सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कुंदन भाग- २… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

(मागील भागात आपण पाहिले – बाई बाहेर आल्या. म्हणाल्या मी आज जरा बाहेर जाणार आहे. बहुतेक उद्यापासून दुपारी मी घरात नसेन, तुला सांभाळावं लागेल सगळं, मी सगळं म्हणजे काय हे विचारणार इतक्यात त्याच म्हणाल्या कुंदनकडे लक्ष द्यावं लागेल. त्या सारखं कुंदन चा उल्लेख करत होत्या पण माझं धैर्यच होत नव्हतं कुंदन कोण, कुठे आहे म्हणून विचारायचं? – आता इथून पुढे )

मी घरी आले मनातून कुंदन जात नव्हता ठाण मांडून बसला होता. इतकं काय गुपित होतं त्यात म्हणजे बाईंनी मला सांगायला काय हरकत होती. उद्यापासून कुंदनशी आपला संबंध येणार असा विचार मनात येऊन एक शिरशिरी आली अंगावर, त्या खोलीत कुंदन आहे का? कुंदन किती वर्षांचा असेल? त्याला काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम असेल का? अनेक विचार मनात घेऊनच मी रात्री झोपले, सकाळी लवकर उठावं लागणार होत ना?

सरावल्यासारखी मी बेल दाबली आणि आतून लीनाताई आली वाटत असं म्हंटल्याचा  बाईंचा आवाज आला. मी दचकले म्हणजे दोन दिवस मी जात होते त्यांच्याकडे. कुंदन कोण हे समजलं पण नव्हतं. मग बाई कोणाशी बोलतात इतकं स्पष्ट? दार उघडल्यावर मी डावीकडे नजर वळवली कारण आज त्या खोलीचं दार उघड होत, मी तिकडेच बघत घरात आले, किचनच्या दिशेने निघाले आणि बाई त्या खोलीत गेल्या, मी चहा टाकला आणि मला बाईंचा आवाज ऐकू आला म्हणत होत्या आज दूध तुला लीनाताई देईल, मी थबकले म्हणजे आज कुंदन कोण ते समजणार होत तर मला, मी चहा झालाय म्हणून बाईंना सांगितले बाई आतमध्ये होत्या त्या खोलीत, तिकडूनच त्यांनी आवाज दिला आणि म्हणाल्या आपल्या तिघांचे कप घेऊन इकडेच ये. बाप रे मला का कोणास ठाऊक हे सगळं गूढंच वाटत होतं. मी ट्रे मध्ये कप ठेऊन पॅसेजमध्ये आले तर बाई हसत होत्या. काहीतरी कुंदनला सांगून म्हणत होत्या, ‘आता बघ गंमत…’ असं काहीतरी, माझी पावलं जड झाली होती. कुंदन म्हणजे कोण हे गूढच राहावं असं काहीतरी वाटत होत मला, मी दाराजवळ आले बाईंना चाहूल लागली म्हणाल्या, ‘लीना आत मधे ये, मी आतमधे आले डाव्याबाजूला बेड होता, बेडरूमच्या विंडोज बंद होत्या, आतमध्ये मंद टेबललॅम्प लावला होता. मी कुंदनला बघण्यास अधीर होते.  बाई बेडवर बसल्या होत्या आणि पलीकडे पांघरून घातलेलं काहीतरी होत. मला काहीच समजत नव्हतं, म्हणजे कुंदन कुठे आहे ते, मी पुढे आले आणि दचकले बेडवर बाईंच्या बाजूला एक दोन फुटांचा बाहुला उशीला पाठ टेकवून ठेवला होता. बाप रे त्या बाहुल्याचे डोळे इतके बोलके वाटत होते म्हणजे जणू ‘ये लीनाताई…’ असं काहीतरी म्हणत असावेत असं वाटलं.

मला धक्काच बसला म्हणजे बाई त्या बाहुल्याला कुंदन म्हणत होत्या. अगदी एखाद्या जिवंत व्यक्तीसारखं त्याच्याशी वागत होत्या. माझा तो दिवस भयंकर गोंधळात गेला. कुंदनला दूध देण्यापासून त्याचे केस विंचरणे, त्याचा बेड नीट करणे, त्याला कपडे घालणे अशी अनेक हास्यास्पद कामं मी करत राहिले. दुपारी अचानक बाई म्हणाल्या मी जाऊन येते. जरा कुंदन कडे लक्ष ठेव. दुपारी त्याला गोष्ट सांगायला लागते मोठ्यांदी त्याशिवाय तो झोपत नाही. मी जाऊन येते दोन तासात. बाई गेल्या मी दार लावलं आणि त्या खोलीच्या दाराकडे बघितलं, आतमध्ये कुंदन होता. मी किचन मध्ये गेले काही कामं केली. सारखं लक्ष कुंदनच्या खोलीकडे जात होत. माझं धैर्यच होत नव्हतं तिकडे जाण्याचं, कारण कुंदनचे डोळे खूप बोलके होते जणू माझं तुला सगळं करायचं आहे त्याशिवाय गत्यंतर नाही असं ते सांगत असावेत. मी लक्षच दिलं नाही तासभर॰ अचानक मी दचकले म्हणजे मी हॉल मध्ये बसले होते त्यामुळे कुंदनची खोली दिसत नव्हती कारण हॉल मधून उजवीकडे जावं लागे आठ दहा फूट, पण अचानक मी दचकले कारण पॅसेजमध्ये मला सावली दिसली. मी भेदरल्यासारखी झाले तोंडातून शब्द फुटत नव्हता. मी घाबरून बेडरूममध्ये आले. बेडरूम त्या खोलीला चिटकून आहे. मी बेडरूमचं दार लावून घेतलं. दुपारची शांतता भयाण वाटत होती. माळ्यावर एकटीच असल्याची भावना गडद झाली होती त्यामुळे गुदमरल्यासारखं होत होतं. मी बेडवर शांत बसले, दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. हळू हळू मी बेडवर कधी आडवी झाले मलाच समजलं नाही. अचानक मला जाग आली कश्याने तरी मी डोळे उघडले आणि भयंकर दचकले, बाई समोर उभ्या होत्या माझ्याकडे एकटक बघत. मी उठले बघून त्या तरातरा बाहेर गेल्या बहुतेक कुंदनच्या खोलीत गेल्या असाव्यात. मी बाहेर आले, बेसिनमध्ये तोंडावर पाण्याचे सपकारे मारले. बाईंनी मला हाक मारली, मी सगळं अवसान एकवटून त्या खोलीत गेले. बाई म्हणाल्या कुंदन इतक्या हाका मारत होता का लक्ष दिलं नाहीस? मी गोंधळले काय बोलावं हेच सुचेनासं झालं. मी चाचरत म्हणाले बाई तो एक बाहुला आहे ना, हाका कश्या मारेल? हे सांगताना मी कुंदनकडे बघितलं त्याच्या डोळ्यात छद्मी भाव दिसत होते.

दुसऱ्या दिवशी मी गेले नाही. बाईंचा फोन आला, का आली नाहीस म्हणून विचारलं? मावशी सुद्धा आश्चर्यचकित झाली, का नाही गेलीस म्हणून विचारलं, काय सांगणार मी? दोन दिवसांनी का कोणास ठाऊक सकाळी उठून गेले. बेल दाबली आतून हालचाल जाणवली, लीनाताई आली असं काहींतरी बाई म्हणाल्या कुंदनला. मी आत आले, सरळ कुंदनच्या खोलीत गेले. तो खोलीत नव्हता. मी बाईंना विचारलं. म्हणाल्या, ‘किचन मधे बसलाय.’ मी किचनमधे आले. कुंदन खुर्चीवर बसला होता मी आल्यावर जणू त्याने नजर फिरवली माझ्याकडे मी आतून थरारले. बाई दुपारी गेल्या बाहेर. मी कुंदनच्या खोलीला बाहेरून कडी घातली आणि हॉल मधे बसून राहिले. दुपारभर त्या खोलीतून धडपड ऐकू येत होती, जणू कुंदन बाहेर येण्याची खटपट करत होता. मी बेडरूममधे जाऊन भिंतीला कान लावला, मला मुसमुसण्याचा आवाज आला. मी गडबडले हे काय आहे म्हणजे नक्की काय प्रकार आहे, हेच समजेनासं झालं. मी खोलीपाशी आले, हळूच कडी काढली आणि कानोसा घेतला कोणीतरी धावत दारापासून पळाल्यासारखं वाटलं मी पटकन आत आले तर कुंदन बेडवर उशीला टेकून बसला होता माझ्याकडे बघत. बाई आल्या. खोलीत गेल्या. आतून दार लावून घेतलं. काहीतरी बोलत होत्या कुंदनशी.

मी जाणं सोडलं बाईंकडे॰  काहीतरी गूढ निश्चित होतं त्या खोलीत आणि कुंदनबद्धल, मावशी विचारत होती का जात नाहीस म्हणून? मी तिला काय सांगू?

नंतर खूप गोष्टी कानावर आल्या बाईंबद्धल, तो फ्लॅट हल्ली बंद असतो. बाईंना हॉस्पिटल मधे ठेवलंय बरेच महिने, फ्लॅटमधून कसले कसले आवाज येतात म्हणे.

वॉचमननी विचारलं कुठे जाताय लीनाताई? का कोणास ठाऊक मी वर आले आणि बेल दाबली आतमध्ये रिकाम्या नळ्या एकमेकांवर आपटल्याचा आवाज घुमला, मी दाराला कान लावला आणि अचानक मला आतून आवाज ऐकू आला “लीनाताई तू ये ना सोबतीला …. मी एकटा असतो” …

 मी थरारले, घाईघाईत लिफ्टमधून खाली आले आणि बिल्डिंगच्या बाहेर पडले. 

मूळ लेखक – श्री अनिरुद्ध

प्रस्तुती – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments