श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)

ती – एक मध्यमवर्गीय मुंबईकर. हम दो, हमारे दो – आदर्श सुखी संसार. निर्व्यसनी कुटुंब. चारचौघींसारखी नोकरी केली. मुला मुलीची लग्नं करून दिली. वयानुसार ती आणि नवरा निवृत्त झाले. And they lived happily ever after. सगळं कसं छान चाललं होतं.

नोकरीनिमित्त लेक नुकताच बंगळुरूला गेला होता, सूनबाई आणि नात अजून मुंबईलाच होत्या. लेकीचंही लग्न झालेलं, जावई – नातू गुणी होते.

सगळं कसं छान चाललं होतं, आणि हिलाच कोणाची तरी दृष्ट लागली. निमित्त झालं रात्री सारखं उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.

उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.

गंभीर आवाजात सांगितलं – ”वाईट बातमी अशी आहे की तुमच्या गर्भाशयावर कॅन्सरची एक छोटीशी गाठ आहे, पण चांगली बातमी ही आहे की गाठ अगदी छोटी आहे, कॅन्सर प्राथमिक अवस्थेतलाच आहे आणि एका छोट्या ऑपरेशनने ती गाठ काढून टाकता येईल.”

रोगाचं निदान समजल्यावर लेक बंगळूरूहून तडकाफडकी मुंबईला निघून आला, मुलगी माहेरी आली. रोगाचं नावच असं जबरदस्त होतं की सगळ्यांचे चेहरे शोकाकूल होते.

सगळ्यांचे म्हणजे ही सोडून.

तीन तीन आठवड्यांच्या अंतराने केमोथेरपीचे एकूण तीन डोस द्यायचे, त्यानंतर गाठीचे स्वरूप पहायचे आणि मग गरज पडली तर शस्त्रक्रिया आणि मग पुन्हा तसेच केमोचे तीन डोस असं उपचारांचं वेळापत्रक ठरलं.

चौकशीअंती ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या केंद्रात केमोथेरपी घ्यायची हे ठरलं, आणि आपल्या दोन्ही मुलांसह appointment घेऊन ही केंद्रातील डॉक्टरांना भेटायला हजर झाली.

डॉक्टर खूप छान होते, त्यांचं नावच तिला खूप भावलं – डॉ विजय शरणागत. कॅन्सरवर विजय मिळवण्याचा संकेत आणि शरणागत भाव – नावातली ही अर्थगर्भ जोडगोळी तिला सुखावून गेली, आश्वस्त करून गेली.

तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा, संयतपणा मात्र डॉक्टरांना गोधळवून गेला. न राहवून त्यांनी विचारलंच – “पेशंटला का नाही आणलंत ?”

ती मनापासून हसली, म्हणाली, “ही काय, मी आले आहे की.”

आश्चर्याच्या धक्क्यातून सावरल्यावर, सोप्या शब्दांत काय झालं आहे, काय आणि कसं करायचं हे डॉक्टरांनी विस्ताराने समजावून सांगितले. केमोचे औषध कसे दिले जाते, औषध घेताना आणि नंतर काय त्रास होऊ शकतो तेही सांगितले आणि विचारलं, “सहा सात तास लागतात एक डोस घ्यायला. मग कधीपासून उपचारांना सुरूवात करू या ? या आठवड्यात का पुढच्या ?”

“नंतर कशाला ? आज करता येईल ना सुरुवात ? मग आजच करू या की.” ती.

“अगं आई, आपण जरा दोन मिनिटं बोलू या का ? घरी बाबांना सांगूया आणि …” मुलगा या तडकाफडकी निर्णयापासून आईला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता.

“अरे, बघ. आज डोस घेतला की तू दोन चार दिवस थांब. मग तुला बिनघोर रुजू होता येईल कामावर. उगाच उशीर कशाला तुला ?

बरं, आज नाही तर चार दिवसांनी, हीच treatment घ्यायची आहे ना ? मग उगाच उशीर कशाला ?” तिचा practical approach.

केमोचा पहिला डोस झाला, दुसऱ्या दिवशी घ्यायचं इंजेक्शन  समितीच्या केंद्रातून न घेता तिनं तिच्या फॅमिली डॉक्टरांकडून टोचून घेतलं, मग समिती केंद्रात आठवड्याभरानंतरचा फॉलो अप झाला. बघता बघता आणखी दोन आठवडे भुर्रदिशी उडून गेले आणि दुसऱ्या केमोची वेळ आली. पुन्हा दुसऱ्या दिवशीचे इंजेक्शन – या वेळी मात्र आग्रहाने समितीच्या केंद्रातच, पुन्हा फॉलो अप.

दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी मुलाला एक गोष्ट जाणवली होती की नर्सेस असोत वा डॉक्टर्स वा अन्य कोणी स्टाफ, ते आईकडे अंमळ जास्तच वेळ थांबत होते.

का बरं असेल असं?

सांगताना तर अगदी minor आहे, काळजीचं काहीच कारण नाही, असं सांगत होते. पण अन्य पेशंटकडे मिनिट दोन मिनिटांत चौकशी करून, सल्ला देऊन पुढे जात होते, आणि हिच्या पलंगाशी मात्र पंधरा वीस मिनिटे डेरा ठोकून बसले असायचे सगळे !

काय प्रकार काय आहे हा नक्की ?

त्याने ही शंका बायकोला, बहिणीला बोलून दाखवली. पुढच्या वेळी त्यांनीही पाहिलं, आणि खरंच होतं त्याचं observation.

दुसऱ्या केमो आणि त्याच्या फॉलो अपच्या वेळीही हाच सीन राहिल्यावर मात्र लेकीच्या काळजाचा ठाव सुटला, डोळ्यांत छप्पन सशांची व्याकुळता घेऊन ती डॉक्टरांकडे धडकली.

“सर, आईबद्दल एक विचारायचं होतं.”

क्रमश:  भाग १

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments