डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षेचा बळी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(नितिनला  बारावीला खूप कमी गुण मिळाले आणि भरपूर पैसे खर्च करायला लागून मलेशियाला मेडिकलला प्रवेश मिळाला त्याला.) इथून पुढे —-

सुशील  म्हणालाही होता, ‘ तुला तिकडे तरी झेपणार आहे का हा मेडिकलचा कोर्स? अवघड असतो तो. आम्ही गेलोय बरं यातून, तेही मेरिटवर. नितिन,तू उगीच नको मागे लागू. तुला कमर्शिअल आर्टस् ला मिळतेय ऍडमिशन तर घे ना. “ नाही बाबा ! मला आई म्हणते  म्हणून डॉक्टरच व्हायचंय. मग बघा,कसे खोऱ्याने पैसे ओढतो ते ! मला ती माझ्या  मनाप्रमाणे आर्टिस्ट होऊ देणार नाही ना,मग ठीक आहे,..” सुशील हे ऐकून हादरूनच गेला.आणि शलाका हे मोठ्या कौतुकाने ऐकत होती.

“ अग, काय बोलतोय हा? आपण असलं कधी केलं नाही,करणारही नाही. शलाका,वेळीच आवर  घाल बरं याला ! “—- “ छे हो ! नवीन पिढी आहे ही. एवढा खर्च आपण करणार, तो मग भरून काढायला नको का?“ 

सुशील काहीही बोलला नाही. पुढची वाटचाल अवघड आहे, हे मात्र ओळखले त्याने. मलेशियाला जाऊन  दोन वर्षे झाली होती, आणि तेवढ्यात नितिन चारवेळा येऊन गेला होता भारतात. केस वाढलेले,  वजन कमी झालेलं, नजर अस्थिर, आणि रात्ररात्र झोप नाही . सुशील ने विचारलंही, “ अरे, तिकडे सगळं ठीक आहे ना?— “ बाबा, मी आता परत जाणार नाही तिकडे. मला नाही आवडत तिकडलं काहीच. मुलं चांगली नाहीत, व्यसनी आहेत आणि माझ्याकडे सारखे पैसे मागतात.” 

हा मुलगा आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोय असं वाटलं सुशीलला आणि नाही म्हटलं तरी तो थोडा काळजीत पडला होता. म्हणून यावेळी तो जबरदस्तीने स्वतः पोचवायला गेला त्याला मलेशियाला…. कॉलेज चांगले होते की… कितीतरी भारतीय मुले मुली अगदी आनंदात तिथे राहात होती, कोणी दुसऱ्या, कोणी तिसऱ्या मेडिकलच्या वर्षाला होती. सुशील कॉलेजच्या  प्रोफेसर्सना भेटला… आणि  एकेक धक्कादायक गोष्टी त्याच्या कानावर आल्या. नितीनने एकही परीक्षाच दिली नव्हती. त्याने कोणताही क्लाससुद्धा अटेंड केलाच नव्हता. त्याला कॉलेजने रस्टिकेट केले होते. अनेकवेळा वॉर्निंग देऊनही त्याने पेरेन्ट्सना काहीच सांगितले नव्हते की फोन केला नव्हता. डीनने सुशीलला स्पष्ट सांगितलं, “ आता आमच्या  हातात काहीही नाही. हा मुलगा एकही परीक्षा न देता इथे कसा ठेवून घेणार आम्ही? त्याला तुम्ही भारतात घेऊन जा. तिकडेच बघा काही जमलं तर.” .. 

हताश होऊन सुशील नितिनला भारतात घेऊन आला.  नितीनला त्याचे सुख दुःखही नव्हते.   तो घरी आला आणि शलाका हादरूनच  गेली. “ अरे, नक्की काय झालं तिकडे? सगळी मुलं नीट राहतात, ती आता तिसऱ्या वर्षाला गेली आणि तू, पहिल्या वर्षाचीही परीक्षा दिली नाहीस? मग करत काय होतास तिथे?”  यावर नितीन निर्विकारपणे म्हणाला, “ मला नाही समजायचे ते काय शिकवतात ते. मी मग वर्गात जाणेच सोडून दिले. मला आता शिकायचेच नाही काहीही.” शलाका सुशील हताश झाले. एवढा मोठा तरुण मुलगा चोवीस तास नुसता घरात बसतो, काहीही करत नाही, हे बघणे त्यांच्या सहनशक्ती पलीकडले होते. सगळ्या घराची शांतता भंग पावली.  

सुशीलने त्याच्या  सायकियाट्रिस्ट मित्राची अपॉइंटमेंट घेतली आणि नितीनला त्याच्याकडे नेले. दोन सेशन्स मध्ये लक्षात आले की त्याच्यावर रॅगिंग झाले होते आणि ,नितिन ते सहन करू शकला नाही….  आणि  बघता बघता पूर्ण डिप्रेशनमध्येच गेला.  डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्याला बोलते केले.  मग नितीन एकेक गोष्ट सांगू लागला. तिकडे परदेशातून आलेली मुलं त्याला पैसे मागायची,  कॅन्टीनमध्ये जाऊ द्यायची नाहीत, कपडे  लॉन्ड्रीत टाकू द्यायची नाहीत… आणि असे बरेच काही ..  आपल्या इंडियन मुलांनी खूप मदत केली. काही दिवसात हे प्रकारही थांबले. पण नितीनने याचा धसकाच घेतला. “ अरे,मुलीही तिकडे यशस्वीरीत्या सगळा कोर्स पूर्ण करतात, कोणताही त्रास त्यांना होत नाही आणि तुलाच हे कसे काय झाले?”  नितिन चक्क खोटे बोलत होता हेही डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याला तिकडे रहायचेच नव्हते. लहानपणापासून अत्यंत लाडावलेला, म्हणेल ते हातात पडत गेलेला, त्यामुळे स्वतः एकटे रहायची आणि आपली कामे करण्याची वेळच कधी आली नव्हती नितीनवर. सुशीलने नितीनच्या तिकडे असलेल्या रूम पार्टनरला फोन केला. सुदैवाने तो भारतीयच होता. त्याने सांगितले की, “ नितिनला कोणीही कधीही त्रास दिलेला नाही, रॅगिंग केलेले नाही. हा कधीही क्लासमध्ये आला नाही. मीच खूपदा समजावून सांगितले पण हा ऐकायचाच नाही काका. तुम्हाला माहीत नसेल, त्याला  ड्रग्स घ्यायची सवय लागली. सगळे पैसे तो उधळून टाकायचा. काका, मला नाही वाटत तो शिकेल. तुम्ही ट्रीटमेंट द्या त्याला. आम्हाला त्याने तुमचा नंबरही दिला नाही, नाही तर मी कॉन्टॅक्ट केले असते तुम्हाला. त्याला इकडे पाठवू नका, तो चांगल्या मुलांच्या संगतीत नाही.” 

सुशील आणि शलाका कमालीचे हताश झाले. डोळ्यादेखत आपला मुलगा असा  हातातून जात असलेला बघून त्यांचे जगणे म्हणजे यातनाघर झाले. नितीनला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते. नुसते खाणे, भटकणे आणि टी व्ही बघणे, हीच दिनचर्या झालेली होती त्याची. सुशील शलाका दिवसदिवस बोलत नसत त्याच्याशी ! तोही मुर्दाडासारखा नुसता हॉलमध्ये चोवीस तास सोफ्यावर लोळत पडे.

आजी आजोबांनाही  हे बघून अत्यंत वाईट वाटे. तो त्यांच्याशीही बोलत नसे. सोन्यासारखा हसरा, गुणी मुलगा असा झालेला बघून आणि त्यामुळे सगळ्या घरावर काळी सावली झाकोळलेली बघून त्यांना फार वाईट वाटे. यातून काय मार्ग काढावा, या विचाराने शलाका सुशीलची झोप उडाली. दिवसेंदिवस नितीन हाताबाहेर जाऊ लागला. घरातले पैसे चोरीला जाऊ लागले आणि घरातच स्वतःच्या खोलीत बसून तो ड्रग्ज घेऊ लागला. हे लक्षात आल्याबरोबर, सुशीलने त्याची चांगलीच कानउघाडणी केली आणि म्हणाला,” पुन्हा जर हे माझ्या लक्षात आले तर मी तुला नक्कीच ऍडमिट करणार नितिन ! बस झाले आता !” 

नितीनच्या विरोधाला न जुमानता सुशीलने बोलल्याप्रमाणे त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. सुशील शलाकाला अत्यंत वाईट वाटले. सुशील म्हणाला, “शलाका, तुझ्या अति महत्वाकांक्षेचा बळी ठरला नितीन.

तुला मी दोष देत नाही, सगळीच मुलं काही व्यसनी होत नाहीत, की वाईट मार्गाला लागत नाहीत. आता काय होईल ते आपण फक्त बघायचे.”   सहा  महिन्यांनी दोघे भेटायला गेले नितीनला. तब्बेत छानच सुधारली होती त्याची. आपला एवढा श्रीमंत मुलगा असल्या साध्या पायजमा शर्टात बघून पोटात तुटले शलाकाच्या…..

–क्रमशः भाग दुसरा

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments