सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ बेघर भाग – 4 – सुश्री सुमति सक्सेना लाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – युनिव्हर्सिटीतून येऊन मी जरा पडले होते, एवढ्यात दरवाजाशी सतवंती येऊन उभी राहिली. `दीदी, आपल्याला भाभींनी बोलवलय.’ आता इथून पुढे )

`बोलावलय? म्हणजे आहेत कुठे ते लोक?’

जुगनी तशीच उभी राहिली. `जी, ड्राईंगरूममध्ये’

मी घड्याळाकडे पाहीलं. `कुणी आलय?’

`जी, भाभीजींचे चौकवाले भाऊ आलेत.’

मी विचार करू लागले, नवीन आलाय, तर मला का हे लोक बोलावताहेत? नवीन अंजलीचा शेजारी आहे. आर्किटेक्ट आहे. मी ड्रॉईंग रूममध्ये पोचले, तेव्हा दिसलं, टेबलावर खूप कागद पसरलेले आहेत आणि त्याच्या भोवतीनं सगळे लोक बसले आहेत. टेबलाजवळ जागा देण्यासाठी अंजली उठून उभी राहिली. बाकी सगळे बसून होते. मग भैया बोलू लागला, `दीदी, दीपच्या खोलीविषयी विचार करत होतो. आता आमचं इथं येणं-जाणं खूप वाढलय. आता थोड्या दिवसात दीपचं लग्न होईल. त्याची बायकोही येत जात राहील.’

मी दीपकडे पाहून हसू लागले. `तेव्हा दीपच्या खोलीचं रिनोव्हेशन करायचा विचार तुम्ही करताय.’

`नाही. ती गोष्ट नंतरची. खरं तर काय आहे, दीपची खोली एक तर्‍हेने घराचा पॅसेज आहे. त्याची बायको आल्यावर तसं चालणार नाही, नाही का?’

`ते बरोबर आहे…. मग?’ घर अशा तर्‍हेने बांधलेलं होतं, की माझ्या खोलीतून बाहेर पडायचं असेल, तर मला दीपच्या खोलीतून बाहेर जावं लागत होतं. आत्तापर्यंत या गोष्टीबाबत कुठलाच त्रास नव्हता. त्यामुळे तिकडे लक्षदेखील गेलेलं नव्हतं. पण आता? मी भैयाकडे बघितलं.

भैया टेबलावर पसरलेल्या घराच्या नकाशावर झुकले होते. `दोन मार्ग आहेत. एक तर तुझी आणि दीपची खोली बदलायची.’

मी सुन्न झाले. वाटलं, शरीरातलं सारं रक्त डोक्यात चढून कानफटीवर हातोडे मारतय. मी स्वत:ला प्रयत्नपूर्वक शांत केलं. मी भैयाकडे बघितलं. `आणि दुसरा मार्ग?’

`दुसरा म्हणजे तुझ्या खोलीला थेट ड्रॉईंगरूममध्ये उघडणारा दरवाजा करायचा. म्हणजे तू तुझ्या खोलीतून थेट ड्रॉईंगरूममधून बाहेर पडू शकशील!’

मी उगीचच घराच्या नकाशाकडे बघू लागले. `एक उपाय आणखीही आहे.’ मी शांत स्वरात म्हंटलं. व्हरांड्याच्या दुसर्‍या बाजूला असलेली खोली अगदी माझ्या खोलीसारखीच आहे. तेवढीच मोठी. गार्डन फेन्सिंग. ती तेवढी चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली नाही, म्हणून तुम्हा लोकांचं लक्ष तिकडे गेलं नाही.’

भैयाने माझं बोलणं एकदम तोडून टाकलं. `नाही दीदी! ती खोली पहिल्यापासूनच गेस्ट रूम म्हणून वापरतोय आपण! ती खोली दीपला दिली, तर सायकॉलॉजीकली मला वाटत राहील, की मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढलं.’

`माझ्या जीभेवर आलं होतं, की म्हणावं, `मग ठीक आहे. ती खोली मला द्या. पण जर भैया लगेच तयार झाला, तर मनाला खूप त्रास होईल. अपमानित झाल्यासारखं वाटेल. मी खूप वेळ विचार करत राहिले. सगळे जण माझ्याकडेच बघत होते. मनात आलं, सांगून टाकावं, तुम्हाला योग्य वाटेल तसं! तसंही जीवनात आत्तापर्यंत हेच करत आले आहे. पण अनपेक्षितपणे माझ्यातला `मी’ माझ्या सवयीच्या विरुद्ध कणा ताठ करून उभा राहिला. मला माझा स्वर संयत करण्यासाठी प्रयत्न करावा लागला. `नाही भैया! मी माझी खोली नाही देऊ शकणार. पहिल्यापासून मी तिथेच राहिले आहे. मी दुसरीकडे कुठे राहण्याचा विचार नाही करू शकत.’

दीप अंजलीला खेटून बसलाय. त्याचा उजवा हात तिच्या मांडीवर पडलाय. ती त्याला थोपटते आहे…. कशासाठी? कुणास ठाऊक? त्याची प्रतिक्रिया थांबवण्यासाठी… किंवा त्याला धीर देण्यासाठी… किंवा मग उगीचच….

भैयाने दीपकडे आणि दीपने भैयाकडे अर्थपूर्ण नजरेने बघितलं. वाटत होतं, जसे दोघेही निराश झाले आहेत. कदाचीत खोलीची मागणी दीपनेच केली असावी. भैयाने कागद उचलले आणि नवीनकडे ते देत म्हणाला, `ठीक आहे. आपण इथे दरवाजा बसवून घ्या आणि दीपच्या खोलीत एक वॉल टू वॉल कपाट बनवून घ्या आणि खिडक्यांचे दरवाजे नवीन करा.’

मी आणखी थोडा वेळ तिथे बसले. असं का वाटलं कुणास ठाऊक, की माझी उपस्थिती तिथे असहज वाटते आहे. मी तिथून उठून निघून आले. एक अजबशी बेचैनी मनात पसरून राहिली. मी स्वत:च्या मानाला समजावत राहिले, अशा प्रकारची व्यवस्था होणारच होती. भैयाने विचार केला नसता, तर या गोष्टीचा विचार मला करावा लागला असता. नाही तर माझ्या घरात येणं जाणं मला बाहेरच्या व्हरांड्यातून फिरून करावं लागलं असतं. तशी भाच्या-सुनेच्या खोलीत सारखी तर जाऊ शकत नाही ना! तरीही बैचैनी वाढतच गेली. भैया आणि दीपची इच्छा आणि सुविधा यात अडचण बनून राहिले, म्हणून अजबशा ग्लानीने घेरले अणि त्याच बरोबर या घरातल्या आपल्या अस्तित्वाला दुसर्‍या दर्जाचं बनू दिलं नाही, त्याचा अजब असा एक संतोषही वाटला.

आज-काल काय झालय कुणस ठाऊक, की स्वत:ला अगदी एकटं एकटं वाटू लागलय. काय होतय कुणास ठाऊक, की बसल्या बसल्या डोळे भरून येऊ लागलेत. काय झालय कुणस ठाऊक, वारंवार मनाला समजवावं लागतय.

भैया, अंजली, दीप आणि पल्लवी आले आहेत. विवाहानंतर पल्लवीला घेऊन दीप पहिल्यांदाच येतोय. तिच्यासाठी सगळं अगदी व्यवस्थित सगळं योग्य पद्धतीने व्हायला हवं. आठवडाभर मी तिच्या स्वागताची तयारी करते आहे. सगळी कपाटं रिकामी करून, झाडून-पुसून मी  स्वच्छता करून घेतलीय. नोकरांना आत्तापर्यंत शेकडो निर्देश दिले आहेत. प्रत्येक दिवसासाठी वेगळी बेड कव्हर, टॉवेल निवडून ठेवलीत. कोणत्या दिवशी कोणती क्रोकरी काढायची, कोणता मेन्यू बनवायचा, सगळं सगळं ठरवून टाकलय. क्रोकरीच्या सामाानातील खूप काही मी खरेदी केलय. खूप काही मम्मी-पापांच्या वेळेपासूनचं आहे. त्यांच्या स्टाईलची छाप अजूनही या घरावर आहे. पापा गेले, त्याला चौदा वर्षं झाली. मम्मी गेली, त्याला अकरा. पण वाटतय, किती तरी वस्तूंवर त्यांचा स्पर्श अजूनही रेंगाळतोय.

अंजली हिंडून हिंडून पल्लवीला घर दाखवते आहे. या वेळी दोघी बाहेरच्या व्हरांड्यात उभ्या राहून बोलताहेत. पल्लवीच्या खुशीच्या, आनंदाच्या चित्कारांचा आवाज आतपर्यंत येतोय.  `मम्मी आपली दोन्हीही घरं सुंदर आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची. कानपूरच्या  घराचं मॉडर्न आर्किटेक्ट. एकदम लेटेस्ट डिझाईन आणि हे घरसुद्धा किती सुंदर आहे…. व्हिक्टोरिअन स्टाईलचं. … उंच सिलींग कौलांची वर, खाली उतरती छपरं. गेटमध्ये येताच घर पाहून तब्बेत खूश होते…. बाग पण किती संदर आहे.’

अंजली हसते आहे. `बागेचं क्रेडिट आत्याकडे जातं. तीच इथे राहते आणि तीच सगळं करून घेते.’

माझे हात थांबले. वाटलं, अंजली पल्लवीला माझं घर नाही, स्वत:ची प्रॉपर्टी दाखवते आहे…. मग मी कोण आहे या घरात? केअर टेकर? माझं कोणतं घर आहे? कोणतंच नाही. पण मी तर हे घर दिवस रात्र संभाळत, सजवत होते. भ्रमात होते मी. आता या भ्रमाातून बाहेर पडायलाही खूप उशीर होऊन गेलाय. पल्लवीच्या उपस्थितीत मला अजब तर्‍हेने हीन-दीन असल्याचं जाणवू लागलं. वाटू लागलं, की मी या घरात पडलेली एखादी वस्तू आहे…. फालतु सामानाप्रमाणे. मी तिथेच उभी होते. डायनिंग रूम आणि ड्राईंगरूमच्या मधे काचेची मोठीशी भींत. … समोरच्या प्रâेंच विंडोतून दिसणारा अतिशय सुंदर असा फुलांचा बगिचा…. मखमली हिरवळ, लाल बारीक मुरुमांचा बनलेला ड्रईव्ह वे. मी तर दररोज इथे उभी राहून अलग अलग कोनातून आपलं घर न्याहाळते…. दररोज आपलंच घर… त्याच्या व्यवस्थित ठेव-रेवीवर मुग्ध होते. पण आज जसं काही या घराबद्दल काही जाणवतच नाही आहे. तीच बाग आहे… तेच घर… तेच छत… त्याच भिंती… पण या सगळ्यात मी जशी काही `बेघर’ होत चाललेय.

 – समाप्त –

मूळ कथा – बेघर – मूळ – मूळ लेखिका – सुश्री सुमति सक्सेना लाल  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments