सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ उत्तरायण… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(पुरस्कृत कथा)
जीजी ने लिहिलेली शेवटची ओळ होती,
” आता माझ्या आयुष्यातले उत्तरायण सुरू झाले. “
मी डायरी बंद केली. डोळ्यावरचा चष्मा काढला. आणि ओघळलेले अश्रू हातानेच पुसले. खूर्चीत मागे डोकं टाकून क्षणभर डोळे मिटून बसले. त्या क्षणी मला खूप थकवा जाणवत होता. अनंत भावनांचा सागर मनात उसळला होता.
गेले काही दिवस मी जीजीची डायरी वाचत होते. जीजी म्हणजे आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होता. तिच्या सावलीत आम्ही वाढलो, पोसलो. आमच्या जीवनावरच्या प्रत्येक क्षणावर तिचं अस्तित्व कोरलेलं आहे. पण आता या क्षणी असं वाटतंय की, तिला आम्ही ‘आमची आजी’ याच भूमिकेत पाहिलं. पण एक व्यक्ती म्हणून आम्ही तिचा विचार केला का? ती, तिचं आयुष्य, तिचं जगणं आणि त्यातून तिचं घडणं कसं होतं? ती जशी होती तशी का झाली याचा कधी विचारच केला नाही. तिला आम्ही बोललो, तिच्यावर रागावलो, वेळप्रसंगी तिला दुखावलेही पण पुन्हा तिच्याच मऊ मिठीत विसावलोही.
पण गेले काही दिवस तिने तिच्या मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेली डायरी वाचताना, ती आणि तो काळ यात वावरताना मन पिळवटून गेले.
शंभर वर्षांपूर्वीचा तो काळ.
दादाजींची अत्यंत लाडकी ऐलु. दादाजींना सात मुली. चार नंबरची ऐलु. थोडी निराळी, चतुर, चलाख, बंडखोर. तिच्या शाळेत जाण्याला दादाजींचा कडक विरोध होता. मुलींना शिकून काय करायचे आहे या समजुतीचा तो काळ होता. पण आईच्या मदतीने ऐलु चोरून शाळेत जायची. पाटीवर अक्षरे काढायची. फरशीवर गणितं सोडवायची. देवघरातल्या पोथ्या वाचायची. तिला वेगळं जगायचं होतं. प्रवाहाविरुद्ध.
एकदा गल्लीत एका तरुण गृहस्थाचा मृत्यु झाला. हाहा:कार झाला. आक्रोश, रडारड. कुणीतरी म्हणालं, “उत्तरायण सुरू व्हायला काहीच दिवस बाकी होते आता याला मुक्ती नाही.”
त्याहीपेक्षा जास्त त्याच्या या लहानग्या पत्नीचे आता काय होणार? या विचाराने ऐलु अस्वस्थ झाली. तिचं तर सारं आयुष्य म्हणजे दक्षिणायानच होणार का?
त्याचवेळी तिन ठरवलं, लग्नच करायचं नाही. लग्न झालं की नवरा मरतो आणि आयुष्याचं मातेरं होतं. एक लांब लचक दक्षिणायन बनतं.
पण नारायणशी तिची पत्रिका छत्तीस गुण जमली. ऐलूचा जन्म षष्ठीचा. कोणी म्हणायचं षष्ठी आणि सदा कष्टी. तिची रास कर्क. चौथ्या स्थानात मंगळ. पण तरीही नारायणशी सगळे गुण जमले. दीर्घ वैवाहिक सौख्य, चांगला संततीयोग, ग्रह मैत्री, कुंडलीतली सारी घरं सुखाची. शिवाय नारायण एकुलता एक मुलगा.नारायणचे वडील कुठल्याशा नावाजलेल्या कंपनीत हिशोबनीस म्हणून काम करायचे.नारायणलाही नोकरी होती. तो पदवीधर होता. खाऊन पिऊन सुखी असलेलं कुटुंब होतं ते.
वधु परीक्षेच्या वेळी मुलाच्या आईने एकच प्रश्न ऐलुला विचारला होता,
” तुला चोळी शिवता येते का?”
” हो येते की.”
आणि तिने काही तासातच, तिथल्या तिथेच दिलेले कापड, कातर, सुई दोरा घेऊन सुरेख घाटदार चोळी शिवून दाखवली.
लग्न जमले. झाले. दादाजींनी भरल्या डोळ्यांनी तिची पाठवणी केली. आई म्हणाली, ” आता तू त्या घरची तुळस! सदैव हरित रहा, कधीच सुकू नकोस.”
त्यावेळी सूर्य आकाशात मध्यावर होता. सावली पायात होती. तिला उगीचच वाटलं कोणालातरी विचारावं, “उत्तरायण सुरू झालं का?”
कुंडलीतले ग्रह जमले होते पण ऐलू च्या मनात मणभर दगडांचं ओझं होतं. लग्न झालं म्हणजे नक्की काय झालं हे तिला कळत नव्हतं. या घरातून त्या घरात जायचं, या साऱ्याच अनोळखी माणसांना आपलं म्हणायचं. या सार्यांचे स्पष्ट अर्थ तिला लागत नव्हते.
अवघं सोळा वर्षांचं वय. गर्भधारणा झाली. सासू आनंदली. “वंशाचा दिवा लागू दे ग बाई!” असं बडबडत ती ऐलुभवती फिरायची. तिची काळजी घ्यायची. नवऱ्याशी पुरती ओळखही झाली नाही आपली. चार शब्द मनमोकळेपणाने आपण कधी बोललो नाही. रीत, परंपरा, मर्यादा, बंधने तोडली नाहीत. फक्त निसर्गाने गर्भधारणे चे काम केले.
मुलगा झाला. गोरापान, सुदृढ, टपोरे डोळे. सुईणीने जन्मलेला गोळा हातात झेलला आणि ती सहज म्हणाली “बयो!आता तुझ्या आयुष्यात हाच सुखाचा ठेवा ग बाई! जगलीस तरी याच्यासाठी आणि मेलीस तरी याच्यासाठीच.”
काय अर्थ होता या भाष्याचा? पुत्र जन्माचा आनंद तर होताच पण आकाशात सूर्य मावळत होता. दक्षिणायन संपले नव्हते. उत्तरायण सुरु झाले नव्हते. जन्म मृत्यूचे गणित कळत नाही. एक दिवा उजळला होता. आणि एक दिवा मालवत होता. कुंडलीतले भविष्य खोटे ठरले होते. दीर्घ वैवाहिक सौख्याचे त्यांनी मांडलेले भाकीत जळून खाक झाले होते.
काळाने नारायण चा घास घेतला होता. ऐलुच्या मांडीवर जना शांत झोपला होता. अंधारातले भविष्य पहात.
इथून सुरू झाली ती ऐलू ची लढाई. तिच्या स्त्रीत्वाची परीक्षा. माता होणे म्हणजे काय हे समजण्याआधीच तिचं मातृत्व कसोटीला लागलं होतं.
दादाजी तिला न्यायला आले होते. म्हणाले,
” चल. मी तुझी आणि जनाची जबाबदारी घेतो. उभं आयुष्य तुझा सांभाळ करेन.”
पुत्र निधनाने अल्पावधीतच वाकलेले वृद्ध सासू-सासरे ऐकत होते, पाहत होते. पण ऐलुने स्पष्ट नकार दिला. कशी जगशील? काय करशील? या कशाचे उत्तर तिच्याकडे त्या क्षणी नव्हतं. पण तरीही तिने दादाजींना माघारी पाठवलं. तिला एवढंच कळत होतं की आता काळा बरोबरची लढाई आहे. अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या संक्रमणाचा काळ किती मोठा असेल ते मात्र तिला माहीत नव्हते. पण लढण्याचा वसा तिने घेतला. स्थिर सूर्याच्या आभासी भ्रमणाला तिने वंदन केले. आणि उत्तरायणाच्या दिशेकडे पाहिले.
एक दिवस तिचा बाळ शांत झोपला होता. घरात सामसूम होती. उन्हे कलली होती. सावल्या लांब होत होत्या. अनवाणीच ऐलु बाहेर पडली. तळ्याकाठच्या कोपिनेश्वर देवळापाशी ती झपाझप आली. लांबलचक जलाशयाच्या किनारी शेवाळं साचलं होतं. पण मध्यावर असंख्य गुलाबी कमळ फुलली होती. क्षणभर तिला वाटलं या जळाला आपलं जीवन अर्पण करून टाकूया. पण ती मागे वळली. देवळाच्या पायऱ्या चढून गाभार्यात आली. बुवांचे कीर्तन चालू होते. सुरेल, संगीतमय, रसाळ वाणीत त्यांनी कथाकथन मांडले होते.
” कुरुक्षेत्री, अर्जुनाने सजविलेल्या बाणशय्येवर इच्छामरणी भीष्माचार्यांचा देह पहुडला होता. पांडव, कौरव सारे जवळ होते. द्रौपदी, कुंती, गांधारी या महान तत्वज्ञानी, आदर्शवादी, वचनबद्ध योद्ध्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र भीष्माचार्यांची नजर फक्त सूर्याकडे होती. दक्षिणायन संपून उत्तरायणाची ते वाट पाहत होते. शेवटचे श्वास त्यांनी त्यासाठी मनोबलाने धरून ठेवले होते.”
ऐलु, बुवांचा एक एक शब्द मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवत होती. तिला वाटलं आज आपणही अशाच टोकदार बाणशय्येवर आहोत. मात्र आपले उत्तरायण हे वेगळ्या अर्थाचे आहे.
त्यानंतर ती झपाटल्यासारखी घरी आली. तिने तिच्या गोऱ्यापान, गुटगुटीत, तेजस्वी डोळ्यांच्या बाळाला उचलले आणि मोठ्याने म्हटलं, ” बाळा! तुझ्यासाठीच मी जगेन. तुला मोठा करेन. सुखाच्या राशीवर आरुढ झालेला पाहीन आणि हा घेतलेला वसा उतणार नाही मातणार नाही.”
सासुबाईंनी केलेला तो प्रश्न तिला आठवला.
“तुला चोळी शिवता येते का?”
तिच्या जगण्याचा मार्ग तिला सापडला.
सुरुवातीला ती अब्दुल इसाक च्या ओटीवर बसून त्याच्याच मशीनवर शिवणकाम करायची. त्याला कापड बेतण्यात, काजं-बटणं शिवण्यात, टिपा घालण्यात मदत करायची. तो तिला मोबदला द्यायचा.
कधी दिवस असायचा. कधी रात्र असायची. कधी ऊन असायचं, कधी पाऊस असायचा. पण ती अखंडपणे अनवाणी चालत राहायची. सासूने प्रचंड विरोध केला. तिचे असे बाहेर जाऊन काम करणे, आणि तेही अब्दुल ईसाक नावाच्या माणसाबरोबर, यावर तिने कठोरपणे नापसंतीची मुद्रा उमटवली.
पण आता मागे फिरणे नाही. ती ठाम राहिली. तिला तिचे आकाश दिसत होते. वाटेतले खड्डे ती ओलांडत राहिली. काटे वेचत राहिली. जळत्या निखाऱ्यावर अनवाणी चालत राहिली.
स्वर्गारोहण करणारे पांडव तिला दिसायचे. पण पहिल्याच टप्प्यावर कोसळलेल्या द्रौपदी सारखे तिला नव्हते व्हायचे. तिने कधी मौन बाळगले तर कधी शब्दांचे टोकदार फटकरेही मारले पण सुरू केलेला प्रवास तिने अर्धवट सोडला नाही.
कालांतराने तिला तिची ओळख मिळाली. आता ती एक बिचारी, दुर्दैवी, लहान वयातली विधवा नव्हती. तर गावातली, त्या काळातली एक अत्यंत कुशल अशी फॅशन डिझायनर होती. उच्चभ्रू सोसायटीतल्या बायका वेगवेगळ्या फॅशनचे झंपर तिच्याकडे शिवायला देत आणि घालून मिरवत.तिचा व्यवसाय विस्तारत गेला.
पैसा येऊ लागला. जनाही मोठा होत होता. आयुष्याचे एक एक टप्पे दिमाखदारपणे पार पाडत होता. ऐलू तिच्या साकारणाऱ्या स्वप्नांकडे साश्रु नयनांनी पहात होती. तिच्या रोजनिशीचं एक एक पान भरत होतं. पानापानावर मोगरा फुलत होता. अजुनही ती अनवाणीच चालत होती. पावलं रापली होती. टाचांना भेगा पडल्या होत्या. नखं काळवंडली होती.
आणि एक दिवस जना घरी आला. नेहमीप्रमाणे उंबरठ्यातच “आई!” म्हणून त्याने मोठ्याने हाक मारली. ऐलु लगबगीने बाहेर आली.
” आलास बाबा. किती दमलास! बैस. तुझ्यासाठी कोलांजन केले आहे.ते पी. मग बरं वाटेल तुला.”
” ते राहू दे! आधी तू या खुर्चीत बस. पावले दाखव तर. त्यांनी एक पुडक सोडलं. त्यात सुरेख, दोन पट्ट्यांवर छान नक्षी केलेल्या सोनेरी रंगाच्या चामड्याच्या चपला होत्या. जनाने त्या चपला हळूच तिच्या पायात सरकवल्या. “आता तू अनवाणी चालायचं नाहीस. माझ्या पहिल्या कमाईतून तुझ्यासाठी आणलेले हे सुवर्णाचे जोडे समज.”
जनाने डोळ्यातल्या अश्रूंनी तिचे थकलेले चरण धुतले जणू! अश्रूंचा महापूरच उसळला. एका घट्ट मिठीत वात्सल्य विसावलं.
आणि त्या दिवशीच ऐलुने लिहिले,
” आता माझ्या आयुष्याचे उत्तरायण सुरू झाले.”
जीजी च्या डायरीतल्या या शेवटच्या ओळी होत्या. नंतर तिने काहीही लिहिले नाही.जणू तिचे व्रत पूर्ण झाले होते. तिचा संक्रमण काळ शुभ राशीत प्रवेशला होता. तिच्या खडतर प्रवासाचे, फसवणुकीचे, विश्वासघाताचे, विकृत नजरेचे, त्या काळातल्या स्त्री जन्माच्या कहाणीचे, आणि त्यातूनही अश्रुंची फुले झालेल्या क्षणांचे, तिने लिहीलेले, अनेक किस्से मी साश्रु नयनाने वाचले होते. मात्र या ओळीपाशी तिचे आत्मवृत्त संपले होते.
मी डायरी बंद केली. खुर्चीच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून घेतले. आता मला खऱ्या अर्थाने उत्तरायण याचा अर्थ समजला होता. ब्रम्हांडात सतत चालू असलेल्या ग्रहताऱ्यांच्या भ्रमंतीचा मानवी जीवनाशी असलेला संदर्भ आणि शिकवण मला मिळाली होती.मी आकाशाकडे पाहिले.मावळत्या सूर्याची कक्षा बदलली होती.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈