुळे त्याचं वागणं बदलतं आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल.”
काय करावं, काही कळेना. आम्ही अगदी सुन्न होऊन गेलो होतो. ‘आमच्या मुलाच्या नशिबातच हे असं का ?’ हा एकच विचार मनाला सारखा पोखरत होता. तुझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ती बिचारी रडून तिचं दुःख मोकळं तरी करू शकत होती. पण मी— तिच्याइतकंच दुःख मलाही होत होतं. पण मोकळेपणाने रडूही शकत नव्हतो मी. आईला रडतांना पाहून समीर अगदी बावरून गेला होता– सारखा माझ्याच मागेमागे करत होता. या सगळ्यांत आम्हाला आधार दिला तो आपल्या डॉक्टर काकांनी. समीर डोळ्यासमोर आला की आम्हाला रडायला येई. पण डॉक्टरकाकांनी खूप धीर दिला. “ तो समंजस आहे. हुशार आहे. तो समजून घेईल. पण तुम्ही जबाबदारीने वागा.” –त्यांनी एका मानसोपचार तज्ञाशी समीरची गाठ घालून दिली. त्या तज्ञांनी मात्र आपले काम चोखपणे बजावले. या ‘गे’ प्रकाराबद्दल असलेले सर्व अपसमज त्यांनी मुळातून काढून टाकले. काही हार्मोन्सची इंजेक्शन दिली तर तुम्ही नॉर्मल आयुष्य व्यवस्थित जगू शकता हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण देऊन पटवून दिले. तेव्हापासूनच त्यांच्याच सल्ल्यानुसार आम्ही समीरला जास्तीत जास्त स्वातंत्र्य देतो. त्याला वेगळे वाटू नये याची काळजी घेतो. नातेवाईकांनी अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नयेत म्हणून पटतील अशी उत्तरे देतो. आता हेच पहा ना, त्यानेच विचारले, “ बाबा माझे पैसे साठले आहेत. मी घर घेऊ का?” तेव्हा मी त्याला छोटे घर न घेता मोठे घर घ्यायला सांगितले व वरचे पैसे ट्रान्सफर करून दिले. हेतू हा की त्याला असे वाटू नये की आपल्याला कोणी विचारत नाही. कधी तरी आपण जातो तेव्हा त्यालाही कंम्फर्टेबल वाटेल. आणि खरं सांगू का सचिन, माझी तर अशी इच्छा आहे की त्याला कोणाची तरी सोबत मिळावी !”
‘‘अहो बाबा, म्हणूनच तर मी म्हणतोय ना की त्याला घरातच राहू दे म्हणून ! आपण आहोतच ना त्याच्या सोबतीला.”
‘‘अरे अशी सोबत नाही. आयुष्यभरासाठीचा कुणीतरी जिवाभावाचा साथीदार ! त्याच्यावर निसर्गाने हा जो अन्याय केला आहे, त्याची बोच कमी करण्यासाठी जन्मभराची साथ देणारा कोणी जोडीदार– मग तो कोणीही असो– कदाचित याच्यासारखाच असू शकतो की तो. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य एकट्याने काढायचे ही कल्पनाही मला सहन होत नाही रे. लोकांच्या दृष्टीकोनात आजकाल फरक पडला आहे आणि समजा नसेल तर आपण त्यांना पटवून देवू की मन, भावना, आत्मीयता, प्रेम यासाठी सर्वच जण भुकेलेले असतात. समीरसारखे तर कदाचित जास्तच. पण त्यांचा Inferiority Complex त्यांना अबोल बनवतो, एकटं पडायला भाग पडतो. हे थांबवले पाहिजे रे. तो न्यूनगंड घालवला पाहिजे – अगदी जाणीवपूर्वक. त्याची कमतरता लक्षात घेऊन समाजाने जास्तीत जास्त त्याला सामावून घेतले पाहीजे. पटतंय ना तुला ? म्हणून मग मी आपल्यापासूनच सुरुवात केली. कालच तो मला सांगत होता. “ बाबा माझे लवकरच प्रमोशन होईल. मग मी गाडी घेऊ का !” मी सांगितले, ‘‘अरे बिनधास्त घे. चांगली लेटेस्ट मॉडेल घे. तुझ्या गाडीतून आपण चौघे ट्रीपला जाऊ. भरपूर मजा करू. “ सचिन अरे, आता कळले ना, की आईवडील आपल्या मुलांची आयुष्यभरच काळजी करत असतात. ती कितीही मोठी झाली तरी ! गे असला म्हणून काय झालं… माझाच मुलगा आहे ना ! त्याने चुकीच्या वाटेने जाऊ नये यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. आणि बाळा आता हे सगळं समजल्यावर तू त्याच्यावरचं तुझं प्रेम तसूभरही कमी होऊ देऊ नको. त्याच्याशी असं काहीच वागू-बोलू नकोस ज्यामुळे तो दुखावला जाईल, आणखी कोशात अडकेल. समजतंय ना तुला ? कुणीच त्याच्याशी कुठल्याही वेगळेपणाने वागायचं नाहीये. ऐकशील ना माझं ?”
सचिनने आपले भरून आलेले डोळे पुसत मान हलवली. ‘ समीर कसाही असला, कुठेही रहात असला, तरी मी कधीच त्याला अंतर देणार नाही बाबा ‘ मनोमन जणू शपथच घेतली त्याने. आणि इतका वेळ त्या दोघांचं बोलणं ऐकत असलेली नीता —तिच्या डोळ्यातले अश्रू जरी थांबत नव्हते तरी डोळ्यात एक निश्चय स्पष्ट डोकावत होता. ती स्वत:लाच बजावत होती, ‘माझा मुलगा असे ना का वेगळा, पण नाही होऊ देणार मी कधीच त्याला दुबळा. बनवेन त्याला समर्थ ! कणखर आणि कर्तृत्ववान —- इतरांपेक्षा जास्तच‘—
© सौ प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈