श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
इंद्रधनुष्य
☆ कथा एका पत्राची – भाग २ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(मागील भागात आपण पहिले – बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?”
“अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.” आता इथून पुढे)
“जेवायला ये आता. भुकेजली असशील”. आत्तेला माझी दया आलेली. मी तिला म्हटलं , ” थांब .” नि पुन्हा आल्या वाटेने पत्र शोधायला धावतच निघाले. हातातलं पत्र वाटेत पडलं असलं तर…. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत बघत मी चालले होते. माकडांचा खेळ चालला होता तिथेपर्यंत आले. गोलगोल फिरून बघितलं. वाऱ्याने उडालं असेल का? म्हणून आणखी लांब फिरले. देसाई भाऊंकडून जिन्नस नेणाऱ्या दोघा-तिघानी विचारलं “काय गो हुडकतंस? पैसे पडले काय साळंत येता जाता? नाय गावूचे.कोणाक सापडले असतील तर तो उचलल्या बिगर कसो -हाव्हतलो? जा घराक. उनातानाची फिरो नको”. त्यांना काय माहिती? पैशापेक्षाही महत्वाची वस्तू हरवली होती.
मी घरी आले. आईने दहीभात कालवून ठेवला होता. तो गपागपा जेवला. पंगतीला हजर नसलं की आई नेहमी असा भात कालवून ठेवायची.
दुपारची शाळा भरण्याची वेळ जवळ आली होती. मी अगदी रडायच्या बेतात होते. पत्राचं काय होणार काही सुचत नव्हतं.
नानू – माझा सातवीतला भाऊ, तो म्हणाला, “काय झालं”?
-त्याला सगळी हकिगत सांगितली.”आता मला गुरुजी मारतील कायरे खूप? खूप भीती वाटतेय.” मी म्हटलं.
“पत्र हरवलेले सांगूच नको. टाकले म्हणून सांग. त्यांना कुठे कळणारे?”
नानूने सांगितलं . त्याच्या सांगण्यामुळे मी अगदी फुशारूनच गेले. भीती पळून गेली. मुलगे मुलींपेक्षा शूर असतात. खात्रीच झाली माझी.
अडीच वाजता दुपारची शाळा भरली. गुरुजीनी विचारलंच. .”टाकलंस का पत्र?”माझ्या गळ्यात आवंढा आला. तरी मी जोरात म्हटलं ” हो.” .आपण खोटं बोलत आहोत हे मनाला सारखं डाचत राहिलं होतं. वरवर मी चेहरा हसरा ठेवला होता. जुगाबाईच्या आणि तिच्या बहिणींच्या डोळ्यांकडे मी मधून मधून बघत होते. मनातल्या मनात त्यांना सांगत होते, ” देव्यानो, मला क्षमा करा. मी खोटं बोलले आहे.”
मराठीचा नवा शिवाजी महारांजाचा धडा गुरुजीनी शिकवला, मोठ्याने कविता म्हणून झाल्या .पाढे म्हटले. पाच गणितं सोडवून झाली. उद्याचा अभ्यास गुरुजीनी फळ्यावर लिहून दिला. मी तो पाटीवर अक्षरं कोरून लिहून घेतला. आता शेवटचा खेळाचा तास.
पहिली ते सातवीची सर्व मुलं मुली मैदानावर जमली. कोणाचा खोखो, कोणाची लंगडी, कोणाचा ‘आईचं पत्र हरवलं, हा खेळ चालू होता. तो बघून मला गुरुजींच्या पत्राची आठवण होत होती. सगळी मुलं आनंदात होती. सगळे गुरुजी खुर्च्यांवर बसून गप्पा मारीत होते. मला मात्र केव्हा एकदा शाळा सुटण्याचा गजर होतो असं वाटत होतं. मी जाताना रस्त्यावर पत्र सापडतं का हे बघणार होते. सोमेश्वर, भरडाई, ह्या देवांचीही मी प्रार्थना करीत होते. पत्र सापडू दे म्हणून.
–आता घरी जायचं होतं. पत्राच्या भानगडीतून सुटले होते. नि एक टोपी घातलेला , पट्ट्याची चड्डी, नि जुनापाना सदरा घातलेला गडी-माणूस मैदानात अवतरला. तो देसाई भाऊंच्या दुकानातला जिन्नस देणारा नोकर होता. आम्हाला वाटलं, देवळात जायला आला असेल. पण तो तर गुरुजींच्या खुर्च्यांपर्यंत पोचला. आमची लंगडी संपली होती. आम्ही बघत राहिलो. नोकराने खिशातून एक पत्र काढलं नि रामगुरुजींच्या हातात दिलं. गुरुजी म्हणाले, “हे काय? पत्र कोणाचं?”
-“त्याचा काय झाला, माकडांचो खेळ इलोलो, दोन गिरायंका बरोबर मी बी ग्येलय बगुक. थयसर ह्या पत्र गावला. माका वाचुक येता पर मी आपला भाऊंकडे दिला. त्येनी बारीक डोळं करून वाचलानी, म्हणाले, अरे ह्ये आजच्या तारकेचा पत्र हा. रामक्रिष्न रामदास गोरे. ही सई हा ह्यावर.. अरे , हये राममास्तरांचा पत्र. ह्ये टाकलानी कसा नाय? त्यां न्हेऊन दे बगुया. असा कसा पडला?कोणी पाडलान?”
गड्याचं सगळं बोलणं मला ऐकू येत होतं , कारण मी जवळच्याच रांगेत उभी होते. माझे पाय थरथरायला लागले होते. मला सीतामाई सारखं धरणीने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत होतं. राम गुरुजींचा चेहरा हळूहळू रागाने लालभडक झाला होता. तो माझ्याकडे वळला होता. त्यांनी पत्र हातात घेतलं. बघून खिशात ठेवलं. गड्याच्या पाठीवर थोपटलं नि ते त्याला म्हणाले, ” शाब्बास. देसाई भाऊना म्हणावे, मी तुमचा आभारी आहे. माझे मालवणात पाठवायचे पत्. महत्वाचे आहे. आज स्वत: मीच टाकीन. जा तू.”.
“रानडेबाई , इकडे या.” मी रडायला लागलेच होते . नाक पुसत मी पुढे गेले. गुरुजींच्या हातात छडी होती. मी हात पुढे केले. त्यांनी सटासट चारपाच सणसणीत छड्या हातांवर मारल्या. पायांवर, पाठीवर, डोक्यावरसुद्धा मारल्या. कुठलेच गुरुजी मुलींना हाताने मारीत नसत. पण छड्या काय कमी लागतात? मला इतकं लागलं, इतकं लागलं की श्वास गुदमरल्यासारखं वाटलं. मैदानावरची सगळी मुलं गुरुजींच्या रुद्रावताराकडे घाबरून बघत होती. माझ्या भावानी खाली माना खाली घातल्या होत्या. आता गुरुजी मारायचे थांबले नि त्यांनी छद्मीपणाने बोलणं सुरू केलं.
“-मुलांनो, ही आपल्या शाळेतली एक हुशार मुलगी. पण दीड शहाणी. हिचं नांव सुमन रानडे. पण हिचं मन सुमन नाही. दुर्मन आहे. हिला मी पत्र टाकायचं काम सांगितलं. हिने पत्र पेटीत नाही टाकलं. रस्त्यावर टाकलं. आणि पत्र टाकलं म्हणून खोटं सांगितलं. दोन अपराध. म्हणून उद्या प्रार्थनेच्या वेळी हिचा सत्कार करूया. चला आता घरी. हिच्यासाठी एकदा टाळ्या.” मोठ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. पहिली दुसरीच्या मुलांनी न कळल्यामुळे वाजवल्या.
मी हमसाहमशी रडत घरी निघाले. माझ्या नली आणि माली या मैत्रिणी माझं दप्तर घेऊन माझ्याबरोबर आल्या. त्या माझ्या पाठीवरून हात फिरवित होत्या. धीर देत होत्या. त्यांनी मला पायंडीतच सोडलं. खोटं बोलणाऱ्या मुलीबरोबर यायची त्यांना लाज वाटत होती वाटतं.
भावांनी सगळी बातमी आई, आजी, आत्ते यांच्यापर्यंत पोचवली होती. आईने मला जवळ घेतलं. “अगो, ताप भरलाय तुला. ” असं म्हणून तिने मला माजघरात माच्यावर निजवलं नि घोंगडी पांघरली. –“बाबा, दादा घरी आले की त्यांना काय सांगायचे नाय हो. नायतर ते आणि पोरीला राघे भरतील. “आजीने मुलांना बजावलं. “रमे, तू आता सैपाकाकडे येऊ नको. तिला काढा करत्ये तो घाल नि निजव “आत्ये आईला म्हणाली. आमच्याकडे सगळ्या एकमेकीशी प्रेमाने वागत.
आई माझी समजूत घालायला लागली. “एवढे मनाला लावून घेऊ नको हो. अगो, सगळी मोठी माणसे लहानपणी खोटे बोललेलीच असतात. क्रिष्ण नाय का म्हणला, ” मै नही माखन खायो.”
माझी आई शिकली नव्हती पण तिने वाचन खूप केलेलं होतं तिने आणखी सांगितलं. “अगो, तुला एक गंम्मत सागत्ये, महात्मा गांधी–ते सुद्धा लहानपणी खोटे बोललेले. त्यांच्या आत्मकथनात त्यानी स्वतःच लिहिले आहे. महाभारतातला धर्म एव्हढा धर्मनिष्ठ पण द्रोणाचार्यांना काय म्हणाला “अश्वत्थामा गेला खरा, पण माणूस किं हत्ती गेला हे मला माहीत नाही. नरो वा कुंजरोवा”. म्हणजे खरे नाहीच ना बोलला? काही वेळा खोटे बोलावे लागते. तसे तू बोललीस.” माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवित आई मला धीर देत होती. तेव्हढ्यात आजी पण माझ्या मदतीला धावली. “अगो, तुझा हा रामगुरुजी, नांव असेल राम, पण सत्यवचनी असेल कशावरून? लहानपणी का होईना खोटे बोलला असेलच. त्याच्या आईलाच विचारत्ये मी.” आत्तेने पण तिला दुजोरा दिला. ” मला ठाऊक आहे. डब्यातला लाडू खाल्लान नि आईला म्हणाला, मी लाडू नाय खाल्ला.” मला कळत होतं ,मला बरं वाटावं म्हणून आत्ते खोटंच बोलत होती. तापाच्या ग्लानीत नि सगळ्यांच्या प्रेमामुळे माझे डोळे गपागप मिटत होते.
– समाप्त –
© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.
मो. – 9561582372, 8806955070.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈