सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 1 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

गेटला कुलूप असलेलं पाहून माझी नजर आपोआपच मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. अकरा वाजत आले होते. म्हणजे रत्ना ऑफिसला जायला निघालीही होती. मी बॅगेतून किल्ल्यांचा जुडगा काढला, आणि गेटचं कुलूप उघडलं. अंगणात गेल्यागेल्याच माझं लक्ष सहज त्या कोप-याकडे गेलं, जिथे रत्नाची कायनेटिक ठेवलेली असते. कोपरा रिकामा होता ते पाहून रत्ना घरातून निघाली असल्याची खात्रीच पटली. मी घराच्या दाराचं कुलूप काढून बैठकीच्या खोलीत गेलो. समोरच्या टी-पॉयवर एक चिठ्ठी ठेवलेली बघताच, मी झटकन् ती चिठ्ठी उचलली आणि वाचायला लागलो. रत्नाने लिहिलं होतं… ‘‘ तुम्ही लायब्ररीत गेल्यावर थोड्या वेळातच तुमचे बालमित्र ‘सुदामा’ घरी आले होते. याच महिन्यात अठ्ठावीस तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्याचं आमंत्रण द्यायला आले आहेत. आज संध्याकाळच्या साडेपाचच्या बसचं परतीचं रिझर्व्हेशनही करून आले आहेत. मी तुमच्या दोघांचा स्वयंपाक करून ठेवला आहे. त्यांचे एक परिचित माझ्या ऑफिसजवळच राहतात. त्यांना आमंत्रण देण्यासाठी ते माझ्याबरोबरच आले आहेत. येतांना रिक्षाने येतील. दुपारी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला रजा घेणे शक्य नव्हते. तरीही ऑफिस सुटल्यावर थेट स्टँडवर येण्याचा प्रयत्न करते. मागे कधीतरी तुम्ही मला सांगितलं होतंत की तुमच्या या बालमित्राला खीर खूप आवडते म्हणून… मी खीर करून ठेवली आहे. दोघं मिळून सगळी संपवून टाका बरं का. मी माझ्यासाठी डब्यात घेऊन आले आहे.” 

श्री भगवान वैद्य प्रखर

चिठ्ठी वाचून टी पॉयवर ठेवता ठेवता माझं लक्ष टी.व्ही. जवळ ठेवलेल्या हॅन्डबॅगकडे गेलं. मी सहजच जवळ जाऊन पाहिलं… ती बॅग एखाद्या घराची छोटी प्रतिकृती आहे असंच वाटून गेलं मला… भिंतीवरचं प्लॅस्टर कितीतरी ठिकाणी निखळल्यावर कसं दिसतं… तशीच दिसत होती ती बॅग. तिच्या एका कोप-यात एक कागद चिकटवलेला होता… ज्यावर लिहिलेलं होतं… राजाराम चिंधूजी निंबाळकर, नेहरू वॉर्ड, मु.पो.रामटेक, जि.नागपूर… तो कागदही बराच जीर्ण झालेला होता. पण तो त्या बॅगेला इतका घट्ट चिकटलेला होता की, तो त्या बॅगेचाच अंगभूत भाग आहे, असं वाटत होतं. 

राजाराम आल्याचं कळल्यामुळे माझं मन आणि शरीरही रोमांचित झालं होतं. किती वर्षांनी भेटणार होतो आम्ही दोघे…पण… पण अजूनही त्याच्या एका मुलीचं लग्न व्हायचं आहे?… खरं तर त्याच्या मुलींची नावंही मला नीटशी आठवत नाहीयेत्. त्यातल्या दोघी तिघींची लग्नं तर नक्कीच झालेली होती. त्यांच्या निमंत्रण-पत्रिका आल्या होत्या की मला… पण कधी फक्त अभिनंदनाचा मेसेज पाठवून, तर कधी त्याच्याशी फोनवर बोलून, मी माझी ‘मैत्री’ निभावत राहिलो होतो. एक-दोनदा तर रत्नानेच पत्र पाठवली होती त्याच्या बायकोला… म्हणजे रेणुकाला. माझ्या घराची वास्तुशांत होती तेव्हा मीही आमंत्रण दिलं होतं त्याला… आणि माझ्या मुलीच्या लग्नालाही बोलावलं होतं. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर, त्यासाठी तो नक्की येईल अशी आशा… नव्हे.. खात्रीच वाटली होती मला. भलेही त्याच्या मुलामुलींच्या लग्नाला मी जाऊ शकलो नसलो, तरी माझ्या मुलीच्या लग्नाला त्याने यायला नको होतं का?… एकच तर मुलगी आहे मला…मला जरा रागच आला होता त्याचा. पण रत्नाने त्यावेळी मला समजावलं होतं… ‘अहो, तुमचा बालमित्र गरीब आहे. मित्राच्या मुलीच्या लग्नाला ते रिकाम्या हाताने कसे येऊ शकले असते? शिवाय यायचं म्हणजे तीनेकशे रूपये तरी बस भाड्यासाठी खर्च करावेच लागले असते ना त्यांना…” आमच्या मित्र-प्रेमात तिने अढी पडू दिली नव्हती… पण आता इतक्या वर्षांनी तो आला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार त्यामागे… किती वेळ मी असल्या शंकांच्या भोव-यात सापडलो होतो कोण जाणे… दारावर टकटक झाली, तसा मी भानावर आलो. माझा अंदाज खरा ठरला होता… राजारामच आला होता. दार उघडताक्षणी आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली… नंतर कितीतरी वेळ त्या ड्रॉइंगरूममधल्या पंख्याची हवासुद्धा आमच्या स्पर्शाने जणू गहिवरली आहे असंच मला वाटत राहिलं होतं. जवळपास वीस वर्षांनी भेटत होतो आम्ही… वीस वर्ष हा काही थोडा-थोडका काळ नाही. 

अत्यंत आपलेपणाने निमंत्रण पत्रिका माझ्या हातात ठेवून राजाराम आंघोळीला गेला. मी डायनिंग टेबलावर जेवणाची सगळी तयारी करून ठेवली. आणि मग ती पत्रिका वाचायला लागलो. तेवढ्यात राजाराम आवरून तयार होऊन आला. ‘चल जेवायला…’ मी त्याला म्हटलं…

‘‘तुला खीर आवडते हे मी रत्नाला कधी सांगितलं होतं कोण जाणे… पण आज खास तुझ्यासाठी ती खीर करून ठेवून गेली आहे बरं का ! मी गोड खूपच कमी खातो. आणि ‘दोघांनी मिळून खीर संपवून टाका’ असं रत्नाने चिठ्ठीत बजावलं आहे. त्यामुळे आता याची जबाबदारी पूर्णपणे तुझ्यावर आहे मित्रा…” खरंतर राजारामने लवकरात लवकर माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं… वागावं असं मला वाटत होतं.

‘‘ मनोहर, अरे माझं खीर खाणं तर कधीच बंद झालंय्. चार मुली आणि एक मुलगा… यांना वाढवता वाढवता, त्यांची लग्नं करून देता देता माझी कंबर पार मोडून गेली आहे. खीर सोड… आता चहाही बिनदुधाचा पिण्याची वेळ आलीये माझ्यावर. आज वहिनीने माझ्यासाठी खीर केली आहे, तर मी नक्कीच खाईन… पण इतकी सगळी नाही खाऊ शकणार बाबा… आता सवयच राहिली नाहीये, आणि आता अशी इतकी पौष्टिक खीर तर पचणारही नाही मला. आपण पूर्वी खायचो ती खीर कशी असायची ते आठवतंय् ना तुला? डबाभर भातात एक वाटी दूध… एक वाटी पाणी… आणि फक्त दोन चमचे साखर घालायची. खूप वेळ ते सगळं एकत्र घोटत रहायचं आणि घटाघट पिऊन टाकायचं… भाताचा तांदूळही रेशनचा असायचा … तो इतका सुवासिक कुठला असायला? ”… राजाराम इतक्या मोकळेपणाने बोलायला लागला, याचा खूप आनंद झाला मला. त्याने निदान जेवण होईपर्यंत तरी मनावर असणा-या ताण-तणावातून बाहेर यावं आणि मोकळा श्वास घ्यावा असं मला अगदी मनापासून वाटत होतं. म्हणून मी झटकन् विषय बदलला. आणि त्याच्या कौटुंबिक बाबतीत बोलायच्या ऐवजी, गावात काय परिस्थिती आहे, या विषयावर बोलायला लागलो.. पण बहुतेक राजारामला या विषयात मुळीच रस नव्हता. म्हणून त्याने अगदी थोडक्यात मला सांगितलं, की आता रामटेकला जाण्यासाठी फक्त सकाळी, संध्याकाळीच नाही, तर दुपारीही बस सुरू झाली आहे… बस स्टँड आता गावाबाहेर हलवला गेला आहे. विड्याच्या पानांच्या ज्या बागा होत्या, त्या जागी पानांच्या ऐवजी आता निवासी कॉलन्या उगवल्यात. आपल्या बरोबर तो एक ‘हा’ होता ना, त्याचे कॅन्सर झाल्याने निधन झाले. दुसरा एक होता तो क्षयरोगाने ग्रासलेला आहे. आणि तो आणखी एक होता ना… कबड्डी खूप छान खेळायचा तो… त्याने कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली… राजारामचं हे सगळं बोलणं ऐकून माझ्या  लक्षात आलं की, माझ्या लहानपणीच्या ज्या एका छोट्याशा बागेची अतिशय मोहक अशी प्रतिमा माझ्या हृदयात मी सांभाळली होती, आणि मला कायम जी आशा वाटत होती की, माझ्यासारखीच आणखी आणखी प्रगती करत, त्या छोट्या बागेचं आता मोठं उद्यान झालं असेल, तसं काहीच झालं नव्हतं… त्यातल्या एकन् एक रोपट्यावर काळाची घातक कीड पडली होती. मी हळूच राजारामकडे पाहिलं… आणि… आणि मला वाटून गेलं की, जीवन मरणाच्या सततच्या संघर्षात, कसं तरी करून स्वत:ला जपण्यात यशस्वी होत राहिलेलं, त्याच बागेतलं एक झाड माझ्यासमोर उभं आहे… मी नकळत गप्प झालो. मग राजारामच बोलायला लागला… 

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments