सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ अम्मी आणि मम्मी – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
डॉ हंसा दीप
(मागील भागात आपण पहिले – “तुला माहीत नाही का, हे खुनी आपलं आणि पाकिस्तानचं नातं कधी धड होऊ देत नाहीत ते!” आता इथून पुढे )
मम्मी पण ते सगळं ऐकून कावरी-बावरी झालेली होती, पण आधी आजीला शांत करणं गरजेचं होतं. अमेरिकेत असे फुटीरतावादी विचार घेऊन कसं रहाता येईल! आत्ता तर आलोय इथे, अजून धड जम पण बसलेला नाही. आजीच्या या विरोधाला, रागाला इथेच आळा घालणं आवश्यक होतं.
“इथे सगळ्यांचा धर्म वेगवेगळा आहे सासूबाई, सगळे मांस मटण खातात. कोणा-कोणापासून दूर राहील ही?”
“बाकी कोणापासून दूर राहो, न राहो, त्या पाकिस्तान्यांपासून मात्र दूर राहू दे हिला!”
“हे बघ, तीप्पी, तू तिथून आलीस की आंघोळ करत जा. आणखी ऐक, त्यांच्या फ्रीजमधलं काहीही खात जाऊ नको. तिथे जास्त थांबायचं पण नाही. या लोकांचं काही सांगता येत नाही, प्राणी मारून, कापून हात सुद्धा धूत नसतील हे लोक.”
आणखीही बरंच काही बोलत होती आजी, कोण जाणे काय-काय! या वयात, या अनोळखी देशात येऊन रहावं लागण्याची निराशा पण तिच्या या रागामधून बाहेर पडत असावी बहुधा! मम्मीने तृपितला खुणेनेच तिच्या खोलीत जायला सांगितलं. तिला आजीचा हा तिरस्कार कसा काय समजणार होता? तिच्या काकाच्या मृत्युच्या वेळी ती खूपच लहान होती, आणि या आधी अशा काही गोष्टींचा उल्लेखही तिच्यासमोर कोणी केलेला नव्हता.
ती तर वर्तमानातच जगत होती. शाळेतून घरी येता-जातानाचा वेळ हा त्या दोघींसाठी दिवसातला सर्वात चांगला वेळ असायचा, तेंव्हा दोघी जणू एकमेकींची सावली बनून रहात असत. दोन्ही घरातलं वातावरण जवळ जवळ एकसारखंच होतं. सोफ्यावर टाकलेली कशिद्याची कव्हर्स सुद्धा सारखीच होती. घरात शिरल्यावर येणारा वास सुद्धा जवळजवळ सारखाच असायचा. स्वयंपाकघरातून रोटी भाजल्याचा जो सुवास यायचा, त्यामुळे ते घर आपल्या घरासारखंच वाटायचं
आजीच्या या आरड्या-ओरड्याचा त्यांच्यावर काही विशेष परिणाम झाला नाही. अम्मी आणि मम्मी दोघीही आपापल्या मुलींबरोबरच त्यांच्या मैत्रिणीवर पण तसंच प्रेम करायच्या. दोघी दिसायच्याही सारख्याच. लांब केस आणि चमकदार डोळे! अम्मी काही नोकरी वगैरे करत नसल्यामुळे कायम घरातच असायची. शाळेतून परतताना तहरीमच्या घरी गेलं, की अम्मी तृपितवर पण प्रेमाचा वर्षाव करायची. मम्मी दिवसभर कामावर जाऊन घरी आली की तहरीमची चौकशी करायची. तहरीम आणि तृपितची मैत्री त्यांना समाधान द्यायची. तहरीमशी मैत्री झाल्यापासून तृपित परत पूर्वीसारखी झाली होती. इथे आल्यापासून तिचा खोडकरपणा आणि चंचलता नाहीशीच झाली होती, ती आता परत पूर्ववत झाली होती. तृपितला आता शाळेत जाण्याचा त्रासही होत नव्हता, या गोष्टीनंही तिच्या घरच्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मम्मीला पाकिस्तानी आंबे आणि नाजूक कशिदाकारी केलेले कपडे खूप आवडत असत. गच्च भरलेले, गडद रंगाचे, आणि गोड असे सिंध्री व चौंसा जातीचे आंबे दर आठवड्याला घरी यायचे आणि अगदी आवडीने खाल्ले जायचे. मम्मीने आजीला, हे आंबे पाकिस्तानी असल्याचं कधीच सांगितलं नाही, नाहीतर आजीनं त्या आंब्यांना हातसुद्धा लावला नसता. आजी अगदी मिटक्या मारत हे आंबे खायची, आणि वर म्हणायची – “आपल्या देशात असताना कधी असे आंबे खायला मिळाले नाहीत. हे लबाड लोक सगळ्या चांगल्या गोष्टी निर्यात करत असतात!
मम्मी हसायची. तिला माहित होतं, की आजीच्या मनात पाकिस्तानबद्दल जो तिरस्कार होता, तो काकाच्या मृत्यू नंतर अधिकच दृढ झालेला होता. सीमेवर ज्या क्रूरपणे त्याला मारलं गेलं होतं, त्यासाठी ती आजही प्रत्येक पाकिस्तानी माणसाला जबाबदार मानायची. त्यांच्या झाबुआ गावातून जी पहिली व्यक्ती सैन्यात भरती झाली, ती म्हणजे तिचा लाडका धाकटा मुलगा होता. तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात चांगला दिवस होता. अगदी अभिमानाने ती सगळ्या नातेवाईकांना त्याचे तिकडचे किस्से सांगत असायची. मग ती आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नासाठी मुलगी शोधायला लागली तोच त्याचं पोस्टिंग सीमेवर झाल्याची खबर आली, आणि पाठोपाठ एक दिवस हाहाकार माजवणारी ती वाईट बातमी आली! शत्रूचा सामना करताना तिचा लाडका मुलगा हुतात्मा झाला! त्याचं प्रेत सुद्धा मिळालं नाही. त्या आईचं काळीज दगडाचं होऊन गेलं. अनेक दिवसांच्या मौनानंतर, कधीही पाकिस्तानचं नाव ऐकलं की शिव्याशाप सुरु होत असत, नालायक, खुनी लोक
ज्या दिवशी तहरीम पाकिस्तानी आहे हे सगळ्यांना कळलं होतं, त्याच दिवसापासून दोन्ही मुलींच्या मैत्रीला ग्रहण लागलं होतं. सध्या तर दोन्ही देशांमध्येही तणाव सतत वाढतच चालला होता. तिरस्कार, द्वेष फैलावत चालला होता. दररोज नवीन काहीतरी समस्या निर्माण होत होती. भारताने सर्जिकल स्ट्राईक केली. पाकिस्तानने संतापून आपल्या देशाच्या आकाशातून भारताच्या विमानांना जायला बंदी घातली. त्यामुळे तिकिटाची किंमत दुप्पट झाली होती. आजीचे शिव्याशाप सुरु झाले – “या कर्मदरिद्री लोकांनी आकाशाचा रस्ता बंद करून प्रवाशांची लूट चालवली आहे. काय मिळतंय ह्यांना त्यातून? जमिनीवर कब्जा करतात ते करतात, आता आकाशावर पण कब्जा करायला लागलेत!”
तिकिटांच्या किंमती वाढल्यामुळे त्यांची भारतात जाण्याची इच्छा मनातच राहिली. भारतीय लोक तर धावून – धावून आपल्या देशात जात होते, पण पाकिस्तानी लोकांच्या मनात भीति होती, की एकदा तिकडे गेलो, तर अमेरिकन सरकार परत इकडे घुसू देणारं नाही! हां, तहरीमचे मामा सरकारी दौरा काढून यायचे, आणि येताना आपल्याबरोबर भरपूर कपडे पण आणत असत. तहरीम मोठ्या आवडीने ते कपडे घालत असे आणि कित्येक वेळा तृपित साठी पण घेऊन यायची, की तिने पण घालून बघावे. शरारा ड्रेस तर तिचा जीव की प्राण होता. या सगळ्या निर्बंधांचा तहरीम आणि तिच्या कुटुंबावर फारसा परिणाम झाला नाही. हं, झालाच तर एवढाच, की तिच्या मामांचं येणं जाणं जवळ जवळ बंदच झालं होतं. ते जेंव्हा यायचे तेंव्हा सगळ्यांसाठी ढीगभर भेटी घेऊन यायचे, ते कमीच होत गेलं.
ज्या वयात या दोघींचं इथे अमेरिकेत पालन-पोषण होत होतं, ते वय असं होतं, की त्यांना आपापल्या देशांबद्दल फारसं प्रेम राहिलं नव्हतं. नवीन देशात, नवं वातावरण आपलंसं करणं सुरु केल्यानंतर मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता. पण, इथल्या आपल्या घराबद्दल बोलणं होत असे. अम्मी लक्षात ठेऊन ईदच्या दिवशी शेवयांची खीर नक्कीच पाठवायची. मम्मी पण दिवाळीच्या वेळी मिठाई पाठवत असे. अशा तऱ्हेने दोघी आया आपापल्या मुलींच्या आनंदाचा विचार करत असत.
आजीला जर कळलं, की हे तहरीमच्या अम्मीनं पाठवलेलं आहे, तर ती सरळ ते उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकत असे. मुलाच्या मृत्युचं ते दुःख कधी कधी तहरीमला बघून असं उसळून यायचं, की आवरताच येत नसे. त्या मुलीचा चेहरा बघितला, की आपल्या हुतात्मा झालेल्या मुलाचीच आठवण यायची तिला. आपल्या तिप्पीला हे लोक काहीतरी करतील अशी भीति तिच्या मनात होती.
आजीच्या या द्वेषाचा या दोन्ही मुलींना काही पत्ताच नव्हता. त्या दोघींच्या ज्या गप्पा चालत, त्याला काही अंतच नसायचा! तिथे देश आणि देशांच्या सीमा नसायच्या, फक्त त्या दोघींमध्ये असलेलं प्रेमाचं नातं असायचं. एकूण काय, तर त्या दोघी दोन्ही देशांच्या मिश्र संस्कृतीच्या वाहक होत्या. अम्मीचा अ, म मधे बदलून मम्मी म्हणायला तहरीमला आवडत असे, तर तृपितला अम्मी म्हणायला आवडायचं. जेंव्हा अम्मी सलामवालेकुम म्हणत आपला हात तिच्या डोक्यावर फिरवत असे, तेंव्हा तिच्या केसांमधून हिच्या मम्मीच्या केसांसारखाच सुगंध येत असे. तेच केस हातात पकडून ही दूध पिऊन गाढ झोपी जात असे.
इथे या मुली आपल्या आयांच्या सुगंधात हरवून जात आणि तिकडे दोन्ही देशांच्या सीमांवर दारुगोळ्याचा धूर आपला वास पसरवत दाट होत जात होता. खूप काही घडत होतं. सर्जिकल स्ट्राईक नंतर जोरदार गोळीबार आणि नेत्यांच्या बोलण्याच्या उष्णतेत मानवता भाजून निघत होती. यू. एन.मधे कोलाहल, टी. व्ही. वर एकमेकांवर केलेले वार, आरोप-प्रत्यारोप हे सगळं कमी होतं, म्हणून की काय, पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही!
क्रमश: भाग २
मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈