श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… लेखिका – सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
सरला स्मशानातील एका कोपर्यात असलेल्या बाकावर बसून हे सर्व पाहात होती. खरंतर खानापूर सारख्या छोट्याशा खेड्यात हे प्रथमच घडत होते. ती मोठ्या हट्टाने कोणाचे न ऐकता इकडे आली होती. तिला शेवटपर्यंत “श्री” ला सोबत करायची होती.
सरणावर लाकडे रचली. त्यावर फुलांनी सजवलेला श्री चा निष्प्राण देह ठेवला. भटजींनी मंत्रघोष म्हटल्यावर राघवने चितेला अग्नी दिला. चितेच्या ज्वाळा जशा आकाशाला भिडू पाहात होत्या, तसतसे सरला आणि श्री मधील ऋणानुबंधाचे धागे तटातटा तुटत होते. आतून पार मोडून गेलेली ती तशीच निश्चल बसून होती. एका नव्हे तर दोन जन्मांचे ऋणानुबंध होते ते..
सगळे सोपस्कार पूर्ण करून राघव आणि सुदीप तिच्यापाशी आले. सुदीप म्हणाला, “चल काकू, तू सगळे निभावलेस. आता आपण मुंबईला परत जाऊ.” त्यावर राघव म्हणाला, “असं कसं काकू, आधी तुम्ही घरी चला.”
क्षणभर विचार करून सरला सुदीपला म्हणाली, “मी काय म्हणते, ईथवर साथ दिलीच तर दिवसवार करूनच परत फिरेन. तू घरी परत जा. पण दिवसांना मात्र ये हो.”
मोठ्या जड अंतःकरणाने माझा निरोप घेऊन सुदीप ‘दिवसांना येतो’ म्हणून सांगून परत फिरला..
धूळ ऊडवित त्याची गाडी गेली त्याच दिशेने बघत सरलाचे मनही पार भूतकाळात गेले.
त्या काळानुसार अगदी बघून सवरून सरला आणि श्री चे लग्न ठरले. सरला पेठेची सौ. सरला श्रीधर सहस्रबुद्धे झाली. सरला फिजिक्स ची प्रोफेसर तर श्री चार्टर्ड अकाऊंटंट. कोणालाही हेवा वाटावा अशी जोडी.
तसे म्हणायला गेले तर एकत्र पण सगळे शेजारी शेजारीच राहात. त्यांची शिवाजीपार्क ला स्वतःची पिढीजात बिल्डिंग होती.. सगळं चांगलंच होतं. पण काहीतरी कमी असल्याशिवाय माणसाला वरच्याची कशी आठवण राहाणार? लग्नाला खूप वर्ष झाली तरी त्यांची संसारवेल फुलली नव्हती. पण तरीही खाली वर भाचे पुतणे जीवाला जीव देणारे होते. ‘सुदीप’ हा तर सगळ्यात आवडता पुतण्या..
चाके लावल्यागत दिवस पळत होते. दोघांचीही रिटायरमेंट जवळ येत होती आणि अचानक करकचून ब्रेक लागावा तसेच झाले. एका छोट्याच अपघाताचे निमित्त झाले आणि श्री ची शुद्धच हरपली. सेमी कोमाची स्टेज.. सर्व डाॅक्टरी तपासण्या झाल्या. सर्व व्यवहार थांबले होते पण ब्रेन डेड नव्हता. एक क्लाॅट होता..
सरलाने कंबर कसली.. मदतीला आणि श्री चे करायला एक अर्धा दिवस माणूस ठेवला. तिची रोजची सगुणा होतीच, शिवाय जाऊन येऊन मुलं असायचीच. सुदीपचा खूप मोठा आधार वाटायचा तिला.
श्री चे सगळे ती करायची. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून नळीद्वारे खाऊ घालायची. सगळे घडलेले त्याच्याशी बोलायची. स्वतःचे आयुष्य त्याच्याशीच बांधून घेतले. दुसरे विश्व नाही. त्याला यातून बाहेर काढणार हाच आत्मविश्वास आणि आत्मनिर्धार..
सहा महिने झाले.. आणि एक दिवस रस्त्यावर काहीतरी झाले. कानठळ्या बसतील असा मोठा आवाज झाला.. आणि त्या आवाजाने की आणखी कशाने कोण जाणे, श्री झोपेतून जागे व्हावे तसा जागा झाला. सरलाचा आनंद गगनात मावत नव्हता. पण तो क्षणिकच ठरला.
श्री डोळे ऊघडून सगळेच अनोळखी असल्यागत पाहात होता. ओरडत होता.. पण त्यातले अक्षरही सरलाला कळत नव्हते.
“ना यल्ले इद्रत्ती ? ना यल्ले ईद्रत्ती ?”
आवाज ऐकून आमची सगुणा धावत आली.. आणि एकदम म्हणाली, “अय्यो, साहेब कानडीतून विचारत आहेत, ‘मी कुठे आहे?मी कुठे आहे?”
सरलाने तर तिला वेड्यातच काढले. त्याचा आणि कानडीचा काडीमात्र संबंध नव्हता.. पण गडबड खासच होती.
सरलाला, सुदीपला किंवा कोणालाच श्री ओळखत नव्हता. जसा काही तो इथला कधी नव्हताच. सगुणा कानडी होती म्हणून तिला समजले तरी..
मी एक प्रयोग म्हणून तिला त्याच्याशी बोलायला सांगितले.. तर तो खूष होऊन आपणहून बोलू लागला.. नन्ने होसरू रामभट्ट (माझे नाव रामभटजी आहे.) अर्धांगिनी हेसरू जानकी (बायकोचे नाव जानकी) इवनु नम्म् मगा राघव (मुलाचे नाव राघव) नावु खानापूर दाग भटगल्ली (खानापूरच्या भटगल्लीत घर). सगुणा आमची दुभाषी बनली.
माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती.. त्याच्याशी आमचा ओळखदेख असा काही संबंधच नव्हता.. त्याची काळजी आम्ही घेत होतोच, नाईलाजास्तव तो ही बिनबोलता करून घेत होता. सगुणा आली की एकच धोशा तिच्याकडे करायचा की ‘मला घरी नेऊन सोड’. ती ही बिचारी त्याची कशीबशी समजून काढायची..
प्युअर सायन्स ची प्रोफेसर मी हतबल होऊन जो कोणी काही सांगेल ते ऊपाय करायला लागले होते. बाहेरची बाधा काय, भूत पिशाच्च काय आणि काय काय.
शेवटी एकदा सगुणा च्या आणि सुदीपच्या डोक्यात आले की तो जो पत्ता सांगतोय तिकडे तरी एकदा जाऊन पाहावे.
मी आणि सुदीप शोध घेत थेट कर्नाटकातील धारवाड जवळील खानापूरला भटगल्लीत जाऊन थडकलो.. राघवची चौकशी केली. त्याच्या घरी पोचलो तर धरणी या क्षणी मला पोटात घेईल तर बरे असे मला झाले.
त्यांचा मोठा वाडा होता. बाहेरच्या ओटीवरच पंचेचाळीशीच्या श्री चा फोटो टांगलेला होता. शेजारचा फोटो जानकी वहिनींचा होता.. राघवकडे अधिक चौकशी करता कळले की तो पंधराच्या आसपास असताना त्याचे वडील रामभटजी, जे दशग्रंथी ब्राह्मण होते, ते गेले आणि वर्षभरातच आई गेली.
आम्ही त्याला आत्ताचा श्री चा फोटो दाखवला. तेव्हा त्याने तो चट्कन ओळखला.. बापरे कधी कुठे घडलेले ऐकले नव्हते ते आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो. हा श्री अपघातानंतर थेट आपल्या पहिल्या जन्मात जाऊन पोचला होता..
पुढे काय, मोठ्ठे प्रश्नचिन्ह ऊभे होते. राघव आणि त्याची बायको राधा खूपच सालस होते.. त्यानेच एक ऊपाय सुचवला. “जे झाले ते अजबच आहे. केमिकल लोच्या म्हणूया हवंतर. आमच्या वाड्यात एक घर (खोली) आहे. त्यांना अशा अवस्थेत अधिक त्रास न देता काही दिवस तुम्ही येऊन राहा. पुढचं पुढे पाहू”.
या विचित्र परिस्थितीत अन्य काही मार्गच नव्हता. राघव आणि सुदीपच्या मदतीने आमचे बस्तान आम्ही थेट खानापूरला हलवले.. दैवगती ने आम्हाला कुठून कुठे आणून सोडले होते.. सुरवातीला काही दिवस सगुणाही आमच्यासोबत राहिली. तिच्याकडून मी कितीतरी कानडी शब्द शिकले..
हाच का तो श्री हेच कळत नव्हते. जेमतेम रामरक्षा येणारा श्री स्त्रीसुक्त, पुरुषसूक्त आणि कित्येक संस्कृत श्लोक मुखोद्गत म्हणायचा. एक मात्र होते, सर्वांनाच सांगायचा “ई अम्मा बहळ ओल्ले. यवरू नन्न बहळ छंद सेवा माडतारे.. (म्हणजेच ‘या बाई (मी) माझी चांगलीच काळजी घेतात..) चला एवढी त्या जन्मातली पोचपावती या जन्मातही मिळाली होती.. जन्मोजन्मीचा ऋणानुबंध ….
राघवला आपले वडील आणि राधाला आपले सासरे मिळाल्याचा आनंद होता.. गावातले जुने जाणतेही लोक श्री ला की त्यांच्या रामभटजीःना येऊन गप्पा मारून जात. विशेष म्हणजे हे या जन्माचे गेल्या जन्मातले आक्रित सर्वांनीच स्वीकारले होते. कारण संशयाला कुठे जागाच नव्हती. अगदी बारीक सारीक तपशिलासह सर्व संदर्भ जसेच्या तसेच होते..
साधारण सहा महिन्यात आम्ही पूर्ण खानापूरवासी झालो. अगदी क्षुल्लक आजाराचे निमित्त होऊन राघवाच्या मांडीवर त्याने शेवटचा
श्वास घेतला. योगायोगाची गोष्ट ही की नेमका सुदीपही जवळ हजर होता. जबरदस्त ऋणानुबंध. …
“काकू, गरम चहा केलाय. थोडा घ्या. बरं वाटेल.” सरला भानावर आली. वर्तमानात आली.. समोर राघव होता. “आता तुम्ही ईथेच राहायचे..”
याला काय म्हणायचे???जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…….. या ऋणानुबंधाची साधी नव्हे तर बसलेली घट्ट निरगाठ अशी सुटली होती.. देवाची आणि दैवाची लीला अगाध होती…
लेखिका – सुश्री प्राची पेंडसे
मो 9820330014
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈