जीवनरंग
☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती. लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवासी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते. पहिल्यांदा प्रवास करणारे मागे पडलेल्या मुंबईकडे बघून, नाहीतर समोर दिसणारी मोठमोठी जहाजे जसजशी जवळ येत होती तस तसे त्यांच्या प्रचंड आकारमानाकडे बघून अचंबित होत होती.
हजारो कंटेनर घेऊन जाणारे एक विशाल महाकाय जहाज जे एन पी टी मधुन निघून खोल समुद्राच्या दिशेने निघाले होते. लाँचला आडवे जाणाऱ्या जहाजाला जाऊ देण्याकरिता लाँचचा स्पीड कमी करण्यासाठी लाँच च्या सारंगा ने खाली इंजिन रुम मध्ये बांधलेल्या घंटेची दोरी वाजवून खालच्या डेकवरील खलाशाला सूचना दिली. त्याने इंजिनचा आर पी एम कमी केला आणि लाँच काही वेळ पुढे न जाता जागेवर थांबली. माचीस बॉक्स एकावर एक ठेवले जावेत तसे हजारो कंटेनर एकमेकांवर लादून ते महाकाय जहाज एखाद्या ऐरावताप्रमाणे ऐटीत समुद्राला कापत पुढल्या सफरीला निघाले होते. जहाजाच्या पाठीमागे समुद्राच्या लाटांना कापून लघुकोनात निघून दोन लाटा एकमेकांपासून दूर जात होत्या. एक लाट लाँचच्या दिशेने आली आणि लाँचला हेलकावून निघून गेली.
सारंग ने पुन्हा एकदा दोरी ओढून घंटा वाजवली आणि खलाशाने इंजिनच्या आर पी एम ला पूर्ववत करून लाँचचा स्पीड वाढवला.
सगळ्यांच्या नजरा कंटेनर घेऊन जाणाऱ्या त्या महाकाय जहाजाकडे लागल्या होत्या. काही वेळाने जसजशी मुंबई आणि मोठं मोठी जहाजे मागे गेली तसं प्रत्येकजण स्वस्थपणे बसून समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत निवांत बसले.
लाँच मध्ये एक पंचविशीतील तरुण जोडपं बसलं होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं असावं कारण त्यांच्या अंगावरची हळद अजूनही उतरली नव्हती. त्यातल्या तरुणाला फक्त एकच डोळा होता, त्याला दुसरा डोळाच नव्हता, खोबणीत डोळा नसल्याने खाच पडलेली होती. त्याच्या बायकोने गॉगल घातला होता आणि ती त्याला खेटूनच बसली होती. लाँच मधील जवळपास सगळ्यांचेच त्याच्याकडे लक्ष जात होते. त्याला पण सगळ्यांच्या त्यांच्याकडे बघणाऱ्या नजरा दिसत होत्या. बऱ्याच जणांच्या मनात आले की ह्या तरुणाने त्याच्या बायकोने घातलाय तसा काळा चष्मा किंवा गॉगल का नाही लावला. त्याचा नसलेला डोळा निदान गॉगलच्या आड लपला तरी असता.
समोर बसलेल्या एका आठ नऊ वर्षांच्या लहान मुलाने तर त्याच्याकडे बघुन त्यांच्या आईला विचारत होती, आई त्या अंकलचा एक डोळा कुठे आहे. त्याच्या आईने त्याला सांगितले त्यांना एक डोळा नाहीये, पण दुसरा तर आहे ना.
तेवढ्यात तो तरुण त्या मुलाला म्हणाला बाळा तुझे नांव काय, मुलाने त्याचे नांव आर्यन सांगितले.
‘बरं आर्यन, माझा एक डोळा ना मी तुझ्याएवढा असताना एका अपघातात गेला. मी खेळताना रस्त्याच्या कडेला जमिनीत उभ्या केलेल्या लोखंडी सळई वर पडलो. नशीब सळई डोळ्यातून आरपार जाऊन माझ्या डोक्याच्या आरपार नाही निघाली.
आर्यनने त्याला विचारले, ‘मग अंकल तुम्हाला एका डोळ्याने सगळं दिसतं का’
त्यावर तो म्हणाला, ‘आर्यन माझे नांव प्रसाद आहे, मला तू प्रसाद अंकल म्हणून हाक मार. मला एका डोळ्याने दिसतं पण एका डोळ्याने कसे दिसते ते बघायचे आहे का तुला?’ आर्यनने उत्सुकतेने ‘हो’ म्हटले.
प्रसाद ने त्याला रुमाल आहे का विचारले, त्याने माझ्याकडे नाही पण आईचा आहे सांगितले आणि आईकडून रुमाल मागून प्रसादकडे दिला. प्रसादने रुमालाची घडी घालून आर्यनच्या एका डोळ्यावर असा बांधला की आर्यनला त्याच्या उघड्या असलेल्या एकाच डोळ्यातून दिसू शकेल. प्रसादने त्याला विचारले, ‘काय मग आर्यन दिसतं की नाही एका डोळ्याने?’
आर्यन म्हणाला प्रसाद अंकल दिसतंय पण दोन डोळ्यांनी जसं दिसतं तसे नाही दिसत.’
प्रसाद त्याला म्हणाला, ‘माझा अपघात झाल्यावर मलासुद्धा असेच वाटायचे पण हळूहळू सवय झाली. मला एकाच डोळ्यातून सगळं दिसतं आणि आता दोन डोळ्यांनी मला किती दिसायचे हे आठवत सुद्धा नाही.’
‘पण आर्यन तुला माहिती आहे का ही माझ्या बाजूला बसलीय ना माझी बायको तिला तर दोन्हीही डोळ्यांनी दिसत नाही. मला तर नऊ वर्षांचा होईपर्यंत दोन्हीही डोळ्यांनी दिसायचे आणि आता तर निदान एका डोळ्याने तरी दिसतेय पण हिला तर ती जन्मल्यापासून काहीच दिसत नाही.’
प्रसाद जे सांगत होता ते ऐकून आर्यनच्या, त्याच्या आईच्या आणि आजूबाजूला बसलेल्या इतर सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. प्रसाद आणि त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आर्यन च्या बालमनाला थोडं अचंबित होण्याव्यतिरिक्त काही प्रश्न निर्माण झाले नाहीत पण त्याच्या आईला आणि शेजारी बसलेल्या जाणत्या व्यक्तींना वाटले की, ह्याला एका डोळ्याने दिसत असूनही जन्मजात आंधळ्या मुलीसोबत याने लग्न का बरं केले असावे?
लाँच हेलकावे खात मांडवा जेट्टीपासून वीस पंचवीस मिनिटांवर आली होती. समुद्रातील सी गल पक्षी लाँच भोवती घिरट्या घालू लागले, लाँच मधील प्रवासी त्यांना वेफर आणि कुरकुरे हवेत भिरकावून खायला देऊ लागले. सी गल पक्षी हेवेतल्या हवेत ते पकडत क्वचितच एखादा वेफर पाण्यात पडत असे. आर्यन सुद्धा मजा बघत होता, कोणी व्हिडीओ काढत होते तर कोणी फोटो. सी गल पक्ष्यांना खायला देऊ नका, जंक फूड त्यांचा आहार नाही अशा सूचनांचे पोस्टर असूनही बरेच प्रवासी त्यांना खायला देण्यासाठी लाँच मधूनच कुरकुरे आणि वेफर खरेदी करत होते. प्रसादने पलीकडे हाताने इशारा करुन, आईला जवळ बोलावले. प्रसादची आई आली आणि आर्यनच्या आई शेजारी बसली.
प्रसादच्या आईच्या कपाळावर कुंकू नव्हते, एक साधीशी नऊवारी साडी तिने नेसली होती. तिचं व्यक्तिमत्व हसरं आणि प्रसन्न होतं. बसताना ती म्हणाली, ‘अरे प्रसाद जा की आरतीला घेऊन, तिचे फोटो काढून घे की मोबाईल मध्ये.’
प्रसाद ने आरतीच्या हाताला धरले आणि तो लाँचच्या मधल्या मोकळ्या जागेकडे जाऊ लागला.
उभं राहिल्यावर अंध आरतीच्या चेहऱ्यावर लाँच हेलकावत असल्याने जशी लाँच समुद्रात तरंगते तशी ती लाँच मध्ये नाही तर हवेत तरंगतेय असे भाव स्पष्टपणे दिसायला लागले. डोळेच नाही तर, समुद्र काय आणि त्याच्यावर तरंगतय काय हे कोणी सांगून कसं कळणार पण कदाचित आरती आयुष्यात पहिल्यांदाच तरंगणे अनुभवता होती. प्रसाद तिला आपुलकीने मोकळ्या जागेत हाताला धरून उभा होता. त्याने आर्यनला बोलावून दोघांचे फोटो काढायला सांगितले. आर्यनने आनंदाने त्यांच्या दोघांचे खुप फोटो काढले. प्रसाद आरतीला लाँचच्या रेलिंग जवळ घेऊन गेला॰ तिचे दोन्ही हात रेलिंगवर टेकवून तिला म्हणाला आता तूच अनुभव लाँचचे हेलकावणे. आरती समुद्राचा गार वारा आणि लाटांमधून बाहेर पडणारे अनंत तुषार अंगावर पडताना अनुभव होती.
आर्यन आईकडे येऊन म्हणाला की, आई प्रसाद अंकल ने एवढे फोटो काढले पण बिचारी आरती आंटी ते बघूच नाही ना शकणार!
बाजूला बसलेल्या प्रसादच्या आईने हे ऐकले. ती म्हणाली ‘बाळा, आरती पण बघू शकेल फोटो म्हणून तर मी प्रसादला सांगितले न की फोटो काढ म्हणून. आम्ही पुन्हा समुद्रात फिरायला येऊ किंवा नाही पण इथल्या आठवणी तर राहिल्या पाहिजेत की नाही.’
आर्यनच्या आईने प्रसादच्या आईकडे बघून विचारले, ‘काकी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का?’
प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली.
क्रमश: – भाग १
लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈