? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग 3 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

(मागील भागात आपण पाहिले – “त्यांना दिदीच्या लग्नाची चिंता असावी व त्यामुळे त्याना दिलेली औषधे देखील काम करीत नाहीत असे मला वाटतेय. पण सध्या तरी याबाबत कोणता उपाय नाही. कारण त्यासाठी आम्हाला तिकडे महाराष्ट्रात गावी जावे लागणार आणि स्थळे पहावी लागणार. मी एवढा लहान आहे की मला यातले कांही म्हणजे कांहीच समजत नाही .”  आता इथून पुढे)

आता श्रीकांत विचार करू लागला. तसे पाहिले तर सुजाता पाहिल्या पाहिल्या नाकारण्या–सारखी मुलगी नव्हती. या दोन दिवसातले तिचे वागणे देखील मर्यादाशील होते. त्या सुरेखासारखी ती सतत पुढे पुढे करीत नव्हती. कॉलेजमध्ये ती हुशार आहे. तिच्या आई-बाबांची तिला काळजी आहे. वाह्यात खर्चाची मुलगी दिसत नाही. तिच्या बाबांच्या बाजूने विचार केला तर त्यांची काळजी चुकीची नाही. आप्पांकडून त्यांनी कांही मागणे हेदेखील अनाठायी नाही. अन्यथा आम्ही त्यांचे कांही देणे लागतो , हे नाकारणार कसे ? अरे, तो रिक्षावालासुद्धा वेळेला त्यांच्या उपयोगी पडतोय. असे असेल व आप्पाना ठरविले असेल की ‘यशवंतांच्या वेळेला उपयोगी पडुया ‘  तर ते व्यवहार सोडून नाही.  हां …. लगेच लग्न झाले तर माझे पुढचे शिक्षण कदाचित लांबेल, थांबेल किंवा मेरिटमध्ये होणार नाही. त्याचा त्रास मला आयुष्यभर होईल. त्यामुळे लग्नाला मान्यता द्यावी व दोन वर्षे थांबायला सांगावे, हे उचित होईल. असा विचार करीतच श्री उठला व रमेशला बोलला की ‘चल, घरी जाऊ.’

श्रीकांत घरी आला व सर्वाना म्हणाला, ” माई, आप्पा आणि काका, कांही गोष्टी तुम्ही समजून घ्या. माझे शिक्षण अजून दीड वर्षे शिल्लक आहे. नोकरी मिळायला सहा महिने जातीलच. त्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभे राहायला अजून दोन वर्षे तरी जाणार आहेत. त्यामुळे आणखी दोन वर्षांनी मी हे लग्न करेन. तोपर्यंत सुजाताचे शिक्षण ही संपेल. ज्या प्रामाणिकपणाने आप्पानी रुपये परत केले त्याच प्रामाणिक वर्तणुकीचा हवाला देऊन मीही काकांना वचन देतो की मला नोकरी लागल्या लागल्या मी सुजाताशी लग्न करीन . पण सुजाताची तशी तयारी आहे का व मी तिला मान्य आहे का हेही तिने माझ्यासमोर सांगितले पाहिजे. ”

सगळेच गप्प बसले. कारण श्रीकांत कांही खुसपटे काढून लग्न दोन वर्षे पुढे ढकलू शकतो हे दोघांनीही आधीच ओळखले होते . त्यावर काय बोलायचे व त्याचे मन वळवायचे याचे उत्तर कोणाकडे नव्हते. कदाचित सुजातालादेखील श्रीकांतचे बोलणे पटले असते. पण ही मोठी माणसे तिला कांही चॉईस देतील याची शक्यता नव्हती. माईला घरी कामाला मदत करणारी सून हवी होती. आप्पाना सुनेला नोकरीला पाठवायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्यासाठी पुरेसे होते. तिच्यात दुसरी खोटदेखील नव्हती. त्यामुळे श्रीला लग्नासाठी तयार कारणे आणि एकदम कमी खर्चात मंगल कार्य त्वरित  उरकणे एवढीच प्राथमिकता दोघांकडे होती. यशवंत काका सुद्धा थोडे दु:चित होऊन बसले. श्रीकांतने त्याच्या पुरता हा प्रश्न सोडविला होता. ही रात्र मात्र त्याच्यासाठी झोपेचे खोबरे झाल्याची होती. तिसऱ्या दिवसाचा सकाळचा नाष्टा शांत शांत झाला. कोणी फारसे बोलले नाही. सुजाताला यातले बहुतेक कांहीच माहीत नव्हते. त्या दिवशी दोघांचीही कॉलेजिस सुरू होती. त्यामुळे दोन दोन लेक्चर्स अटेंड करून आम्ही दोन तासात परत येतो असे सांगून दोघे कॉलेजला पळाली. त्यावेळी आकरा वाजले असतील. गप्पा चालू असतानाच यशवंत काकांच्या छातीत पुन्हा दुखू लागले. रिक्षा आणायला श्रीकांतलाच पळावे लागले. तो चौकात आला व त्याला ती त्यांची नेहमीची रिक्षा दिसली. त्याने पटकन ‘यशवंत काकांना दवाखान्यात न्यायचे आहे’ असे सांगितले व रिक्षा घेऊन आला . रिक्षावाल्याला तो दवाखाना माहीत होता. ते दवाखान्यात गेले. डॉक्टर्सनी परत इसीजी काढला. तो काकांना आलेला दुसरा अटॅक होता. सिव्हीयर नव्हता, पण दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते. डॉक्टरांनी अत्यावश्यक इंजेक्शन देऊन त्यांना झोपविले होते. कांही औषधे आणावी लागणार होती. रिक्षावाला अजून थांबला होता. त्याने पटकन जाऊन औषधे आणली. तोपर्यंत सुजाता आणि रमेश देखील दवाखान्यात आले. डॉक्टरनी संध्याकाळी काकांना डिस्चार्ज दिला खरा, पण त्यांना त्रास होईल, टेंशन येईल असे कोणी वागू नका असे त्यांनी बजावले. काकांनी जिने चढू नयेत किंवा उतरू नयेत हे सांगायला डॉक्टर विसरले नाहीत. थोडक्यात काकांची तब्येत हा त्या फॅमिलीचा कळीचा मुद्दा असणार आहे , हे श्रीकांतने ओळखले. कदाचित रात्री काकांना झोप नसावी व त्यामुळे त्यांना त्रास झाला असावा हीही शक्यता होती. दवाखान्यातून परत आल्यानंतर आप्पा श्रीकांतला बोललेच , “श्री, काकांना टेंशन-फ्री करणे हे केवळ तुझ्याच हातात आहे बघ. आता अशीही आणि तशीही सुजाता तुला पसंत आहे , तर आणखी दोन वर्षे थांबणे काकांवर अन्याय होतोय . मान्य आहे की लग्न लगेच झाले तर तुम्हा दोघांना दोन वर्षे तुमची मने मारावी लागणार आहेत. पण मग मी कशाला आहे? ती घरात म्हणजे आपल्या गावात तर थांबणार आहे व तुझे शिक्षण आम्ही करतोय ना ? माझ्या मित्राच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हे समजून घे रे ! “

श्रीकांत कांहीच बोलला नाही. मात्र विमनस्कपणे बाहेर गेला. ही मोठी माणसे मुलांकडून कशाकशाची अपेक्षा ठेवतील व इतरांबरोबर स्वतःला त्रास करून घेतील हे सांगता येत नाही , असे त्याच्या मनाने घेतले. तो बाहेर देवडीवर बसला असताना त्याला  सुजाता येताना दिसली. ” कांही नाही , शेजारी पाण्याची गरम पिशवी आणायला चाललेय.” ती बोलली व झपाझप पुढे गेली. श्रीकांतच्या डोक्यात आले की सुजाताच्या मनात काय आहे हे तिला विचारावे. पिशवी घेऊन आलेल्या सुजाताला त्याने थांबवले व “थोडा वेळ बैस” ,बोलला. ती पण अवघडून थोडे अंतर ठेवून बसली . श्रीकांतला नियतीचे हसू आले. “असे किंवा तसे , हिला माझी बायको व्हायचे आहे , तरीही नियती अशी लक्ष्मण रेषा का मारते?” त्याने स्वतःलाच विचारले. मात्र सुजाताला बोलला,

“कशी आहे आता काकांची तब्येत?”

“खूपच काळजी घ्यावी लागणार आहे.” ती खाली मान घालून बोलली.

“होय, खरे आहे,” श्रीकांत म्हणाला, ” पण हे असे किती दिवस ?”

” माझ्या लग्नाचे बाबांनी टेन्शन घेतलेय,” ती बोलली.

” म्हणजे तुला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत तर….?”

“होय, मी कांही आता लहान नाही. योग्य वयात मुलीचे लग्न व्हावे असे कोणत्या बाबाला वाटणार नाही? त्यात त्यांचा हा हार्टचा आजार. त्यांनी कोणावर भरोसा ठेवायचा? घरात आर्थिक तंगी आहेच. आता तर आजीच्या पेन्शनवर घर चाललेय. बाबाना त्यांच्या डोळ्यासमोर माझे लग्न व्हायला हवेय. तुम्ही इथे यायच्या आधी ते दररोज असेच बोलत असायचे. असेही म्हणायचे की तुझे लग्न मी ठरविले आहे गं. पण स्वतंत्र विचार करणाऱ्या तुम्हा मुलांवर अन्याय कसा काय करायचा? ” तिने सांगितले.

“बस्स … तुला एवढेच माहीत आहे? ” श्रीकांतने विचारले.

” म्हणजे ? तुम्हाला काय म्हणायचे आहे काय ? डॉक्टरनी आणखी कांही वेगळे सांगितले आहे काय ? ” तिने शंका घेऊन विचारले.

“अं … हं …! आजाराबद्दल नव्हे , मी लग्नाबद्दल विचारले.

“तुम्ही सांगा ना ?” तिने प्रश्नार्थक चेहरा केला.

“तुझ्या माझ्या लग्नाबद्दल . तुझ्या बाबांनी माझ्या आक्काच्या लग्नात आप्पाना पैसे देताना तुझ्या माझ्या लग्नाचे सूतोवाच केले होते. …..” श्री बोलला .

“अहो, हा तुमच्यावर अन्याय आहे. तुम्ही नका मान्य करू. आधी शिक्षण संपू दे. नोकरी किंवा व्यवसाय सुरू होऊ दे. आणि तुमच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करा.” ती चकित होऊन बोलली.

“तुला मी पसंत नाही का? “

“तसे नाही हो. चुकीचा अर्थ नका घेऊ. मी तर खुश असेन हो…, पण संसाराच्याही प्रायोरिटी असतात. मुलांच्याही असतात आणि मुलींच्याही.  त्यात अशा भावनांचा गुंता नको.”

” अगं पण …. हे मोठे लोक प्रेशर आणतील. त्यावेळी तू ‘नकार’  देशील?

“तुम्ही द्याल का ? ” तिने साशंकतेने विचारले.

“आजपर्यंत मी आप्पांचा शब्द खाली पडू नाही दिला . खूप कष्टातून त्यांनी मला पुण्याला इंजिनिअरिंगला टाकतेय. त्यामुळे मी आप्पांच्या प्रस्तावाला नकार नाही देऊ शकणार. कदाचित तुझ्या लग्नाची चिंता मिटल्यामुळे काकांची तब्येत सुधारेल. औषधांना रिस्पॉन्स मिळेल. काकांना कांही कमी जास्त झाल्यास आप्पा त्यांना व मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. फार अवघडून गेलोय मी.” श्रीकांत बोलला.  

सुजाताच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ‘आपल्या बाबांसाठी हा तरुण स्वतःचे भविष्य पणाला लावतोय’ ही बाब तिच्यासाठी असाधारण होती. “हे पहा,” ती म्हणाली , ” माझ्या बाबांचा तुम्ही एवढा आत्मीयतेने विचार करताय. मला तर गुदमरल्यासारखे झालेय. मी एवढंच सांगते की मला तुम्ही तुम्हाला पाहिल्या दिवसापासून खूप आवडला आहात. आता तर अधिक आदर आणि अभिमान वाटतोय. तुम्ही जसे सांगाल तशी मी वागेन. तुम्हाला शिक्षण संपवून नोकरी लागेपर्यंत मी तुमच्याकडे ना कांही मागणार, ना कोणता हट्ट करणार , ना कसली तक्रार करणार. ना हॉटेल, ना सिनेमा, ना फिरणे, ना साड्या …. मी कसलीच मागणी करणार नाही. आप्पा व माईंच्या मी आज्ञेत राहीन. सध्या माझे बाबा हीच माझी प्रॉयोरिटी आहे. मी यापेक्षा अधिक कांहीच सांगू शकणार नाही.” आणि मुसमुसतच ती घरात पळाली.

श्रीकांतच्या मनातील मळभ दूर निघून गेले होते. त्याचा चेहरादेखील किंचित प्रसन्न झाला होता. सुजाता त्याच्या अपेक्षेपेक्षाही मॅच्युअर होती. तिचा तिच्या बाबांवर खूप जीव होता. असे म्हणतात की लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने आधीच स्वर्गात बांधलेल्या असतात. त्याचे प्रत्यंतर त्याला येत होते. त्याच्या भविष्याची कदाचित हीच मुहूर्तमेढ होती व म्हणून त्याने वडगाव ते बडोदा असा ध्यानी, मनी, स्वप्नी नसलेला प्रवास केला होता, यावर त्याने मनातल्या मनात शिक्का मारला आणि अचानक होणाऱ्या किंवा झालेल्या लग्नाबद्दल कॉलेजातील मित्रांना कसे तोंड द्यायचे? याची तो उजळणी करू लागला.

–  समाप्त 

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments