जीवनरंग
☆ मोबदला… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(मागील भागात आपण पाहीले – आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं.आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे.अर्थात आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं? आता इथून पुढे )
आठ दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असतांना रणदिवे वकीलांचा फोन आला,
” शिरीष घरी आहेस का?यायचं होतं जरा बोलायला.”
“हो या ना.का हो काका काही विशेष काम?” त्याने विचारलं.
“अरे काही नाही जरा बोलायचं होतं.मी आलो की सांगतो सर्व.”
“या या मी घरीच आहे.”
शिरीषच्या पोटात खड्डा पडला.निर्मल आणि गुणवंतने वकीलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना?दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहित होतं.
अर्ध्या तासातच वकीलसाहेब घरी आले.शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला.
” काका निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का?” त्याने वकीलांना विचारलं. ” नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे.”
त्यांनी बँगेतून फाईल काढून ती उघडली. शिरीषचं ह्रदय धडधडू लागलं.
” तुला माहितच असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत.”
“हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं .त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता. “
वकीलसाहेब हसले. ते म्हणाले, “नाही .त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही. “
“अच्छा! पण या सगळ्याचा आता काय संबंध?”
” तुला कल्पना नसेल पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअरब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली.तीन महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो.तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती.मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी अट घातली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना कळवू नये आणि त्यांच्या मृत्युनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच. नाही दिला तर कोर्टकचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत अशी त्यांना भिती वाटत होती.”
“पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला गितलेत?” नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं.
वकीलसाहेब क्षणभर शांत बसले.मग आनंदाने ओरडून म्हणाले, ” अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत.”
” काय?माझ्या नावावर?” आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं.
“हो! पण शिरीष आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हँल्यू आम्ही काढली.ती जवळजवळ अडिच कोटीच्या आसपास आहे. “
“ओ माय गाँड!अडिच कोटी!!”शिरीषचे डोळे विस्फारले. नेहाही आ वासून वकीलांकडे पहात राहिली.
“आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे” वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईल मधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले.
” ते ठिक आहे काका पण या शेअर्समुळे काही लिगल प्राँब्लेम्स तर येणार नाहीत ना? अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर?” शिरीषने काळजीने विचारलं.
“तशी शक्यता फार कमी आहे.कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं म्रुत्युपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स कायदेशीररीत्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ.त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे. तरीसुध्दा तू आँफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलेब्रेट. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली.”
“कोणती?”
” अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राध्दाला वृध्दाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस.”
” जरुर देईन काका. “
वकीलसाहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी आणि गहिवरल्या स्वरात तो नेहाला म्हणाला,
” तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून? बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही”
नेहाच्याही डोळ्यात त्यावेळी अश्रूंनी गर्दी केली होती.पण त्याचसोबत अण्णांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला दिलाय याचंही समाधान तिच्या चेहऱ्यावर विलसत होतं.
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈