श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 1 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

सूर्य बुडाला. अंधार अस्वलाच्या पावलांनी आला आणि कारखान्या शेजारच्या फडकऱ्यांच्या खोपटास्नी मिठी मारून बसला. सांजवारा सुटला. वाऱ्यानं खोपटांवरचा चघाळा घोंगड्याच्या दशा हलाव्यात तसा हलू लागला.

गाड्या फडातनं भाईर काढून बाया कधीच्या परतल्या. धारापाणी, सैपाक करून, जेवनखाण आवरून झोपायच्या तयारीला लागल्या. खोपटाच्या अंगणात बसून सुली लहानग्या भावाला थोपटत होती. थोपटता-थोपटता तिचं विचारचक्र सुरू झालं… अजून कसं आपलं अण्णा आलं नाहीत? गाड्या लवकर खाली झाल्या नसत्याली? का कारखान्याची मिलच बंद पडली आसन्? एवढा कसा उशीर?

सोळा-सतरा वर्षाची सुली. फडकऱ्याच्या घरात शोभत नव्हतं असलं सौंदर्य. उकीरड्यावर वावरी उगवलेल्या आंब्याच्या सोनेरी रोपागत. तरतरीत, तजेलदार अंग. सोन्याहून पिवळं. मुळचाच सुबक रेखीव बांधा. गुलाबाची लहानशी कळी उमलून रूप यावं. हिरव्या पानांत, काट्याकुट्यांत उठून दिसावं, असं देखणं रूप. हे रूप बघून नकळत आजूबाजूच्या सगळ्या नजरा तिच्यावर रोखल्या जायच्या. ताठ मान आणि चालताना नकळत घडणाऱ्या डुचमळत्या हालचाली. सारंच देखणं. आगळंवेगळं. कारखान्यासमोरल्या त्या कुबट, गलिच्छ तळावरच्या वातावरणापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं. चिखलाच्या राडीत सुंदर, देखणं कमळ उमलावं तशी सुली.

आज्जी आजारी असल्यामुळं सुलीच्या आईला अचानक माहेरी जावं लागलं. नकळत सगळी जबाबदारी सुलीवर येऊन पडली. न्हायतर ती आशीच अर्दालिंबू म्हणून फिरत रहायची. कधी आईबरोबर ऊसाच्या मोळ्या बांधत, वाडं गोळा करत. तर कधी अण्णांचा धारदार कोयता हाती घेऊन ती कनाकन् ऊस खापलायची. एका घावात दोन कंडकं करायची. पण, आई गावाला गेल्यामुळं आता सगळंच थांबलं होतं. एका खेळकर पोरीवर घराची सारी जबाबदारी येऊन पडलेली.

सुलीला सैपाक येत होता. कालवण कसं करावं, भाकरी कशा थापाव्या, भाताला मिठ-पाणी किती घालावं, हे तिला आईनं शिकवलेलं. आणि बाकी सारं ती आईचं बघूबघून शिकलेली होती. बाईच्या जातीची उपजत जाण तिच्या ठायी होती. घरचं काम वढता वढता चार वर्षाच्या धाकट्या भावाला सांभाळणं, हे तर तिचं रोजचंच काम. 

रानामाळात, मोकळ्या वातावरणात वाढलेली सुली. दिसायला किरकोळ. पण, कामाला काटक. घरकामात लव्हाळ्यागत लवून हलणारी. सैपाकपाणी, जनावरांची उसाबर आणि घर संभाळण्याची जबाबदारी ती पेलू शकत होती. म्हणूनच तिची आई सगळ्या घराची जबाबदारी आपल्या लेकीवर टाकून माहेराला गेली होती. तिच्या आईच्या उसाबरीसाठी.

म्हातारीनं महीना झालं हातरूण धरलेलं. लेकीचा जोसरा काढलेला. कधी कोरभर भाकरी खायाची. तर कधी नुसतीच भाताची पेजवणी. घडाघडा बोलायची. वाटायचं, आता बरं वाटंल म्हातारीला. उठंल ती ह्या आजारातनं. आता काय होत न्हाय म्हातारीला. तोवर सांजकरून आणखी जास्ती व्हायचं. एकसारखी धाप लागून राह्यलेली. खोकून-खोकून छातीचा भाता झालेला. सुपात घेऊन पाकडल्यावानी वरला जीव वर नि खालचा खाली. भिरमिटल्यागत बडबडायची… ‘पावलांचा आवाज येतोय, कोणतरी मला न्ह्याला आलंय!’ असं म्हणायची. मग म्हातारी भोवतीनं लेकी, सुना, नातवंडं कोंडाळं करून बसायची. आत्ता जीव जातोय का मग जातोय… म्हणूनच सुलीची आई असा ऊसतोडणीचा सिझन मधीच सोडून माहेरी गेलेली.

सकाळी लवकर उठून अण्णाला फडावर जावं लागतं. मग सुली, घर-अंगण स्वच्छ झाडून, लोटून काढते. घर कसलं, पालापाचोळ्याची खोपच ती. पण, अण्णांनी त्यासाठी चांगलं कष्ट घेतलेलं. खोपीसाठी काठ्या-चिवाट्या आणि पटकुरांचा कौशल्यानं वापर केलेला. मोठाले येळू चिरून कामठ्या बनवलेल्या. दोन कामठ्यामधे ऊसाचा पाला भरून कुडासाठी छानशा झापी तयार केलेल्या. सुलीच्या आईनं, शेणामातीच्या काल्यानं भिंती लिंपून गुळगुळीत केलेल्या. अण्णानं खोपीत पाणी गळू नये, म्हणून खतांची मोकळी पोती टाकलेली. त्यावरनं निवडणुकीच्या डिजिटलची ताडपद्रीसारखी पट्टी टाकलेली. चारी बाजूनं गच्च आवळून बांधलेली. वाऱ्यानं उडून जाऊ नये म्हणून त्यावर छोटे-छोटे दगड ठेवलेले. तारेचे कट घातलेले. एक माणूस कसातरी वाकून आत जाईल, असं एक लहानसं दार ठेवलेलं. त्याला लावायलाही एक सुंदर छोटी झापडी. आत उजेड येण्यासाठी चौकोनी भसका पाडलेली एक खिडकी ठेवलेली. पावसाचं शितूडं आत येऊ नये, म्हणून तिला बाहेरून एक जाड प्लॅस्टिकचा कागद लावलेला. या खिडकीमुळं खोपीच्या आतलं सगळं बाहेरच्या उजेडासारखं लखलखीत दिसे. चुलीजवळ स्वयंपाक करता-करता जरा वाकून त्या खिडकीतून बाहेर बघता येई. कुणी आल्या-गेल्याची चाहूल घेता येई. दूरवरचंही दिसे. अगदी कारखान्याच्या गेटसमोरल्या मोठ्या रस्त्यावरची वर्दळसुद्धा दिसे. त्या खिडकीतून पुन्हा पुन्हा डोकावून बघणे, हा सुलीचा छंदच झाला होता.

झाडलोट झाल्यावर सुली, बैलं बांधलेल्या जागचं शेण गोळा करायची. त्याचा शेणकाला करून घर-अंगण सारवून काढायची. उरलेल्या शेणाच्या गोवऱ्या थापायची. अण्णानं रानातनं आणलेलं जळाणकाटूक आणि या गोवऱ्यावर त्यांचा स्वयंपाक आरामशीर होई.

अलीकडं या सुंदर घरात माणसांची वर्दळ जरा जास्तच वाढलीय. टोळीचा मुकादम हटकून घराकडं येतो. तो तरुण आहे. त्याचं लग्न झालं असलं तरी त्याची बायको त्याच्याजवळ रहात नाही. त्याची नजर चांगली नाही. निदान सुलीला तरी तशी वाटते. त्याच्याकडं बुलटगाडी आहे. तिच्यावरनं तो ऐटीत फिरत असतो. बाकीच्यांपेक्षा त्याचे कपडे स्वच्छ असतात. तो आला म्हणजे अण्णांबरोबर अंगणात तासन् तास गप्पा मारीत बसतो. आतबाहेर करणार्‍या सुलीवर डोळा ठेवून राहतो. तिच्या नाजूक हालचाली टिपत राहतो. अण्णा त्याला काही बोलत नाहीत. त्यांना हे कळत नाही का? की त्याच्यालेखी आपण एक अजाण पोर. तो एक करता-सवरता बापय. त्यात मुकादमाकडून अण्णांनी बरीच उचल घेतलेली आहे. हिशोबा-ठिशोबाच्या कामाचं निमित्त त्याला पुरेसं असतं. कधीमधी तो खिशातला मोबाईल काढून त्यावर जोरजोरात बोलत रहातो. दहा हजार… वीस हजार… लाख… असे मोठमोठाले आकडे तो ऐकवीत असतो.

तो घरात आला की सुलीच्या हालचालींवर मर्यादा येतात. काहीवेळा तर तो सकाळी उठल्या-उठल्याच येतो. मग अण्णा त्याच्यासाठी सुलीला चहा करायला सांगतात. चहा करून दिल्यावरही तो हलत नाही. बिडी फुकत उगी हिकडच्या-तिकडच्या गप्पा हाणीत रहातो. तो आत्ता जाईल, मग जाईल सुली वाट पहात रहाते.

तो जास्त वेळ थांबलाच, तर मग सुलीला आंघोळपाणी करणंही अवघड होऊन बसतं. कधीकधी ती बिन आंघोळीचीच रहाते. तर कधी भीत-घाबरत कुडाच्या झापडी पलीकडे अर्धेमुर्दे अंग ओले करून घेते. पहाटे परसाकडला जातानाही तिच्या मनावर प्रचंड ओझं असतं. भोवतालच्या अंधारात काळी अस्वलं आपल्यावर झडप घालण्यासाठी टपलीत, असं तिला सारखं वाटत रहातं. कारखान्यावर एवढ्या दाट वस्तीत दिवसाउजेडी बाई माणसानं परसाकडं जाणं अवघडच. जरी पोटात कळ आलीच, तरी अंधार होईपर्यंत ती तिला तसीच दाबून ठेवते.

– क्रमशः भाग पहिला

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments