सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ वादळ  – भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

‘हुश्श, संपली बाबा एकदाची परीक्षा!’ असं म्हणत वसुमती सोफ्यावर आरामात पसरली. मुलांच्या परीक्षा म्हणजे आई-वडिलांनासुद्धा ताण असतो हल्ली! मुक्ताचा तिच्या लेकीचा आज शेवटचा पेपर होता बारावीचा. सगळे कैदी मोकाट सुटणार होते आज! वर्षभर कॉलेज, क्लास आणि अभ्यास या चक्रात अडकले होते.

‘आई, आज आम्ही सगळेजण पिक्चरला जाणार आहोत हं परस्पर! खादाडी पण होईलच तिकडे. पिक्चर सुटला की श्रीमतीच्या घरी दादरला नाईटआउट! तिच्या बाबांची दिल्लीला बदली झाली आहे. ते मागच्या आठवड्यातच तिकडे जॉईन झालेत. आता दोन-तीन दिवसांनी श्रीमती आणि तिची आई पण जाणार. मग कधी भेट होईल आमची कोण जाणे! ‘

‘ अग, हो हो! तुमचं प्लॅनिंग म्हणजे काय विचारता? पण कोण कोण येणार आहे तिच्याकडे? म्हणजे राहायला.’

‘ आर्या, सुनिधी आणि शमिका, आम्ही चौघीजणीच! बाकीचे फक्त पिक्चरला येणार आहेत.’ 

‘कपडे घेतलेस का रात्री बदलायला? आणि उद्या कधी उगवणार आहात आपण?’ 

‘हो आई, उद्या संध्याकाळी येणार . आज रात्री उशिरापर्यंत गप्पा, म्हणजे उठायला उशीरच. आणि परीक्षा संपल्यावर आता कशाला लवकर उठायचंय? मग सगळं आवरून निघायला ४-५ वाजतीलच.’ असं म्हणत आपली सॅक पाठीवर लटकवून मुक्ता बाहेर पडली सुद्धा. 

मुक्ताच्या या कार्यक्रमामुळे आता संध्याकाळपर्यंत वसुमतीला निवांतपणा होता. 

ठाण्याला राहणारं गोखलेंचं कुटुंब टिपिकल मध्यमवर्गीय!  वसुमती गृहिणी. वसंतराव, मुक्ताचे बाबा नरिमन पॉइंटला बँक ऑफ इंडियामध्ये हेडक्लार्क ! साडेसातपर्यंत यायचे घरी कामावरून. मुक्ता माटुंग्याच्या रूईया कॉलेजला. मिहीर, त्यांचा लेक  आठवीत होता. साडेपाचला शाळेतून आला की तो काहीतरी नाश्ता करून फुटबॉल खेळायला जायचा ग्राउंडवर! साडेसातच्या आसपासच तो पण घरी यायचा.  मग थोडावेळ एकत्र टी. व्ही. बघणं, आणि जेवणं आवरून, साडेदहाला मंडळी गुडुप! सकाळी सहा वाजता  परत वसुमतीचा दिवस सुरू व्हायचा. मुक्ता आणि मिहीर, दोन्ही मुलं अभ्यासात तशी चांगली होती, ७०-७५% मिळवणारी आणि सरळमार्गी. एकूण सुखी कुटुंब! 

दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर वसुमतीनं मोबाईल हातात घेतला आणि वॉटसप उघडलं आणि….. तिला एकदम गरगरायला झालं. कुठल्यातरी अनोळखी नंबरवरून एक फोटो आला होता. राजा सावंत आणि मुक्ता गोखले यांचा शुभविवाह नुकताच पार पडला, हार्दिक शुभेच्छा! वसुमतीनं खात्री करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा तो फोटो बघितला. हो, शंकाच नाही, ही आपलीच लेक आहे. पण…. तिला जबरदस्त धक्का बसला होता. काय करावं तेच सुचेना. कितीतरी वेळ ती तशीच विमनस्क अवस्थेत बसून राहिली.

कोण हा राजा? आणि लग्नापर्यंत मजल गेली तरी मुक्तानं एका शब्दानं आपल्याला सांगितलं नाही? आणि आत्ता कुठे अठरावं पूर्ण झालंय, शिक्षण व्हायचंय. ही काय दुर्बुद्धी सुचली हिला. तिच्यावर जबरदस्ती तर झाली नसेल? एक ना हजार विचारांनी वसुमती भेंडाळून गेली. तिच्या मैत्रिणींना फोन करावा का? पण कोण जाणे त्यांना हे माहीत आहे की नाही ? तरी तिने आर्याला फोन लावलाच. ती पण ठाण्यातच राहणारी. मुक्ता आणि ती कॉलेजला बरोबरच जायच्या.

दोनदा प्रयत्न केल्यावर, तिसऱ्यांदा एकदाचा फोन लागला. ‘काय झालं काकू? काही काम आहे का? तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही. मी ट्रेनमध्ये आहे, आम्ही सगळे कोकणात निघालोय ना, आजीकडे!’

‘बरं, बरं!’ म्हणून वसुमतीनं फोन बंद केला. सुनिधीचा नंबर काही मिळेना. मग तिनं शमिकाला फोन केला. तर ती कोणत्या तरी कार्यक्रमात होती. जरा विचार करून तिनं ज्या नंबरवरून फोटो आला होता, तिथे फोन लावला. पण तो फोन स्वीच्ड ऑफ़!’ काय उपयोग आहे का या मोबाईलचा!’ म्हणत ती नवऱ्याला  कळवावं का आणि काय सांगावं या विचारात बऱ्याच वेळ अडकली.

मनाच्या या सैरभैर अवस्थेत तिनं तिच्या मैत्रिणीला,  फोन केला. बाजूच्या सोसायटीतच राहायची ती!

‘ साधना, प्लीज, येतेस का लगेच माझ्याकडे?’

‘अगं वसू काय झालं काय? ‘

‘ तू ये तर खरी, आल्यावर सांगते ना’, म्हणून फोन बंद करून वसुमती तशीच बसून राहिली.

दहा मिनिटात साधना हजर झाली. वसुमती तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली आणि तिने तिला मोबाईलमधला तो फोटो दाखवला. साधना पण चकित झाली. काय बोलणार ना? तो फोटो निरखून बघितला आणि ती म्हणाली,’ हा राजा सावंत म्हणजे आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर चौकात ते गॅरेज आहे ना, तोच वाटतोय. काय शिकलाय माहित नाही, पण दिसायला देखणा आहे. त्याचीच तर भूल नाही पडली आपल्या मुक्ताला?  हे वय असंच वेडं असतं ग! पण तुला काहीच कल्पना नव्हती याची?’

‘नाही ग! मी समजावलं नसतं का तिला? बघ ना काय करून बसली? आता ह्यांना कसं सांगायचं हे? ‘

मग साधनानेच वसंतरावांना फोन लावला,’ वसूची तब्येत जरा बरी नाहिये, चक्कर येतेय तिला. तुम्ही जरा लवकर येऊ शकाल का घरी? मी थांबते इथे तोपर्यंत. ‘

साधनाच्या फोनमुळे वसंतराव गडबडून गेले. साहेबांना सांगून लगेच निघतो म्हणाले. पण तरी त्यांना घरी पोचायला पाच वाजून गेले असते. 

साधनानेच चहा केला आणि वसुमतीला बळजबरीने प्यायला लावला .वसंतराव घरी आले. साधनाने त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला. ते पण हडबडून गेले. तोवर मिहिरही घरी आला, त्यामुळे त्यालाही सगळं समजलं. 

‘ झालं ते झालं! दोन्ही मुलं सज्ञान आहेत, त्यामुळे आपण विरोध करून काही उपयोग नाही. आता जरा शांत डोक्याने विचार करून काय ते ठरवा. काही लागलं तर कळवा.’ असं म्हणून साधना घरी गेली. तिची लेक शाळेतून येण्याची वेळ झाली होती.

दोन-तीन दिवस तणावातच गेले. वसंतराव आणि वसुमतीला हा धक्का पचवणं सोपं नव्हतं. लेकीची चिंता सतावत होतीच. शिवाय सोशल मिडियामुळे ही बातमी सर्व नातेवाईकांपर्यंत पोचायला वेळ लागला नव्हता. फोनवरून, वॉटसपवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. सध्या कोणाला काही उत्तर देण्याच्या मनःस्थितीत ही दोघं नव्हतीच. साधना आणि तिचा नवरा मात्र सर्व प्रकारची मदत करत होते. साधना दोन्ही वेळचं जेवण घेऊन येत होती. वसुमतीला चार गोष्टी सांगून, मानसिक आधार देत होती. सुरेशने तिच्या नवऱ्याने, त्या मुलाची माहिती काढली होती.

राजा सावंतचं कुटुंब, मुळचं सावंतवाडीचं. तिकडे त्यांचं वडिलोपार्जित राहातं घर आणि बागायत होती. राजा पाचवीत असतानाच त्याचे वडील वारले काविळीने. मग ठाण्यात राहणारा काका, राजाला शिक्षणासाठी आपल्याकडे घेऊन आला. काकाचा केबल नेटवर्कचा व्यवसाय होता. शिवाय  घरचे आंबे, सुपाऱ्या, नारळ आणि इतर कोकणातील उत्पादनं विकण्यासाठी ठाण्यात एक दुकानही टाकलं होतं. राजाची काकी आणि चुलत भाऊ ते दुकान चांगलं चालवत होते. राजाची आई आणि मोठी बहीण गावाकडे  बाग सांभाळत होती आणि लोणची, मसाले, कोकम सरबत इ. बनवून ठाण्यात पाठवत होती. राजा बारावीत नापास झाला. त्याला पुढे शिकण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहणं जास्त गरजेचं होतं. त्याने एक-दोन वर्षे एका गॅरेजमध्ये काम करून, दुचाकी गाड्या दुरूस्तीचं काम शिकून घेतलं. त्याला या विषयात गती होती. मग काकाच्या मदतीने, बँकेकडून कर्ज काढून स्वतःचं गॅरेज काढलं. पोटापाण्यापुरतं उत्पन्न मिळत होतं त्याला. तो काकाकडेच पोखरणला राहात होता. जमेची बाजू म्हणजे राजा मेहनती आणि निर्व्यसनी होता. मागच्या वर्षी बहिणीचं लग्न करून दिलं होतं. 

क्रमश:  भाग १

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments