श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘एक नंबर शिवणार’… भाग २ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(मागील भागात आपण पाहिले – दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हंटलं, पण तेही राहूनच गेलं.  आता इथून पुढे)

ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला. मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बुट टाकला.

“सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा.” तो म्हणाला.

“दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय.” मी म्हणालो.

“साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको.” त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?

“राजाराम?” मी सरळ हाकच मारली.

हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना?” मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं. एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बुट वगैरे शिवतो.

मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,    

“साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं.  तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, परत होता तिथे सोडून येतो म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो, तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय. साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठूंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो.” एका दमात राजारामने सगळं कथन केलं.

“अरे पण आहे कुठे तो, मला तर दिसत नाही.” सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.

“या, दाखवतो,” असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.

तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,

“राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे.”

“साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको.” राजारामने स्पष्टीकरण दिलं.

राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अशा विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत. राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,

“साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार. आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे.”

राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.

 – समाप्त –

मूळ लेखक – राजेंद्र परांजपे  

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments