सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ करामत… ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
शाळा सुटली ; पण नेहमीसारखी धमाल करावीशी वाटेना. कोणाबरोबर बोलावंसंही वाटेना. मग मी मित्रांना सोडून एकटाच निघालो.
तसं तर अधूनमधून आईचं आणि आजीचं भांडण होतच असतं. पण कालचं भांडण मात्र खूप मोठं होतं.
आता शनिवारी आजी-आजोबा गावच्या घरी राहायला जाणार.
मला आजी-आजोबा खूप आवडतात. आई-बाबांएवढेच.
आईबाबा रोज सकाळी ऑफिसात जातात, ते रात्री घरी येतात. दुपारी शाळेतून आल्यावर आजीआजोबांना बघितलं, की मला खूप बरं वाटतं. कितीही दमलो असलो, कंटाळलो असलो, तरीही मग मी शहाण्या मुलासारखे बूटमोजे काढून कोपऱ्यात ठेवतो, दप्तर जागेवर ठेवतो. कपडे बदलून युनिफॉर्म हँगरला लावतो. हातपायतोंड स्वच्छ धुतो. मग आम्ही तिघं जेवायला बसतो.
मला भेंडीची भाजी आवडत नाही, हे आजीला बरोब्बर ठाऊक आहे. म्हणून ती मला थोडीशीच भाजी वाढते. ती मी पटकन खाऊन टाकतो.
तर आता मला रडूच येतंय. सोमवारपासून मी घरी गेल्यावर आजीआजोबा नाही दिसणार.
कसं मिटणार त्यांचं भांडण? मी तर एवढुस्सा आहे. काहीच करू शकणार नाही मी. आईला सांगायला गेलं, तर ती मलाच ओरडणार आणि आजीशी बोलायला गेलं, तर ती म्हणणार, “बाळा, लहान मुलांनी मोठ्यांच्या मध्ये बोलू नये.”
ठीक आहे.आहे मी लहान. पण मला वाटलं – सगळ्यांनी एकत्र राहावं, तर चूक आहे का ते?
तेवढ्यात आठवण झाली. सकाळी आई चिडून बडबडत होती, “या भांडणांनी डोकं नसतं थाऱ्यावर. शिवाय ऑफिसमधून यायला उशीर झालेला. मग लक्षातच नाही राहिलं, त्यांची औषधं आणायचं. इथे आहेत, तोपर्यंत आपली जबाबदारी आहे. तिकडे गावाला गेल्यावर त्यांनाच उठून जायला लागणार, तेव्हा कळेल.”
मी दूध पित होतो. एकदम मला सुचलं, “आई, मी आणू आजीची औषधं?”
“आणशील तू? बरं झालं. म्हणजे त्यांच्या दुपारच्या गोळ्या चुकणार नाहीत. हे घे पैसे. आणि हे प्रिस्क्रिप्शन. आणि उरलेले पैसे….”
“आई, मी उरलेल्या पैशांतून सुतरफेणी आणू आजोबांसाठी?”
आई काहीच बोलली नाही. म्हणजे ती ‘नको’ म्हणाली नाही. म्हणजे सुतरफेणी घ्यायची.
तर मी औषधांच्या दुकानात गेलो. काकांनी दिलेली औषधं नीट बघून घेतली. आईने मागे सांगितलं होतं, तसं त्यावरच्या तारखापण बघितल्या. बिलावरची बेरीज, उरलेले पैसे… सगळं मोठ्या मुलासारखं बघून, तपासून घेतलं.
मग शेजारच्या मिठाईवाल्याकडे गेलो. तिथे सुतरफेणी घेतली.
आजोबांना फक्त मऊ पदार्थच खाता येतात. घट्ट पदार्थ खावेसे वाटले, तरी ते खाऊ शकत नाहीत. सुतरफेणी तर त्यांची एकदम आवडती.
मी कधीकधी आजोबांना विचारतो, “आजोबा, मी तुम्हाला आवडतो?”
ते म्हणतात,”होsss.”
मग मी विचारतो, “किती?”
मग ते सांगतात, “खूssप.”
मग मी म्हणतो, “असं नाही, आजोबा. खूप म्हणजे किती, ते सांगा.”
मग आजोबा मला जवळ घेतात, माझा पापा घेतात आणि म्हणतात, “तू मला खूप खूप आवडतोस. अगदी सुतरफेणीपेक्षाही जास्त.”
आज मी त्यांना सांगणार आहे, “मी तुम्हाला सुतरफेणीपेक्षा जास्त आवडतो, ना? मग मला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघंही इथेच राहा.”
मी घरी गेल्यावर बघितलं, तर आजी जेवायला वाढत होती. माझ्या ताटात खूप भेंडीची भाजी घातली होती. अगदी बटाट्याच्या भाजीएवढी. मग मी ठरवलं, आज भेंडीची भाजी असली, तरी सगळी भाजी खायची. नाहीतर आजीला वाईट वाटेल.
तेवढ्यात औषधांची आठवण झाली.
“आजी, ही घे तुझी औषधं.”
“अरे, तू आणलीस?”
“हो गं. काल आईला ऑफिसात खूप काम होतं ना? म्हणून तिला उशीर झाला आणि ती दमलीही होती. त्यामुळे औषधं आणायची राहिली. आज दुपारच्या गोळ्या चुकतील ना, म्हणून तिने मला आणायला सांगितलं. आणि हे बघ. आजोबांना आवडते, म्हणून तिने सुतरफेणी आणायला सांगितली.”
आजीच्या डोळयांत पाणी आलं.
“तशी गुणी आहे रे तुझी आई. ऑफिसमध्ये खूप काम, जबाबदारी, जाण्यायेण्याची दगदग…. दमून आल्यावर चिडचिड होते माणसाची. खरं तर, मीच समजून घ्यायला पाहिजे. आता नाही हो भांडायची मी.”
“मग तू इथेच राहशील ना? गावाला नाही ना जाणार?”
आजी काहीच बोलली नाही.
“आजी ss,”मी तिचा दंड धरून तिला हलवलं.
तरीही ती गप्पच होती.
“आजी, नको ना जाऊस मला सोडून.”
“नाही रे सोन्या. तुला इथे सोडून गेले, तर माझं लक्ष तरी लागेल का तिकडे? शिवाय मी गावाला गेले, तर ऑफिसातून आल्यावर घरातलं काम, तुझा अभ्यास…. सगळं तुझ्या आईवर, एकटीवर पडणार. झेपणार नाही रे तिला. तुझ्या बाबांना तर अजिबातच वेळ नसतो…”
आजीआजोबा इथेच राहणार, म्हणून मला एवढा आनंद झाला, की मला भेंडीची भाजीसुद्धा आवडली. मी आणखी मागून घेतली.
जेवून झाल्यावर हाततोंड धुतलं, तेवढ्यात आईचा फोन आला.
मग मी आईला सांगून टाकलं, “आई, आई, आजी म्हणत होती, तू खूप गुणी आहेस म्हणून. ती मला सांगत होती, तुला ऑफिसात किती काम असतं, जबाबदारीचं….”
“हो रे. त्यांना जाणीव आहे त्याची. कौतुकही आहे. माझंच चुकतं. मी उगाचच भांडत बसते त्यांच्याशी. यापुढे लक्षात ठेवीन मी आणि भांडणार नाही अजिबात.”
“मग आजीआजोबा गावाला…..”
“नाही, नाही. मी सांगेन त्यांना – इथेच राहा, म्हणून.”
“माझी शहाणी शहाणी आई!” असं म्हणून मी फोनवरच तिला पापा दिला.
सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈