सुश्री शांभवी मंगेश जोशी
अल्प परिचय
शिक्षण – Bsc.B.ed.MMR.PGDPC
सम्प्रत्ति – निवृत्त शिक्षिका
अमृताचा चंद्र ह्या माझ्या व्यक्तिचित्रण पुस्तकास म.रा.सा.प.चे अनुदान प्राप्त. विविध मासिके आणि दैनिकात कथा प्रसिद्ध.
जीवनरंग
☆ गंधा… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
टे्रन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग दिल्लीला झालं. 6 महिने अजिबात रजा घेता आली नाही. आता, कधी एकदा गंधाला भेटू असं त्याला झालं होतं. तिला भेटण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला होता.
उद्या येतोय असं त्यानं कुणालाच कळवलं नव्हतं. 3-4 दिवसात कामाच्या व्यापात फोन झालाच नव्हता. तिचाही आला नव्हता.ं. आपल्याला समोर पाहून, गंधाला कसा सुखद धक्का बसेल, हे श्रेयसला डोळ्यासमोर दिसत होतं. तिचा चेहेरा कसा फुलून येईल, मोहोरून येईल, त्याच वेळेस कळवलं नाही, म्हणून रागवेल, डोळ्यात पाणी पण येईल, मग आपण तिची कशी समजूत काढू याच सुखस्वप्नात, तो रंगून गेला.
रागवल्यावर आपण तिची समजूत कशी काढू, ती मात्र तिच्या खास स्टाईलने कट्टी-फू करेल. जीभ काढून दाखवेल. अन् आपल्या काळजाचं पाणी-पाणी होईल. हाऽय!
गंधा-गंधा-गंधा! वेडं केलं होतं गंधाने त्याला. अगदी लहानपणापासूनच! दोघांची घरं शेजारी-शेजारीच होती. दोघांच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी, सख्य होतं. कुणीही त्यांच्याकडे पहातांना त्यांना शुभाशिर्वाद द्यायचे. जणू परमेश्वरानं ‘एकमेकांसाठी’ म्हणूनच जन्माला घातलं होतं. त्यांच्यात कधी ताई-दादा झालं नाही. नकळत्या वयापासून दोघं एकमेकांशी प्रेमाने वागत. धट्टा-कट्टा श्रेयस लहानग्या गंधाला उचलून फिरवायचा. तिला घेऊन झोक्यावर बसायचा. तिला उष्टं चॉकलेट भरवायचा. वय वाढत गेलं, तसतसं दोघांमधले प्रेमाचे बंध अधिकच घट्ट होत गेले. तारुण्यात हे प्रेम अधिकच गहिरं झालं. दोघांमध्ये आकर्षण वाढलं. एकमेकांशिवाय जग शून्य वाटू लागलं. दोन वर्षांपूर्वीच दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. श्रेयस रजा घेऊन आला की साखरपुडा करून घ्यायचा. नंतर लवकरच लग्न असं मोठ्यांनी ठरवलं होतं.
सार्या आयुष्यात पहिल्यांदाच दोघं एवढे दिवस एकमेकांना सोडून राहिले होते. आता श्रेयस 6 महिने भेटणार नाही, या विचाराने गंधाच्या डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं. श्रेयस वरवर तिला चिडवत होता, तोही फार दुःखी झाला होता. तिच्यापासून दूर जातांना…
आता 6 महिन्यांचा दुरावा संपला होता. उद्या…! उद्याच! गंधा आपल्या मिठीत असेल या विचाराने तो अधीर झाला होता. फक्त काही तास…! हो, पण गंधा ऑफिसमधून येईपर्यंत त्याचा जीव तळमळत रहाणार होता. घरी पोहोचला तरी!
आई-बाबा नव्हतेच अपेक्षेप्रमाणे. आईची सकाळची शाळा. बाबांचा शनिवारचा दौरा!
सारं आवरून श्रेयस शांतपणे पेपर वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती.
वाचता-वाचता, त्याचा डोळा लागला. अचानक तो दरवळ जाणवला. खास! गंधाचा! तो टक्क जागा झाला. त्याचा विश्वासच बसेना! होय! निशिगंधा आली होती. चक्क! त्याच्या अगदी समीप! नाजूक निमुळत्या बोटांच्या ओंजळीतून त्याच्या चेहेर्यावर मोगर्याची फुलं ओतत होती. तिच्या दाट लांबसडक वेणीतही मोगर्याचा गजरा होताच नेहमीप्रमाणे. त्या-त्या ऋतुतल्या फुलांचा गजरा कायम तिच्या केसात असाचयाच! तिची आजी रोज म्हणजे रोज लाडक्या निशूसाठी गजरा करायची. बागेतल्या फुलांचा. त्यामुळेच निशिभोवती कुठला न् कुठला सुगंध कायम दरवळत असायचा. म्हणून तर श्रेयस तिला गंधा म्हणायचा! गंधाही त्याच्या मनात सारखी दरवळत असायची. तिचा दरवळ कायम त्याला वेढून असायचा. आताही ती त्याच्या मनातूनच जणू त्याच्या समोर येऊन उभी होती. अगदी समीप!
खरं तर तो तिला सरप्राईज देणार होता. पण प्रत्यक्षात तिनेच इथे येऊन त्याला धक्का दिला होता; तोही असा सुगंधी! सुंदर! त्याची आवडती आकाशी रंगाची, बारीक काठांची म्हैसूर सिल्कची साडी नेसून आली होती. सुंदर काळ्याभोर केसांमध्ये माळलेला मोगर्याचा गजरा, बदामी डोळे, रेखीव भुवया, केतकी वर्ण, लालचुटुक ओठांचं धनुष्य. नीतळ गळा, कमनीय बांधा… किती पाहू, पाहत राहू, असं त्याला झालं होतं. तेवढ्यात गंधाने तिचा केसांचा पुढे ओलेला शेपटा मागे टाकला. तिच्या केसांचा स्पर्श श्रेयसच्या चेहर्याला जाणवला. मोगर्यांच्या गंधाने तो रोमांचित झाला. त्याने चटकन् तिला पकडण्यासाठी हात पुढे केला. ती चटकन् एक गिरकी घेऊन मागे गेली. तिच्या पदलालित्याने श्रेयस वेडावून गेला. आसूसून तिच्याकडे पहात पहात तो पुढे पुढे गेला. ती मागे जात-जात भिंतीला टेकली. त्याने दोन्ही बाजूंनी हात भिंतीला टेकवले. तिला हलताच येईना. कैद झाली.
त्याची जवळीक… जीवघेणी! ती अस्वस्थ! स्तब्ध झाली! लाजेने पापण्या जडावल्या. दोघांचे श्वास एकमेकांत अडकले. ती चटकन् खाली बसली. सुळकन् बाहेर निसटली. तो निराश होऊन वळला. त्यानं टेबलावरची डबी घेतली. त्यातली अंगठी काढून तिच्या समोर धरली. खुणेनेच तिला जवळ बोलावलं. ती आली. तिच्या बोटात तो अंगठी घालणार, एवढ्यात बाहेर आईचा आवाज आला.
दोघांचीही भावसमाधी तुटली. तो चटकन् बाहेर आला. हे काय? आई-बाबा दोघेही इथे कसे? शाळा…ऑफिस सोडून? त्याला आश्चर्य वाटलं. आईलाही तो कसा काय आला, याचं आश्चर्य वाटलं. आई जवळ आली, तर आईचा नेहेमीचा प्रसन्न चेहरा खूप सुकलेला होता. डोळेही रडून रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याला काही कळेना. त्याला पाहून तर आई त्याच्या कुशीतच कोसळली. हुंदक्यांनी तिचं सारं शरीर गदगदत होतं. तिच्या मागोमाग बाबाही आत आले. तेही गंभीर होते. श्रेयसच्या काळजात चर्रर् झालं. तो आईला घेऊन हॉलमध्ये आला. ते तिघंही सोफ्यावर बसले.
मघाशी त्याच्याजवळ बसलेली गंधा त्याला दिसली नाही. तो हाक मारू लागला. आई, गंधा कुठे गेली? गंधा, ए गंधा, अगं कुठं गेलीस? आई बघ का रडतेय. इकडे ये ना… तो जो-जो गंधाला हाका मारू लागला, तसतशी आई जोरजोरात रडू लागली.
श्रेयस बाहेर येऊन म्हणाला, ‘‘बापू गंधा गेली का? आत्ता आली होती ना?’’
बापूने डोळे विस्फारले अन् तोंडावर हात ठेवला. त्याला काही कळेना.
बाबा उठले, त्याच्याजवळ आले न् म्हणाले, ‘‘श्रेयस आत ये.’’
‘‘काय झालं बाबा? अहो गंधा आता आली होती. इथे माझ्याजवळ बसली होती. कितीतरी वेळ. खरंच. कुठं गेली अशी न सांगता?’’
बाबा म्हणाले, ‘‘अरे कशी येईल ती? शक्यच नाही.’’
‘‘का? का नाही येणार? अहो खरंच आली होती. इथेच माझ्याजवळ बसली होती.’’
आता तर आई खूपच रडायला लागली. रडत रडत म्हणाली, ‘‘अरे कशी येईल ती? आता कधीच नाही येणार.’’
‘‘का पण? असं का म्हणतेस आई? काही भांडण झालं का? सांग ना?’’
एव्हाना बापू, शांताबाई दोघंही खोलीत येऊन उभे होते. तेही रडत होते.
2-3 मिनिटं तशीच गेली. कुणी काहीच बोलेना. त्याला ती 2-3 मिनिटं 2-3 वर्षांसारखी वाटली. मग आई म्हणाली, ‘‘अहो सांगता का त्याला? कसं सांगायचं पण? तुम्हीच सांगा.’’ कसंबसं बोलून पुन्हा रडायला लागली. ‘काय सांगायचं’
‘बोल ना’ त्याची घालमेल क्षणाक्षणाला वाढत होती.
शेवटी त्याचे बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, ‘‘श्रेया गंधा गेली सोडून आपल्याला. आत्ताच सकाळी 8 वाजता. तिकडंच होतो आम्ही. 3-4 दिवस ताप आल्याचं निमित्त झालं अन् आज सकाळी…’’ असं म्हणून तेही डोळे पुसू लागले.
‘‘क्काऽय? क्काऽय सांगता बाबा? काहीही काय बोलता? अहो मी 8 वाजता घरात होतो. विचारा बापूला. माझं सगळं आवरून इथंच बसलो होतो पेपर वाचत. तर ती माझ्या शेजारी येऊन बसली होती. चांगला अर्धा तास इथेच बसली होती.’’ हे बोलतांना त्याचा आवाज फाटला होता.
‘‘अरे कसं शक्य आहे बाळा? ती गेली रे राजा गेली…’’ रडतच पुढे म्हणाले, ‘‘खूप तपासण्या झाल्या. मेंदूत काही इन्फेक्शन झालंय, कदाचित मुंबईला हलवावं लागेल असे डॉक्टर म्हणाले. पण… पण म्हणून असं होईल असं अजिबात वाटलं नव्हतं रे.’’
‘‘आता… आता सगळंच संपलंय. सगळंच!’’ असं म्हणून ते धाय मोकलून रडू लागले.
‘‘अहो काहीही बोलताय तुम्ही. हे बघा, हे बघा, तिने आणलेली मोगर्याची फुलं. ही बघा इथेच आहेत. ही बघा. इथे सोफ्यावरच आहेत. मी खोटं सांगतोय का?’’
खरंच तिथे मोगर्याची फुले पडलेली होती. शुभ्र, ताजी, सुगंधित!
आई-बाबा-बापू-शांताबाई सगळेच डोळे विस्फारून बघत राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना! फुलं खरंच होती तिथे.
काय बोलावं कुणालाच काही सुचेना. श्रेयसनं ती फुलं घेतली – गोळा करून. म्हणाला, ‘‘चला तुम्हाला दाखवतो. गंधा तिकडे असेल तिच्या घरी.’’ श्रांत, क्लांत, ढासळलेले बाबा त्याच्या बरोबर गेले. पाय ओढत.
घरात गेल्या-गेल्या निशिगंधाचं पार्थिव समोरच दिसलं.
तो ‘‘गंधाऽऽऽ’’ करून मोठ्ठ्यानं ओरडला. त्याबरोबर ती फुलं तिच्या पार्थिवावर पडली. अन् तोही कोसळला.
मोगर्याचा गंध दरवळतच राहिला… त्याने आणलेली… अंगठी… तिच्याजवळ पडलेली होती.
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈