?जीवनरंग ?

☆ राग… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहीलं-  अनूला आता शोधणं भाग होतं.न सांगता माहेरी तर निघून नाही गेली? पण मोबाईल घेतल्याशिवाय ती जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं.कपडे थोडे व्यवस्थित करुन तो जायला निघाला तेवढ्यात दार लोटून अनू आत आली तिच्या कडेवर बाळ होतं आणि ते शांत झोपलं होतं.  आता इथून पुढे )

“कुठे गेली होतीस?” त्याने विचारलं पण त्याला उत्तर न देता ती बेडरुममध्ये गेली.बाळाला पाळण्यात टाकून त्याला झोपवलं.अजित आत आला.

” बरं वाटतंय का त्याला?”त्याने विचारलं.तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तोंडावर हात दाबून ती रडायला लागली.मग बेडवर जाऊन उशीत डोकं खुपसून मुसमुसत राहिली.

” साँरी अनू आज खुप टेंशन होतं गं.त्यामुळे…..”

उत्तर न देता अनू रडत राहिली.अजितने पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे पाहिलं.त्याच्या निरागस गोड चेहऱ्याकडे पाहून त्याला उचलून घ्यायचा मोह त्याला झाला. पण अनू रागावेल या भितीने तो त्याला न घेताच बाहेर आला.

रात्री दोन वाजता त्याला जाग आली.अनू आणि बाळ दोघंही जागेवर नव्हते पण कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता.तो उठून बाहेर आला.अंगणातला दिवा सुरु होता आणि अनू बाळाला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती.

” मी घेऊ त्याला?”त्याने अनूला विचारलं.तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि फेऱ्या मारणं सूरु ठेवलं.अजित थोडावेळ थांबून परत बेडरुममध्ये येऊन झोपला.एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.आई ती आई असते.मुलांनी कितीही त्रास दिला तरी ती रागवत नाही,ओरडत नाही.प्रेमाने त्यांची सेवा करणं ती सुरुच ठेवते.बाप कितीही चांगला असला तरी तो आई होऊ शकत नाही.त्याला आठवलं लहानपणी तो एकदा आजारी पडला होता त्यावेळी त्याच्या आईने ७-८ रात्री अक्षरशः जागून काढल्या होत्या.

दुसऱ्या दिवसापासून रुटीन सुरु झालं.पण अनू त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हती.फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंच देत होती, तीही तुटक.तीन दिवसात तर तिने त्याला बाळाला हातसुध्दा लावू दिला नाही.अजितला न घेताच ती बाळाला दवाखान्यात घेऊन जायची.

कंपनीत आलं की अजितला आज आँर्डर येणार नाही ना याची भिती वाटायची. त्याचं कामावरचं लक्ष उडालं. एकदा तर क्वालिटीकडे लक्ष न दिल्यामुळे बरंच मटेरिअल वाया गेलं.नेहमीप्रमाणे पाटीलने सर्व कामगारांसमोर त्याचा पाणउतारा केला.राचीची आँर्डर लवकरच देण्याची धमकीही तो देऊन गेला.

दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पाटील प्लांटमध्ये आला नाही तेव्हा अजितला आश्चर्य वाटलं. त्याने  चौकशी केली तर पाटील मुंबईच्या आँफिसमध्ये गेल्याचं कळलं.नक्कीच तो आपली आँर्डर काढायला गेला असावा याची त्याला खात्री पटली.पण आता त्याने मनाची तयारी केली होती.अनू आणि बाळाला राचीला घेऊन जायला त्याला हरकत नव्हती.पण तिथून महाराष्ट्रात परतणं सोपं नाही हेही त्याला माहित होतं.आईच्या ट्रिटमेंटसाठी त्याला सुटी घेऊन यावं लागणार होतं.धावपळ होणार होती,त्रास होणार होता पण इलाज नव्हता.सध्याच्या बेरोजगारीच्या काळात अशी चांगली नोकरी लगेच मिळणं फार कठीण होतं.

तिसऱ्या दिवशीही पाटील कंपनीत आलाच नाही.अजितचं टेंशन वाढलं होतं.त्यात दुपारी शिपाई जी.एम.साहेबांनी बोलावल्याचा निरोप घेऊन आला.जड पावलांनी तो त्यांच्या केबिनजवळ पोहचला.

” मे आय कम ईन सर”

” येस कम ईन”

तो जी.एम.साहेबांसमोर जाऊन उभा राहिला.

” हँव अ सीट माय बाँय”

अजित अवघडून  बसला.जी.एम.साहेबांनी ड्राँवरमधून एक लिफाफा काढून टेबलवर ठेवला.

“धीस इज युवर आँर्डर.”

शेवटी जी येऊ नये असं वाटत होतं ती आँर्डर आली होती.पाटीलने त्याला छळायचं सोडलं नव्हतं.अजितच्या पायातलं त्राण गेलं.त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.संताप,निराशा,अपमान या मनातल्या भावनांवर तो ताबा मिळवायचा प्रयत्न करु लागला.

“काँग्रँच्युलेशन्स फाँर युवर प्रमोशन!”

त्याच्या कानावर जी.एम.साहेबांचे शब्द पडले आणि त्याने खाडकन डोळे उघडले.

“प्रमोशन?विच प्रमोशन?”त्याने आश्चर्याने विचारलं.

“येस! यू हँव बीन प्रमोटेड टू दी पोस्ट आँफ प्राँडक्शन मँनेजर.”

अजितला फारसा आनंद झाला नाही.राचीच्या प्लांटमध्ये प्रमोशन मिळणं फारसं आनंददायी नव्हतं कारण नवीन प्लांटला सांभाळणं सोपं नव्हतं.

” सर राचीका प्लांट कैसा है?जस्ट आस्कींग टू हँव अ नाँलेज बिफोर जाँयनिंग. “

“यु आर नाँट गोईंग टू राची.यु विल वर्क हिअर अँज प्राँडक्शन मँनेजर.”

“व्हाँट?”अजित खाडकन उभा राहिला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.

“येस माय बाँय”जी.एम.हसत म्हणाले.

“व्हाँट अबाउट मिस्टर संतोष पाटील सर?”

” उनको कंपनीने निकाल दिया है. ही वाँज व्हेरी अँरोगंट पर्सन. ही नाँट ओन्ली इन्स्ल्टेड मी बट आल्सो अवर एम.डी. ही हँड सबमिटेड मेनी कंप्लेंटस् रिगार्डिंग युवर वर्कींग बट आय वाँज व्हेरी मच नोन अबाऊट युवर हार्ड वर्क अँड डेडीकेशनस्. सो आय रिकमेंड युवर नेम फाँर धीस पोस्ट. “

जी.एम.साहेब बऱ्याच वेळ पाटीलबद्दल बोलत होते. कामापेक्षा इतर भानगडीत त्याला जास्त रस होता. त्याच्या कालावधीत प्राँडक्शनचा दर्जा घसरला होता त्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं होतं.म्हणून कंपनीने त्याला डच्चू दिला होता.

आनंदाच्या भरात अजित घरी यायला निघाला.वाटेत त्याने पेढे घेतले.घरात तो शिरला तर बाळ हाँलमध्येच खाली सतरंजीवर पहुडला होता.अनू किचनमध्ये काहितरी करत असावी.अजित बँग ठेवून बाळाकडे गेला.बाळाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो गोड हसला.त्याच्या हसण्याने हुरळून जाऊन अजित त्याच्याशी गप्पा मारु लागला.त्याच्या गोबऱ्या गालांवर हात फिरवू लागला.त्याच्या उघड्या पोटावर बोटांनी गुदगुल्या केल्यावर बाळ खळखळून हसला.त्याच्या गालाचा मुका घेण्यासाठी अजित खाली वाकला तेव्हा बाळ त्याचे गबगुबीत मऊ हात त्याच्या गालांवर फिरवू लागला.अजितला आता रहावलं नाही.अनावर प्रेमाने त्याने बाळाला उचलून घट्ट छातीशी धरलं आणि त्याच्या डोक्यावरून,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागला.मग अजितने त्याला दोन्ही हातांनी हवेत उडवलं आणि परत झेललं तसा बाळ खळखळून हसला.त्याला आता अजितची थोडीही भिती वाटत नव्हती.

” द्या इकडे त्याला माझ्याकडे” अनूच्या बोलण्याने तो अचानक भानावर आला.

” राहू दे ना थोडा वेळ. बघ कसा छान खेळतोय.खळखळून हसतोय.”

“नको.तो रडायला लागला की परत फेकून द्याल त्याला कुठेतरी. चल रे बेटा,चल दुध प्यायचंय ना” अनूने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले पण आज बाळाचा मुड वेगळाच होता.त्याने क्षणभर तिच्याकडे आणि अजितकडे पाहिलं आणि त्याने मान फिरवली.आपले दोन्ही हात अजितच्या गळ्यात टाकून तो त्याला बिलगला.अनूने जबरदस्तीने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मान फिरवून अजितला मिठी मारत होता.         ” बदमाश!विसरला वाटतं बाबांनी त्यादिवशी कसं तुला फेकून दिलं होतं ते”हताश होऊन अनू म्हणाली.

“अनू ,बाळ विसरला बघ ती गोष्ट. तुही विसर ना प्लीज” अजित कळकळीने म्हणाला.”     तो विसरेल. तुम्हीही विसराल हो.पण मी कशी विसरेन.नऊ महिने वाढवलंय मी त्याला पोटात.त्याला जन्म देतानांच्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्या संतापामुळे एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं असतं.बरं तरी सोफ्यावर आदळलं,फरशीवर आदळलं असतं तर…” बोलता बोलता तिचा स्वर गहिवरला.

” चुकलंच माझं अनू.फार टेंशन होतं गं त्या दिवशी. त्यातून बाळाच्या रडण्याने मी कातावून गेलो होतो.”

” पण म्हणून तुमचा राग त्या निरागस जीवावर काढायचा तुम्हांला काही हक्क नव्हता.आणि टेंशन कुणाला नसतात हो? मीही नोकरी केलीये. तिथे काय टेंशन असतं मलाही माहितेय.पण आँफिसमधला राग मी कधीही घरातल्या व्यक्तीवर काढला नाही.त्यादिवशी मीही टेंशनमध्ये होते. एक जिवलग मित्र अचानक वारल्यामुळे बाबांना हार्ट अटँक आला होता.त्यांना आय.सी.यू.त भरती केल्याचा आईचा फोन आला होता.”

“अरे बापरे!अगं मग सांगायचंस ना!आपण गेलो असतो त्यांना भेटायला.”

” काय सांगणार?मी काही सांगण्याआधीच तुम्ही नको ते करुन बसलात.मग तुम्हाला सांगायची हिंमतच नाही झाली.”

” आय अँम एक्स्ट्रिमली साँरी अनू.खरंच मी त्यादिवशी तसं वागायला नको होतं.खुप पश्चाताप होतोय गं.माफ कर ना मला प्लीज!”

” मी काय माफ करणार तुम्हांला? जगात जेव्हा जेव्हा क्रोध निर्माण झाला त्यात निरागस,निष्पापांचाच बळी गेला आहे.माझं बाळ माझं विश्व आहे अजित. त्या विश्वाला तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुमच्यासारख्या शांत व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून मला खुप जबरदस्त धक्का बसला होता.बस.परत असं करतांना शंभर वेळा विचार करा एवढंच माझं म्हणणं आहे.”

” तुझी शपथ,अनू मी परत असं कधीही करणार नाही.”

बाळाचा हसल्याचा आवाज आला तसं अनूने त्याच्याकडे पाहिलं.आता मात्र बाळाने तिच्याकडे झेप घेतली.

” एक आनंदाची बातमी आहे अनू.माझं प्रमोशन झालं आणि विशेष म्हणजे मला त्रास देणाऱ्या आमच्या प्राँडक्शन मँनेजरचीही कंपनीने हकालपट्टी केली.बरं चल अगोदर आपण तुझ्या बाबांना बघायला जाऊ. त्यांना बरं वाटत असेल तरच मी आणलेले पेढे खाऊ.”

“अहो त्यांना माईल्ड अटँक आला होता. तीन दिवसातच त्यांना डाँक्टरांनी घरी पाठवलं.’      “मग तर पेढे खायलाच पाहिजे” असं म्हणून अजितने बँगेतला पेढ्यांचा बाँक्स काढून अनूला एक पेढा भरवला. अनूनेही एक पेढा अजितला भरवला. शेवटी सगळं गोड झालं हे पाहून की काय अनूच्या कडेवरचा बाळही खुदकन हसला.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments