श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग 2 ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)
(मागील भागात आपण पाहिले, सर, आईबद्दल एक विचारायचं होतं.” – आता इथून पुढे )
“बोला ना. काकू म्हणजे तुमची आई एकदम ok आहे. छान progress आहे त्यांची.”
“नक्की ना ?” हिच्या आवाजात कंप.
“म्हणजे ? मी समजलो नाही. काही त्रास होत आहे का त्यांना घरी ? पण इथं काही बोलल्या नाहीत त्या तसं. आणि रिपोर्ट्ससुद्धा छान आहेत त्यांचे.” आता बुचकळ्यात पडण्याची पाळी डॉक्टरांची होती.
“तिच्यात जर चांगली सुधारणा होत असेल, तर मग तुम्ही सगळेच जण इतरांपेक्षा इतका जास्त वेळ का तिच्यापाशी थांबलेले असता ? काहीतरी बिनसलं असल्याशिवाय थोडी असं होणार आहे ?” तिनं आपल्या मनातली खदखद शेवटी बोलून दाखवलीच.
डॉक्टर क्षणभर गप्प झाले, आणि मग जणू स्वतःलाच स्पष्टीकरण (explanation) दिल्यासारखं ते बोलू लागले.
“तुला जेव्हा कळलं की तुझ्या आईला कॅन्सर झाला आहे, तेव्हा तुला त्याचा मानसिक त्रास झाला ना ? आम्ही सगळे तुझ्या आईची जास्तच काळजी घेत आहोत हे पाहिल्यावर तुझा जीव घाबरा झाला ना ?
अग, तुझ्यासाठी तुझी आई ही एकच पेशंट आहे जिची तुला काळजी आहे, फिकीर आहे. आणि त्यामुळे तुझ्यावर हे दडपण आलं. आमचं तसं नाही. रात्रंदिवस, दररोज, आपल्या या केंद्रावर असंख्य रुग्ण येत असतात. आम्हाला त्या सगळ्यांचीच, तुला तुझ्या आईची जितकी आहे ना, तेवढीच, किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच काळजी असते.
काकू सुदैवी आहेत. त्यांचा रोग लवकर ध्यानात आला. त्यांची काळजी घ्यायला तुम्ही सगळे त्यांच्या अवतीभवती आहात. सगळेच जण असे भाग्यवान नसतात. काहींचे रोग उशीरा detect झालेले असतात, आपले उपचारांचे – औषधांचे दर खूप कमी असूनही काहींना आर्थिक अडचणींमुळे तेवढे पैसे उभे करणंही कठीण असतं.
आणि मग हे सगळे रुग्ण, त्यांचे सगेसोयरे ही सगळी दुःखं आमच्यापाशी मोकळी करतात. तक्रार करायची म्हणून नव्हे, कोणावर खापर फोडायचं म्हणून नव्हे पण निदान बोलून भार हलका करण्यासाठी – रितं होण्यासाठी.
पण या सगळ्याचा आम्हाला खूप ताण येतो, खूप दडपण येतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही जेव्हा रुग्ण हताश होतात किंवा प्राण सोडतात, ते बघून आतमध्ये तुटतं खूप काही. नाऊमेद व्हायला होतं. नैराश्य येतं.
अशा सगळ्या वातावरणात, तुझी आई – आमच्या काकू, आमच्यासाठी एक आशेचा किरण आहेत, प्रसन्न करणारी एक सुखद झुळूक आहे. इतरजण मिळालेल्या उत्तरांमध्ये (solution) प्रॉब्लेम शोधत बसतात, तुझी आई प्रॉब्लेममध्ये उत्तर (solution) शोधून काढते.
इतर सर्व पेशंट आमच्यासाठी सर किंवा मॅडम असतात, तुझी आई दुसऱ्या वेळेपासूनच आमची सर्वांचीच काकू झाली.
पहिल्या केमोच्यावेळी काकूंची हाताची नस सापडत नव्हती, टेक्निशियन पंधरा मिनिटे भोसकाभोसकी करत होता. पण या माऊलीने हूं का चू केलं नाही.
नंतर एकदा ते इंजेक्शन / सलाईन out गेल्याने (शीरेतून बाहेर आल्याने) हात सुजला, पण no complaints. औषध ऊष्ण पडल्याने आग आग झाली, तरी काही निषेध नाही. ‘अरे, माझ्या भल्यासाठीच करताय ना तुम्ही हे सगळं !’ उलट हे सर्टिफिकेट आम्हाला.
फॉलो अपच्या इंजेक्शनच्या वेळी काकूंच्या फॅमिली डॉक्टरांचा हात जरा जड लागला. खूप दुखत राहिलं – तरीही त्यांची तक्रार नाही.
साईड इफेक्टमुळे पहिल्याच केमोनंतर भसाभस केस गळले, पण तोंडावर नाराजीची खुणसुद्धा नाही.
पण दुसऱ्या केमोनंतर फॉलो अपच्या इंजेक्शनच्या वेळी आमच्या सिस्टरने हलक्या हातानं इंजेक्शन दिलं तर केवढं गौरवलं तुझ्या आईने तिला.
एवढ्या तेवढ्या कारणावरून डायरेक्टरना तक्रारी करणारे पेशंट आणि नातेवाईक सवयीचे आहेत आमच्या, पण दरवानापासून डॉक्टरपर्यंत आम्ही सगळे कसे “मस्त” आहोत (हा तुझ्या आईचा शब्द, बरं का) हे कौतुकाने सांगायला आमचे प्रमुख डॉ. श्रीकांतदादा बडवे यांना फोन करणारी तुझी आई एकटीच.
पहिले प्रथम त्यांनी कौतुक केलं ते केंद्रातील स्वच्छतेचं. अल्प दरात सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी टापटीप, स्वच्छता अप्रतिम आहे असं सर्टिफिकेटच देऊन टाकलं त्यांनी.
बरं हा नुसता वरवरचा पोशाखी फोन नव्हता बरं. आमच्या केंद्राचं सविस्तर समालोचनच होतं ते.
डॉक्टर असूनही दुर्गेश काटकर सरांचं अक्षर कसं सुंदर आहे, त्यांनीच कशी त्यांना काकू म्हणायला सुरुवात केली हे त्यांनी सांगितलं.
डॉ. निधी कशा प्रसन्न वदनाने पेशंटचे टेन्शन दूर करतात, अगदी पराग तावडेदादांची झुबकेदार मिशी, प्रशांतसर प्रभूदेसाईंची भिकबाळी, मितभाषी पण कार्यतत्पर स्वप्निल, अक्षता – कविता – सुनयना – सीमा या आमच्या सिस्टर, वॉचमन दुबेकाका – या सगळ्या सगळ्यांचं नावासकट, त्यांच्या प्रत्येकाच्या चांगुलपणासकट इत्थंभूत वर्णन काकूंनी सरांकडे केलं.
आम्ही स्टाफ सगळे इतकी वर्षे एकमेकांबरोबर आहोत. आम्हाला माहीत नाही, पण कोणाचा मुलगा कितवीत आहे, कोणाची परीक्षा आहे, कोणाच्या सासूला – वडिलांना बरं नाहीये – हे सगळं सगळं काकूंना ठाऊक आहे. आणि दर वेळी आवर्जून त्या त्याप्रमाणे चौकशी करतात.
आणि हे आमच्यासाठी खूप नवीन आहे, आणि खूप सुखावणारं आहे.
तुला वाटतंय की तुझ्या आईला बरं नाही आणि म्हणून तिच्या उपचारांसाठी आम्ही तिच्याभोवती गराडा घालून असतो, पण वास्तव त्याच्या एकदम उलटं आहे.
आम्ही आम्हाला बरं वाटावं यासाठी तिच्याभोवती रुंजी घालत असतो.
देवळात बसलं की कसं प्रसन्न वाटतं, बॅटरी रिचार्ज होते, तसं आमचं आहे, म्हणून आम्ही जास्तीत जास्त वेळ तिच्याजवळ थांबतो.
केमो तिची चालू आहे, पण थेरपी आम्हाला मिळत आहे.”
डॉक्टर सांगत होते आणि लेक आपले डोळे पुसत होती.
– समाप्त –
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड, पुणे. मो 8698053215
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈