सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
डॉ हंसा दीप
(मागील भागात आपण पाहिले – पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही! – आता इथून पुढे)
परिस्थितीच तशी झालेली होती. केंव्हाही युद्ध सुरु होण्याची शक्यता होती. युद्ध तर युद्धच असतं. ते जरी सीमेवर चालू असलं, तरी त्याचा परिणाम त्या देशाच्या प्रत्येक नागरिकावर होत असतो, मग तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात का रहात असेना. मुलींची परिस्थिती फारच वाईट झालेली होती. वर्गात फक्त एकमेकींकडे बघता यायचं, बोलणं शक्य नव्हतं. रिकाम्या डोळ्यांनी अशा बघत असायच्या, की जणू दोघी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत! तहान भूक सगळं हरपलं होतं दोघींचं. अशा काही चिडीचूप झाल्या होत्या, जसं काही त्यांचा मनमीत त्यांच्यापासून कोणी हिराऊन घेतला होता. त्यांचं हे गुपचूप रहाणं अम्मी आणि मम्मीला व्यवस्थितपणे समजत होतं. पण त्याच्यावर काही उपाय करू शकत नव्हत्या, त्यावर एकच उपाय होता, तो हा, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंधातील भडकलेल्या आगीवर कुठून तरी थंड पाणी पडावं.
घरांमध्येही तणाव वाढत होता. या दोन्ही देशांच्या बाहेरही, जिथे जिथे या दोन्ही देशातले लोक होते, ते सगळे टी. व्ही. ला चिकटलेले असत. कॅ. अभिनंदनची जेंव्हा पाकिस्तानातून सुटका झाली, तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद झाला होता, तो मम्मीला. तिच्या स्वतःच्या मुलीच्या मैत्रीसाठी ती आनंदित झाली होती. अभिनंदनचं परत येणं जसं काही तिच्या मुलीची आणि तहरीमची मैत्री वाढवणं होतं. या परतण्याने भडकलेल्या आगीवर थंड पाण्याचा थोडाफार तरी शिडकावा झालेला होता. परंतु, आजीने अजुनही हार मानलेली नव्हती. तहरीमशी मैत्री तोडून टाकण्यासाठी मागेच लागलेली असायची. पाकिस्तान्यांच्या गोष्टी सांगत रहायची – “या लोकांनी आपल्याला असं केलं, तसं केलं.”
तृपितला मात्र समजायचंच नाही, की यात तहरीमचा काय दोष आहे! आणि तिनं स्वतः काय करायला हवं? ती तर तहरीमसाठी जीव पण देऊ शकते. मम्मीला समजायचं, की तृपितच्या मनात काय चाललंय. पण कसं समजावणार तिला, की तहरीम आणि तृपितच्या मधे, अम्मी आणि मम्मीच्या मधे, नुसता हिंदी-उर्दूचा फरक नाही, तर दोन देशांचा फरक आहे, दोन देशातील तिरस्काराचा फरक आहे! एका आईच्या दोन मुलांमधील फरक आहे, जे एकमेकांशी झगडत,लढत एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.
परंतु, आता ते इथे, तिसऱ्याच देशात होते, जो या दोघांपैकी कोणाचाच नव्हता, तर सगळ्याच देशांचा होता. एक एक करून वेगळं काढलं, तर जगातले सगळेच देश एका शाळेत मिळाले असते. वेगवेगळ्या देशांच्या या स्थानाला, भारत आणि पाकिस्तानची लढाई असो, की इस्त्राईल-पॅलेस्टाईनची लढाई असो काही फरक पडत नव्हता. सगळे आपापसातील तेढ बाजुला सारून एकमेकात मिळून, मिसळून रहायचा प्रयत्न करत असत. शेजारी पाजारी भलेही एकमेकांना ओळखत नसतील, पण कोणी कोणाशी अपमानास्पद पद्धतीने वागत नसत. सगळे आपापले रस्ते निवडून चालत रहात असत.
आज परत तो दिवस आला होता, की तिरस्काराच्या नद्या वाहू लागल्या होत्या. सीमेवर तणाव होता. काकांच्या मरणाची आठवण परत जखम बनून भळभळू लागली होती. हुतात्मा झालेल्या सगळ्या सैनिकांचे मृतदेह आणले जात होते. ज्या लोकांचा दुरान्वयानेही या युद्धाशी संबंध नव्हता, अशा लोकांच्या भावनांशी खेळ चाललेला होता. मुली घाबरून चुपचाप असायच्या. त्यांच्या मैत्रीवर परत एकदा कडक पहारे बसवले गेले होते.
आणि तेंव्हाच एक मोठी दुर्घटना घडली. न्यूयॉर्क शहरातल्या फ्लशिंग हायस्कूलमधे एका माथेफिरूने गोळ्या झाडल्या होत्या. बातमी वाऱ्यासारखी फैलावली. कित्येक पालकांनी शाळेकडे धाव घेतली. आधीच असा सगळा गोंधळ चाललेला असताना तिथेच एक बॉम्बस्फोट झाला. पण तोपर्यंत शाळा रिकामी झालेली होती. पोलिसांचे कडक पहारे लागलेले होते. आपापल्या मुलांचा शोध घेण्याची परवानगी फक्त आई वडिलांनाच दिली जात होती. धावत पळत मम्मी जेंव्हा शाळेत पोचली, तेंव्हा तिथे नुसता धूरच पसरलेला दिसत होता. तो धूर एवढा दाट होता, की लोकांच्या नाका-तोंडात जाऊन लोकांचा खोकून खोकून जीव हैराण होत होता, तरीसुद्धा प्रत्येक जण आपापल्या मुलांना जीव तोडून शोधत होता. कुठून तरी तृपित दिसावी, ती मिळावी या आशेने वेडावून गेलेल्या मम्मीची नजर आपल्या मुलीची एक झलक बघण्यासाठी शोधत होती. तिचे वडीलही आजीला घेऊन तिथे आले होते. सगळं काही ठीक असल्याची एकही खूण नजरेला पडत नव्हती. जिथं बघावं तिथे निराशा पदरात पडत होती. मनात एक अनोळखी भीति होती, जी मुलीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उभे करत होती.
इतरही अनेक पालक आपापल्या मुलांना हाका मारत वेड्यासारखे सर्वत्र धावत होते. जवळ जवळ अर्धा तास मम्मी, तृपितचे वडील आणि आजी तृपितला शोधत होते. शेवटी हार मानून त्या दोघी जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागल्या, तृपितच्या वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू वहायला लागले. आजी जोरजोरात किंचाळून रडत होती, इतक्या जोरात, की त्या बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या कानावरही तो आवाज जावा, की या निष्पाप मुलांनी तुमचं काय बिघडवलं होतं? आजी जोरजोरात किंचाळत होती – “माहित आहे मला, हा बॉम्ब माझ्या मुलाच्या खुन्यांनीच फोडला असणार. रक्तपिपासू आहेत हे लोक, माझ्या नातीला पण मारायचं आहे आता ह्यांना!” पण त्या कोलाहलात अश्रू गाळण्याशिवाय कोणाच्या काही लक्षात येत नव्हतं. आणि ही वेळ अशी होती, की कोणीच काही करूही शकत नव्हतं.
धूर, पोलिसांच्या सायरनचा आवाज आणि लोकांचं रडणं! जेंव्हा द्वेषाची आग हसत्या-खेळत्या लोकांचं आयुष्य आपल्या धगीने जाळून, भाजून काढते, असा हा एक अभद्र, काळा दिवस होता. तेवढ्यात समोरून आवाज येऊ लागले. धुराचे ढग थोडे विरळ झाल्याबरोबर समोरचं दृश्य दिसू लागलं. पोलिसांच्या बंदुकांच्या संरक्षणात काही लोक बाहेर येत होते. त्या येणाऱ्या लोकांच्या गर्दीत तहरीमची अम्मी दिसत होती, तिच्या एका बाजूला तहरीम तर दुसऱ्या बाजुला तृपित होती. त्या धुरात अजुनी जमीन दिसत नव्हती की आकाश दिसत नव्हतं, सगळं धूसर-धूसर होतं, सावल्या होत्या आणि दोन्ही मुलींच्या पाठीवर आईचा हात होता. त्या दोघी घाबरून, अम्मीला चिकटून चालत येत होत्या.
तो एक क्षण असा होता, की ना कोणी भारतीय होतं, की ना कोणी पाकिस्तानी, फक्त दहशत होती आणि घाबरलेले लोक होते. एक आई होती, जिचा संबंध ना कुठल्या देशाशी होता, ना कुठल्या सीमेशी! ती फक्त आणि फक्त मुलांची आई होती! एकेका बाजुला तहरीम आणि तृपित होत्या आणि त्यांच्या पाठीवर अम्मीचा हात होता. मंटो यांच्या कथेतील टोबा टेकसिंहचे ते दृश्य जसं काही परत एकदा जिवंत झालेलं होतं, जिथे जमिनीच्या त्या तुकड्यावर कुठल्याही देशाचं नाव नव्हतं. अगदी तसेच इथे अम्मीचे ते हात होते, जे ना भारताचे होते, ना पाकिस्तानचे! हे एका मातेचे हात होते, माता जी मुलांची जननी असते! आपल्या मुली सुरक्षित आहेत हे बघून आज पहिल्यांदाच अम्मी आणि मम्मी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. समोर उभ्या असलेल्या आजीच्या डोळ्यातही अश्रू होते, जे तिच्या मनातला द्वेष धुवून टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असावेत!
– समाप्त –
मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈