सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
साहित्य अकादमी पुरस्काराचा शानदार सोहळा चालू होता. एक एक पुरस्कार विजेते राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्विकारत होते. सुरेख व्यासपीठ, सुंदर सजावट. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची निवेदिका, व्यासपीठावरचे मान्यवर, आणि अंगरक्षक. प्रेक्षागृहातली सभ्य विद्वत्ता. सगळेच कसे नीटनेटके होते.
याच वातावरणात एक व्यक्तिमत्व होतं शोभा विधाते. त्यांच्या “परीघ” या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा, सावित्री फुले सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता. निवेदिकेने त्यांचे नाव पुकारले. थोडक्यात परिचय करून दिला. आणि त्यांना मंचावर पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आमंत्रित केले.
शोभा विधाते याही वयात चेहऱ्यावर प्रसन्नता टिकून होत्या. रुपेरी केस, सोनेरी काठाची पेस्टल शेडची साडी, गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ, वयाला शोभेसाच सारा साज.
त्या मंचावर आल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. निवेदिका म्हणाली, ” शोभाताई! आपल्या या काव्य प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. ‘परीघ या काव्यसंग्रहातील एकेक रचना मनाला भिडते. इतकी खरी वाटते की, वाचताना जाणवते, या साऱ्या आपल्याच भावना आहेत. आपले मनोगत आपण प्रेक्षकांसमोर मांडावे.”
पोडीअमचा माईक शोभाताईंनी हलकेच पकडला. समोरच बसलेल्या विनय कडे त्यांनी पाहिलं. विनयने अभिमानाने अंगठा दाखवला. शोभाताई बोलू लागल्या.
शोभा. एक मध्यमवर्गीय, रिती रिवाज, परंपरा सांभाळणाऱ्या समाजभिरू कुटुंबातील मुलगी. बाळबोध वळणाची, चौकटीत एका वर्तुळात वाढत होती. मुलीची जात, मुलीची मर्यादा, मुलीने कसे वागावे, मुलीला काय शोभते, तिने काय करावे, काय नको, कसे राहावे याच परिघातले शब्द ऐकत, ऐकत, आखलेल्या पाऊलवाटेवर ती चालत होती. पण आतले आवाज आणि आतली वादळे तिला काहीतरी वेगळच सांगत होते. तिचे स्वतःशी संवाद घडत होते. तिचे भांडणही तिच्या स्वत:शीच होत होते.
एक दिवस आई तिला म्हणाली,
“शोभे! आता पुरे शिक्षण. वयोपरत्वे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तरच ते चांगले असते. जे समाजमान्य आहे तेच करावे. आम्ही आता तुझ्यासाठी स्थळे पाहतो. एकदा तुझे लग्न झाले की दादाचाही मार्ग मोकळा होईल.”
तेव्हां तिने आईला विचारले,
“असं का? तुम्ही दादाच लग्न करा की. मला इतक्यात लग्न करायचं नाही. मी काय करायचं ते मी ठरवेन.”
तेव्हां दादा चमत्कारिकपणे तिला म्हणाला होता,
” मग काय घोडनवरी झाल्यावर करणार का लग्न? आणि कधी आरशात पाहिलेस स्वतःला? बुद्धिमत्तेचा गर्व उगीच नको करूस. शेवटी चूल आणि मुल, रांधा, वाढा, उष्टी काढा हेच खरे तुमचे जग. कळलं का? “
दादाच हसणं, बोलणं, चेष्टेतलं असलं तरी खूप लागलं होतं. प्रातिनिधिक स्वरूपाचं वाटलं होतं. पुरुषप्रधान परिघातलं ते अत्यंत संकुचित, कोत्या मनाचं, खच्चीकरण करणारं, अडथळ्यांचं, हीन वक्तव्य होतं.
शोभा गप्प बसली होती याचा अर्थ तिने ते मानलं, स्विकारलं, असा मुळीच नव्हता. पण तिला एक माहीत होतं, लग्नाळू मटिरियल आपल्यात नाही. “स्वजातीय, सुस्वरूप, सुगृहिणी, गृहकृत्यदक्ष, कमावती वधु पाहिजे” या सदरातले एक एक शब्द, तिने तिच्या मनाच्या खिडकीतून भिरकावून लावले होते. एक मात्र नक्की होतं, समाजभीरु, मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी, तिचं अस्तित्व, तिचं असं जगणं, बोलणं तणाव देणार होतं.
तरीही एकदा तिने आई-वडिलांच्या आग्रहास्तव एक स्थळ, हो! स्थळच म्हणूया बघण्यास होकार दिला होता. त्याला नकार देताना तिने आईला स्पष्ट सांगितले,
” तुला माहित आहे का त्याने मला काय विचारले?”
” काय?” आईने भीतभीतच तिला विचारले.
शोभाने हसून म्हटले,” अगं! तो विचारत होता, तुम्हाला मच्छरदाणीत झोप येते का?”
तरीही आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतीच.
प्रश्न तिथेच संपला होता? की परिघाबाहेरचा एक अवघड प्रश्न सुरू झाला होता? दरम्यान काही घटनाही घडल्या.
शेजारच्या घरातल्या मीनाने स्वतःला जाळून घेतले होते. आत्महत्येचे कारण समजलेच नाही. अपघाताच्या नावाखाली केस मिटवली गेली.
नंदिनी मावशीची मुलगी कायमसाठी तिच्याकडे परतली होती. घटस्फोटाची नोटीस तिला मिळाली होती. प्रश्न होता तिच्या एकुलता एक मुलाच्या कस्टडीचा. नंदिनी मावशीच्या मुलीचे आर्थिक बळ शून्य होते. कायद्याच्या कचाट्यात तिचे मातृत्व भरडून गेले होते.
प्रमोशनसाठी बॉसने घातलेल्या अटी धुडकावल्यामुळे वैजयंतीची बढती नाकारली गेली. तिला राजीनामा द्यावा लागला होता.
आजूबाजूला घडणाऱ्या अशा अनेक घटनांशी शोभा तिचं नातं शोधत होती. आणि शोधता शोधता तीही या प्रवाहाच्या विरोधात जात होती.
सोशियोलॉजी मध्ये ती पीएचडी करत होती. तिला टाटाची शिष्यवृत्तीही मिळाली होती. “शिक्षण, शोषण, आणि आजच्या स्त्रीचे स्थान सुरक्षितता आणि भवितव्य.” हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. तळागाळापासून ते उच्चस्तरीय गटातल्या अनेक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून तिने असंख्य टिपणे गोळा केली होती. आणि त्याचबरोबर जीवनाच्या एका महाद्वारातून, मिळालेल्या अनुभवातून, ती अधिक स्वयंप्रेरित, कणखर आणि निश्चयी बनत चालली होती.
अनेक वेळा ‘हा दिवा मालवू की नको’ या संभ्रमातही ती पडली होती. पण तरीही पायाखालची वाट तिला बोलावत होती.
दादाचं लग्न झाल्यावर तिने घर सोडलं. स्वतंत्र बाण्याची, स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिलेली, भले समाजासाठी वेगळी, चौकटी बाहेरची पण ती एक सक्षम स्त्री होती. ‘हा माझा मार्ग एकला’ हेही ती जाणत होती. तिची वाट सोप्पी नव्हती. आई-वडिलांना तिने सांगितले,
“तुम्ही माझे जन्मदाते आहात. मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. आपण एकत्र राहू शकतो.”
पण त्यांनी मुलाकडे राहणंच पसंत केलं. ते कधीही म्हणाले नाहीत,” तू मुलगी असलीस तरी मुलासारखीच आहेस.”
शोभा विधाते, हे नाव ठळक होत गेलं. साहित्य क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व. समाजाभिमुख लेखनामुळे वाचकांचा ओघ वाढत गेला. पुस्तकांचा प्रचंड खप झाला. अनेक मुलाखती घडल्या. अनेक साहित्य कट्ट्यांवर एक शानदार व्यक्तिमत्व झळकत होतं.
शोभा विधाते.
मुलाखतकार हटकून विचारायचे, ‘आता शेवटचा प्रश्न. थोडा व्यक्तिगत. आपण लग्न का केले नाही?’
त्यावेळी मात्र शोभाच्या मनात विनोदानेच यायचे की सांगावे का यांना? “मला मच्छरदाणीत झोपायचे नव्हते.”
आयुष्याच्या मध्यंतरानंतर विनय भेटला. खरं म्हणजे तो तिचा बालमित्रच होता. अतिशय बुद्धीमान, विचारी. किती तरी वक्तृत्वस्पर्धेची व्यासपीठे दोघांनी मिळून गाजवली होती. पण तारुण्यात जे धागे जुळू शकले नाहीत, ते या उतार वयात जमले.
गृहस्थी भोगून मोकळा झालेला विनय आणि वेगळाच प्रपंच सांभाळत आलेली अविवाहित शोभा. विनय ची कहाणी जेव्हा शोभाने ऐकली तेव्हांही तिला वाटले होते, सहजीवनाचे सौख्य शून्य टक्के असताना ही माणसे आयुष्यभर तडजोडी करत कशी जगतात? आता बायको जग सोडून गेली, मुलगा परदेशस्थ झाला. विनयचे जीवन मुक्त होते का एकाकी होते? आणि अशा मध्यावर शोभाने, विनयशी तिचे जीवन का जोडले? प्रश्न अनुत्तरीतच होता. कदाचित प्रवाहात हरवलेले दोन ओंडके योगायोगाने जवळ आले असतील.
गेल्या काही वर्षापासून शोभा आणि विनय, विवाह बंधनात न अडकता एकत्र रहात आहेत. परिघा बाहेरचं जीवन जगत आहेत.
मंचावरून बोलत असताना, शोभा जणू अदृश्यपणे मनाच्या प्रोजेक्टरवर तिच्या आयुष्याचा चित्रपट पाहत होती. प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. संग्रहातल्या अनेक कवितांची जन्म कहाणी तिने उलगडली होती. मनोगताच्या समारोपाशी येताना ती म्हणाली,
“एक कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे, परीघ.”
तुझ्या दारावर किती वेळा थाप वाजवली
पण आतून तू कडी काढलीसच नाहीस
बंद दारापलीकडे मला ऐकू येतोय
तुझा घुसमटलेला श्वास
निशब्द नाकारलेले ठोके
अगं! मी तुझं अस्तित्व.
तुझी अस्मिता, स्वातंत्र्य विश्वास.
पण तुझं दारच बंद!
सोडायचा नाही परीघ तुला
म्हणतेस, बरी आहे रे मी या वर्तुळातच
पण लक्षात ठेव, वाटलंच कधी तर दार उघड
मी पायरीवर तुझी वाट बघत आहे ..
नि:शब्द प्रेक्षागृहात नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आणि बाहेरच्या काउंटरवर “परीघ” काव्यसंग्रहाच्या सर्व कॉपीज संपून गेल्या.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈