डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

गेले चार दिवस अगदी धो धो पाऊस पडला, म्हणून रमाला बाहेर पडता आलेच नाही. आज छान ऊन पडलं आणि  हवाही छान पडली होती. ‘ संध्याकाळी  जाऊया जरा फिरायला आणि भाजी, सामान आणून टाकू,’ असा विचार केला तिनं. रमाच्या मैत्रिणींचा छान ग्रुप होता. नुसत्याच गप्पा नसत मारत त्या सगळ्या,तर सतत एकमेकींच्या  संपर्कात असत. एकमेकांची सुखदुःखे शेअर करत. प्रसंगी मदतीला धावून जात.

सकाळीच वीणाचा फोन आला होता, “ रमा ,बरी आहेस ना ग.  ये की चहा प्यायला आणि पोहे खायला. ये ग! ” वीणाची बिल्डिंग कोपऱ्यावरच होती. साडी बदलून आणि कुंडीतली छान जास्वंदीची फुलं घेऊन रमा वीणाकडे गेली ! दोघींच्या जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. वीणाची दोन्ही मुलं परदेशात. मिस्टर अचानकच गेले चार वर्षांपूर्वी. या फ्लॅटमध्ये वीणा एकटीच रहाते. रमाचीही स्थिती काही वेगळी नाही. फरक इतकाच की तिची मुलं परदेशात नाहीत, तर मुलगा दिल्लीला आणि मुलगी बंगलोरला स्थायिक ! म्हणून रमाही एकटीच. तिचे यजमान माधवराव सहा वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने गेले, तेव्हापासून रमाही एकटीच पडली. 

 पण या दोघीही आर्थिक दृष्टया स्वतंत्र होत्या. दोघींचीही नोकरी एकाच बँकेत, त्यामुळे मैत्री अगदी घट्ट झाली. राहणी अतिशय साधी पण अभिरुचीपूर्ण. आणि दोघी मैत्रिणी अगदी रसिक. दोघींनीही छान  सेव्हिंग्ज केलेली आणि पुन्हा पेन्शन तर होतेच. अधून मधून दोघीही लहानशी ट्रिप करून येत आणि  ताज्यातवान्या होत.यांची मैत्री हा हेव्याचाच विषय होता इतर बायकांचा, पण या ते जाणून होत्या. आणि आपल्या मैत्रीत कधीच कसलीही बाधा येऊ द्यायची नाही, हा अलिखित करार होता त्यांचा .. 

कालच रमाला अखिलचा … तिच्या नातवाचा फोन आला होता. अखिलचं पोस्टिंग पाच वर्षासाठी लंडनला झालं होतं आणि तो बायकोला आणि मुलीला घेऊन लंडनला गेला होता. पण ते कॉन्ट्रॅक्ट आता चार वर्षांनीच सम्पले होते, आणि त्याला कंपनीने पुन्हा पुण्यात पोस्टिंग दिले होते. अखिलने आजीला फोन करून विचारलं, “ आजी, मी, रेणू आणि माझी मुलगी तन्वी, तुझ्याकडे काही दिवस राहायला आलो तर चालेल का? तन्वीची शाळा तुझ्या घरापासून जवळच आहे आणि रेणूला पुन्हा नोकरी बघता येईल. अचानकच माझं इथलं कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष आधीच संपलं म्हणून जरा पंचाईत झालीय. ” रमा म्हणाली “ या की! त्यात काय ! मलाही छान कंपनी होईल तुमची ! ” आज हे रमाने सहज म्हणून  वीणाला सांगितलं.

नाही म्हटलं तरी वीणा रमापेक्षा जास्त व्यवहारी होती. रमा भावना प्रधान आणि  भावनेच्या भरात पटकन कोणतेही निर्णय घ्यायची. आणि तिचा त्यामागचा हेतू चांगला असला, तरी मागून तिलाच त्याचा त्रास व्हायचा. वीणा हे जाणून होती. म्हणून लगेच तिने रमाला विचारलं, ” रमा, किती दिवस येणार आहे ग अखिल? “ .. “ तसं काही बोलला नाही बाई तो ! मी तरी लगेच कसं विचारणार ना ? नाही म्हटलं तरी मुलीचा मुलगा ! तिकडून तिलाही यायचा राग, की आईनं एवढी सुद्धा मदत नाही केली माझ्या मुलाला म्ह्णून !” रमा म्हणाली. हेही अगदी बरोबरच होते म्हणा !

रमाचा फ्लॅट खूप मोठा आणि सुरेखच होता. तिचे पति माधवराव चांगल्या नोकरीत होते आणि एकूण सधन कुटुंबातलीच होती रमा.  वीणाने शांतपणे रमाचे ऐकून घेतले आणि जे जे होईल, ते ते पहावे म्हणत गप्प बसली. ठरल्यावेळी अखिल,रेणू आणि तन्वी  रमाच्या फ्लॅट मध्ये दाखल झाले.  रमाने मोठी बेडरूम त्यांना दिली. सगळी बेडरूम तिने अतिशय नीटनेटकी करून, कपाटे रिकामी करून ठेवली होती. काम करणाऱ्या बाईना सांगितलं, “ मी तुम्हाला पगार वाढवते सुलूबाई ,आणि तुम्ही माझ्याकडे पोळीभाजी पण करायला या. एकदम तीन माणसं वाढली म्हणजे खूप कामही वाढणार तुमचं. मग मी इतका इतका पगार वाढवते ! चालेल ना? “ सुलूबाई हसत तयार झाल्या. आजींचा उदार हात त्यांनाही माहीत होताच. पहिले काही दिवस खूप गडबडीत गेले. तन्वीची ऍडमिशन, अखिलचे रुटीन, रेणूचेही बस्तान बसवायला– नाही म्हटलं तरी सगळ्यांना अवघड जातच होते. थोड्या दिवसात सगळं नीट लागी लागलं. रेणूला जवळच एका शाळेत पार्टटाईम जॉब मिळाला. सगळं घर अगदी बिझी होऊन गेलं. सकाळी अखिल रेणू आणि तन्वी गेले, की मगच रमा रिकामी होई.  त्यांचे  नाश्ता, चहा सगळे बाईंकडून रमा करून घेई.  रेणू जमेल तशी मदत करे, पण ती तन्वीच्याच मागे असे. तिचा डबा, स्कूल बस, मग आपली तयारी. रमा हे सगळं बघत असे.  

गम्मत  वाटायची तिला. दोन लागोपाठची आपली मुलं, सासूसासरे, नोकरी, हे सगळं तिनंही लीलया पेललंच की. मग एकच मुलगी, नोकर चाकर, शिवाय मी, असताना हिला एवढे उरकत कसे नाही? या मुलीनं लंडनला कसं काय केलं असेल? तिकडे तर ना नोकर ना मदत. कालच मुलीचा बंगलोरहून फोन आला होता .”आई, कसं चाललंय सगळं? तुझी अडचण नाहीये ना होत? दोन नोकर जास्त ठेव ग बाई ! रेणूला कामाची सवय नाही. तन्वी तर किती पसारा करते ना. आणि अखिल तर कधीच काही आवरत 

नाही. ” कौतुकाने बंगलोरहून माया, रमाची मुलगी लाडेलाडे बोलत होती. रमाचे डोके सटकलेच, पण ती वेळ काही बोलायची नव्हती. रमाने काहीतरी बोलत वेळ  मारून नेली. आता तिला खूप काम होते. 

तिला पसारा अजिबात चालायचा नाही. तिचं घर कसं नेहमी आवरलेलं ,चकचकीत आणि आरशासारखं ठेवलेलं! हा पसारा अजिबात आवडायचा नाही तिला. पण तिनं एक पथ्य पाळलं होतं, त्यांच्या रूममध्ये जायचं नाही, आवरायचं नाही. काय वाटेल तसे का पडलेले असे ना ! 

अखिल रेणू येऊन सहा महिने होऊन गेले. रेणूनं एक दिवस विचारलं, “ आजी, उद्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी येणार आहेत चहाला. तर सुलूबाई करतील ना इडली सांबार, शिरा? ”  रमा म्हणाली, “ नाही ग करणार ! तुला माहीत आहे ना, त्यांना दहा घरची  कामं आहेत. तू कर ना! तुझ्या मैत्रिणी येणारेत ना….  बघ आणि मगच ठरव हं !” रमाच्या अपेक्षेप्रमाणे, सुलूबाई नाहीच म्हणाल्या. रेणू शाळेत गेल्यावर त्या रमाला म्हणाल्या, “ बाई,राग नाही ना आला माझा? अहो ! आज सहा महिने बघतेय,जराही जाणीव नाही तुमची या बाईला ! काय हो पसारा,आणि उरक म्हणून न्हाय. काय ती बेडरूम पसरलेली ! माझा घाम निघतोय आवरून ! मी करतेय इडली सांबार—   वाट बघा ! करू देत की त्यांना. बाई, तुम्ही बी नका करू बरं का !तुम्ही पडल्या भिडस्त !” सुलूबाई हसायला लागल्या. “ बाई, कायम राहणार का इथं हे लोक? आपण एकमेकींना साहेब असल्यापासून ओळखतो न्हवं का ? बाय,, घेऊ नका हं हे लचांड  मागं लावून ! “

रमाही हसली आणि तिला सुलूबाईंचं कौतुक वाटलं. किती बरोबर ओळखलं तिनं सगळ्यांना. रेणू मात्र चिडलेली दिसली..सुलूबाईंच्या  नकारानं पार्टीचा बेत कॅन्सल झालेला दिसला. ‘ अजिबात उरक नाही  स्वतःला, आणि त्या बिचाऱ्या सुलूबाईंचा जीव घेणार ही ! वर  त्यांना चार जास्त पैसेही देणार नाही, मग कसं कोण काम करणार?’ 

त्या दिवशीही असंच झालं.  रेणूच्या  शाळेत काही प्रोग्रॅम होता. “ आजी तन्वीला  बसस्टॉपवरून  आणाल का प्लीज ? मला येता येत नाहीये घरी. “  रेणूचा रमाला फोन आला. धडपडत उन्हाचं तन्वीच्या बस स्टॉप वर जावे लागले रमाला. पुन्हा आल्यावर “ आजी, हेच नकोय खायला, पोहेच करून दे,“ हे करून झालेच! थकून गेली अगदी रमा. तीही आता सत्तरी कडे झुकली होतीच की. रेणू त्या दिवशी संध्याकाळी सहाला आली. आल्यावर एक शब्द नाही की, “ आजी सॉरी! अचानक उशीर झाला. तुम्हाला त्रास झाला ना?”  रमाला हे दिवसेंदिवस डोईजड व्हायला लागले. सांगता येईना आणि सहन करता येईना अशी परिस्थिति झाली तिची. असेच  एक वर्ष गेले.

एक दिवस अखिलला आईशी बोलताना चुकून रमाने ऐकले, “आई ,गेले वर्षभर राहतोय आम्ही इथं. आम्हाला आवडतो हा आजीचा फ्लॅट! काय हरकत आहे ग हा आम्हाला द्यायला तिनं? बाकीच्या नातवंडांना कोणालाही नकोय. सगळे तर परदेशात आहेत.  तू बोलून बघ ना आजीशी ! माझं तर फार सेव्हिंगही नाहीये ग ! तिकडे काहीच पैसे  सेव्ह नाही झाले. मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही, आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे ! मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” 

— रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.

– क्रमशः भाग पहिला .  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments