जीवनरंग
☆ “झळा ज्या लागल्या जीवा…” भाग 2 ☆ सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे ☆
(मागील भागात आपण पाहिले – खोट्या अभिमानापायी तुला तुझ्या प्रिय माहेर पासून मी तोडलं आता मात्र मी तुला वचनातून मुक्त करतोय, आपण सगळेच बाबांकडे जाऊ, मी त्यांची क्षमा मागेन आणि ते मोठ्या मनाने मला माफ करतील. आता इथून पुढे)
पण तुमचा स्वभाव असा बनायला काहीतरी कारण झाले असेल ना? असं जन्मापासून काही कोणी माणूस रागीट नसतो.मुड चांगला असलेला बघुन मी यांना विचारलं, लहानपणापासून आई बाबा आणि मी तिघांचं कुटुंब होतं त्यामुळे मी म्हणेन तेच आणि तसेच घरात होत असे. बाहेरच्या जगामध्ये आवाज चढवल्या शिवाय किंवा आवाज चढवून बोलल्याशिवाय कुणाला आपली कदर नसते हे माझ्या लक्षात आलं. आणि तोच माझा स्वभाव होऊन गेला. नंतर नंतर सगळे आपल्या रागाला भितात ह्याचाच एक प्रकारचा मला प्रकारचा कैफ मला चढू लागला .माझा तर तो स्वभाव कधी बनून गेला ते माझं मलाही कळले नाही.पण आज मात्र मी तुझी क्षमा मागेन. आपण बाबांकडे नक्की जाऊ.पण या लॉकडाऊन मुळे आम्ही जाऊ शकलो नाही .आणि मग तर काय माझी आणि त्यांची साथच सुटली.
‘आई, खरंच ग कसं समजावलस ग मनाला? भरून आलेले डोळे पुसत शरयुने विचारलं ,माझा नवरा चेष्टेत जरी मला काही बोलला ना तरी मी नाही सहन करू शकत.
अगं,बेटा, माझ्या माहेरच्या रम्य आठवणी तर माझ्याबरोबर सतत असतात .मनाला वाटेल तेव्हा मी माझ हे गाठोडे सोडून बसते कधी हसू येतं तर कधी आसू. आज चाळीस वर्ष झाली माहेर सोडून त्यांची काही खबरबात मला नाही. तेव्हा आमचा खूप मोठा जुन्या पद्धतीचा वाडा होता.सारी समृद्धी होती .दाराशी गुर होती, शेती होती, आता काय आहे? कस आहे कोणाला ठाऊक?आज तुमच्याशी बोलून छान वाटलं बर का मुलांनो, शेखर आज माझी नेहमीची गोळी दे बर. मधमाशांच्या पोळ्याला खडा लागावा तसे झाले आहे .हे आठवणींचे मोहोळ सुखाने झोपू देणार नाही. नुसती तगमग होत राहील त्यापेक्षा गोळी घेतलेलीच बरी.
त्यानंतरचे काही दिवस शेखर शरयू स्नेहा सारखा लॅपटॉप घेऊन बसत होती ,एकदमच एवढ कसलं काम आलय कोण जाणे?आणि चार-पाच दिवसांनी शेखर संध्याकाळी ऑफिस मधून आल्या आल्या मला आणि स्नेहा ला म्हणाला चला ,”आपल्याला देव दर्शनाला जायचे आहे.शरयू आणि ओंकार पण येणार आहेत. तरी पण एवढ्या उन्हात ?मुल लहान आहेत त्यांना त्रास होईल.मी बोलायचा प्रयत्न केला. नको ग आई ,आधीच खूप उशीर झालाय आता आणखी उशीर नको गाडी आहे आपली काही त्रास होणार नाही. आता कोणी फाटे फोडू नका .मला रजा पण मिळाली आहे चार दिवसांची. उद्या पहाटेच निघू या.
मला तर या मुलांच काही कळतच नाही .परवा मी आठवण केली तर म्हटला ,सध्या जरा जास्त काम आहे नंतर बघू आणि आज अगदी गडबड करतात. लगेचच दुसऱ्या दिवशी प्रवासाची जय्यत तयारी करून आम्ही सगळे बाहेर पडलो खूप दिवसांनी प्रवास करत असल्यामुळे मी गाडीचा, एसी चा त्रास होऊ नये म्हणून गोळी घेतली आणि मला प्रवासाची छान गुंगी चढू लागली मुलांवर सारं संपून मी खुशाल झोपेच्या स्वाधीन झाले .
आई, उतरायचे ठिकाण आले ग .शेखर मला उठवत होता एवढी कशी मेली झोप लागली म्हणून मी चुटपुटत उठले. गाडीतून उतरायला स्नेहाने हात दिला माझा हात तिच्या हातात होता, आणि एका वाड्यासमोर मी उभी होते .आजूबाजूचा परिसर बदलला असला तरी ज्याचा ठसा कायम मनावर होता तो वाडा मी कसा बरं विसरेन ?हे बहुदा स्वप्नच असेल .मी स्नेहाचा हात अजून जोरात दाबला तिला म्हटलं ,चिमटा तरी काढ मला,कसले कसले भास होतात, अजून झोपेत आहे की जागी झाले तेच काही कळत नाही.
‘आई. अहो खरंच आहे. ‘
भव्य असा वाडा, व्यवस्थित तेलपाणी पॉलिश केलेला छान दरवाजा आज फुलमाळांनी सजवला होता. वाड्याचं दार अगदी रिमोट कंट्रोलने घडल्यासारखं अलगद उघडले. आणि दारात माझे वृद्ध आई-वडील माझ्या बहिणी भावजया भाऊ उभे होते चांदीच्या ताम्हनातील चांदीच्या निरांजनाने ओवाळून आम्हाला आत घेतले. त्या आधी थरथरत्या हाताने आईने भाकरतुकडा ओवळून पायावर पाणी घातलं, पाण्याच्या त्या डोळ्याला झालेल्या स्पर्शाने मी भानावर आले आणि आईच्या कुशीत कधी शिरले तिच्याशी काय बोलले मला काही आठवत नाही .सगळ्यांचेच डोळे ओलावले होते .घरातले सगळे माझ्याभोवती बसले होते. गप्पा काही संपत नव्हत्या आणि डोळेही वारंवार भरून भरून येत होते .तेवढ्यात भावजय गरम-गरम खमंग थालीपीठ त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबत रव्याचा भरपूर नारळ घातलेला लाडू असा नाश्ता मोठ्या प्रेमाने आली. माझे डोळे थालीपीठ आणि लाडू बघूनच पुन्हा भरून आले मी आईकडे पाहिले. तिने नजरेनेच मला गोंजारलं , इतक्या वर्षानंतरही माझी आवड लक्षात घेऊन आईने माझी आवड जपली होती.
‘सासूबाईंना आता काही काम होत नाही पण तुम्ही येणार म्हणून हे लाडू खास तुमच्याकरता त्यांनी स्वतः केले बर का वहिनी म्हणाली, मी शेखरकडे पहिलं त्याच्या डोळ्यात हसू मावत नव्हतं .माझ्याकडे येऊन तो म्हणाला तुझी कहाणी ऐकून रहावलं नाही बघ आज-काल मोबाइलमुळे जग खूप जवळ आले त्यामुळे शोध घेणे ही अगदी सोप्पं होतं.बाबांच्या कपाटात मामांचे पत्ते होते ते शोधले , संपर्क केला एकदा येऊन ही गेलो आणि तुला आश्चर्यचकित करायचं सरप्राईज द्यायचं ठरवलं. आई ,खुश ना? अरे हे काय विचारणं झालं ?ग्रीष्माच्या काहीली नंतर वळवाची सर यावी ना तसं वाटतंय. उद्या चैत्रगौरीचे हळदीकुंकू करायचे आहे बर का वन्स. मांडणी तुमच्या पद्धतीने तुम्हीच करायची आहे आम्ही मदतीला आहोतच. तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही हळदीकुंकू करत होतो पण आरास मांडणी मात्र फारशी नाही. सासुबाई म्हणायच्या ,”माझी गौर रुसली आहे. ती आली की मोठी आरास करून करू हळदीकुंकू.’
प्रत्येक जण काही ना काही प्रस्ताव माझ्यापुढे ठेवत होता आणि सुखाच्या सरीने मी चिंब चिंब भिजत होते इतकी वर्ष कोरडेपणाने काढलेल्या उन्हाळ्यामुळे हा हळवा पाऊस मी शोषून घेत होते आणि तृप्त तृप्त होत होते.
– समाप्त –
© सौ. श्रध्दा श्रीनिवास गोडसे
मो. – 9762271250